Search This Blog

Wednesday, 30 September 2026

नवरात्रीत होणार ‘जागर आरोग्याचा’ ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमातून वैद्यकीय तज्ज्ञ साधणार तरुणाईशी थेट संवाद


 नवरात्रीत होणार ‘जागर आरोग्याचा’

  • ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमातून वैद्यकीय तज्ज्ञ साधणार तरुणाईशी थेट संवाद

 

मुंबई, दि. ३०:  नवरात्रोत्सवात राज्यातील महाविद्यालयीन तरुणाईच्या आरोग्याचा जागर केला जाणार आहे. वाढता स्क्रीन टाइम, अपुरी झोप, चुकीच्या आहाराच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि मानसिक ताण यामुळे तरुणांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. या पार्श्वभूमीवर आजार टाळण्यासाठी तरुण वयापासूनच आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जागृती व्हावी, यासाठी राज्यात प्रथमच ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ हा नऊ दिवसांचा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमातून राज्यातील विद्यापीठे आणि वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापक व वैद्यकीय तज्ज्ञ राज्यभरातील विद्यार्थ्यांशी थेट आरोग्यविषयक संवाद साधणार आहेत.

 

विद्यार्थ्यांशी थेट संवाद

राज्यातील वैद्यकीय, कृषी, अभियांत्रिकी, विज्ञान, वाणिज्य, कला आणि इतर विद्याशाखांतील विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतील. प्रत्येक जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापक, विभागप्रमुख आणि वैद्यकीय तज्ज्ञ विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. तरुण वयात आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्यास त्याचे परिणाम पुढील आयुष्यात जाणवू शकतात. त्यामुळे आजार झाल्यानंतर उपचार घेण्याबरोबरच आजार टाळण्यासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, मानसिक आरोग्याची काळजी, व्यसनांपासून दूर राहणे आणि वेळेवर आरोग्य तपासणी यांचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आरोग्याबाबत जागृत राहण्याबरोबरच ही माहिती कुटुंब, मित्र आणि समाजापर्यंत पोहोचवावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.

 

संवादाचे विषय :

-  बदलती जीवनशैली आणि तरुणांचे आरोग्य

-  संतुलित आहार आणि बदललेल्या आहाराच्या सवयी

-  व्यायाम आणि शारीरिक तंदुरुस्ती

-  मानसिक आरोग्य

-  मोबाईल, सोशल मीडिया आणि वाढता स्क्रीन टाइम

-  व्यसनांपासून दूर राहणे

-  निरोगी जीवनशैली आणि आरोग्यदायी समाजनिर्मिती

 

‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ हा उपक्रम राज्यातील तरुणाईशी थेट संवाद साधणारा हा पहिलाच उपक्रम आहे. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत तरुणांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांवर त्यांच्याशी थेट संवाद साधणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांना या संवादातून आरोग्याशी संबंधित प्रश्न मोकळेपणाने मांडता येणार आहेत. तज्ज्ञांकडून मिळणारी माहिती आरोग्यदायी जीवनशैली करिता विद्यार्थ्यांना उपयोगी ठरणार असल्याचे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी म्हटले आहे.

००००००

अमली पदार्थांच्या वाहतूक, विक्री व साठवणुकीवर कठोर कारवाई करा


 अमली पदार्थांच्या वाहतूक, विक्री व साठवणुकीवर कठोर कारवाई करा

Ø जिल्हाधिकारी वसुमना पंत यांचे निर्देश

चंद्रपूर, दि. 30 : जिल्ह्यात अमली पदार्थांची वाहतूक, विक्री व साठवणूक होणार नाही, यासाठी पोलिस विभागाने अधिक दक्ष राहून कठोर कारवाई करावी. तसेच अमली पदार्थांच्या प्रतिबंधासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिले.

अमली पदार्थांच्या प्रतिबंधासाठी विविध विभागांकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतांना त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा पो‍लिस अधीक्षक आयुष नोपानी उपस्थित होते. पुढे जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये व इतर शैक्षणिक संस्थांमध्ये अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत व्यापक जनजागृती करावी. शैक्षणिक संस्थांच्या परिसरात अमली पदार्थ तसेच तंबाखूजन्य पदार्थांची विक्री अथवा सेवन होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित संस्थांनी तत्काळ पोलिस विभागाशी संपर्क साधावा. विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागृती निर्माण करण्यासाठी शिक्षण विभागाने विशेष लक्ष द्यावे.

 जिल्ह्यात कार्यरत असलेल्या रासायनिक कारखान्यांमध्ये कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थांचे अनधिकृत उत्पादन होणार नाही, याची संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी. तसेच बंद अवस्थेत असलेल्या कारखान्यांचीही नियमित तपासणी करण्यात यावी. अन्न व औषध प्रशासन विभागाने जिल्ह्यातील मेडिकल स्टोअर्सना अचानक भेटी देऊन तपासणी करावी आणि प्रतिबंधित औषधे अथवा ड्रग्जची बेकायदेशीर विक्री होत नसल्याची खात्री करावी, असेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्याच्या आंतरराज्य सीमेलगतच्या भागात शेतीमध्ये खसखस किंवा गांजासारख्या प्रतिबंधित पिकांची लागवड होणार नाही, यासाठी कृषी विभागाने दक्ष राहावे. संशयास्पद लागवड आढळल्यास संबंधित विभागांना तत्काळ माहिती देऊन आवश्यक कारवाई करण्यात यावी. टपाल, खासगी कुरिअर सेवा तसेच इतर माध्यमांतून येणाऱ्या संशयास्पद पार्सलवरही विशेष लक्ष ठेवण्यात यावे. पार्सलमध्ये अमली पदार्थ असल्याचा संशय अथवा साठा आढळून आल्यास त्याची माहिती तातडीने पोलीस विभागाला द्यावी. खासगी वाहनांद्वारे होणाऱ्या कुरिअर व पार्सल वाहतुकीचीही आवश्यकतेनुसार तपासणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिले.

बैठकीला पोलिस निरीक्षक अमोल काचोरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश हिवसे, केंद्रीय सेवा व कर विभागाचे अधीक्षक शशांक मंडल, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त सुहास सावंत, जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमन पानगंटीवार यांच्यासह एमआयडीसी व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

००००००

हृदयरोगग्रस्त 140 बालकांची मोफत 2डी इको तपासणी


 हृदयरोगग्रस्त 140 बालकांची मोफत 2डी इको तपासणी

Ø 37 बालके शस्त्रक्रियेसाठी पात्र ; जिल्हा रुग्णालयात विशेष शिबिर

चंद्रपूर, दि. 30 : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) आणि जिल्हा अतिशीघ्र निदान केंद्र (DEIC), चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील हृदयरोगग्रस्त बालकांसाठी जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर येथे विशेष मोफत 2डी इको तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात एकूण 140 बालकांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी 37 बालके शस्त्रक्रिया व शस्त्रक्रियापूर्व तपासणीसाठी पात्र आढळून आली.

बालकांमधील जन्मजात दोष व आजारांचे लवकर निदान करून त्यांना आवश्यक उपचार, संदर्भ सेवा, शस्त्रक्रिया आणि नियमित फॉलोअप सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत विविध विशेष आरोग्य शिबिरे आयोजित केली जातात. त्याचाच भाग म्हणून हृदयरोग असलेल्या बालकांसाठी या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले.

55 बालके नियमित फॉलोअपवर : शिबिरात तपासणी करण्यात आलेल्या १४० बालकांपैकी ३७ बालके शस्त्रक्रिया व शस्त्रक्रियापूर्व तपासणीसाठी पात्र ठरली. ५५ बालकांना पुढील वैद्यकीय निरीक्षण व नियमित फॉलोअपसाठी ठेवण्यात आले, तर ४८ बालकांचे 2डी इको अहवाल सामान्य आढळून आले. आवश्यकतेनुसार बालकांना औषधोपचार, पुढील तपासणी, उपचार व शस्त्रक्रियेबाबत पालकांना मार्गदर्शन करण्यात आले.

शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बंडू रामटेके आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांच्या हस्ते झाले. मुंबई येथील किंम्स हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. एल. श्रीनिवास व डॉ. सोनिया करापूरकर तसेच त्यांच्या वैद्यकीय पथकाने बालकांची सखोल तपासणी केली. तपासणीनंतर हृदयरोगाचे स्वरूप, पुढील उपचारांची आवश्यकता तसेच शस्त्रक्रियेबाबत पालकांना वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात आले.

लवकर निदानामुळे वेळेत उपचार शक्य : बालकांमध्ये आढळणाऱ्या जन्मजात हृदयरोगासह विविध आजारांचे वेळेत निदान झाल्यास आवश्यक उपचार आणि संदर्भ सेवा लवकर उपलब्ध करून देता येतात. त्यामुळे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम  अंतर्गत नियमित आरोग्य तपासणीसोबत आवश्यकतेनुसार तज्ज्ञ वैद्यकीय तपासणी व विशेष शिबिरांवर भर देण्यात येत आहे.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जन्मजात दोष, बालपणीचे आजार, जीवनसत्त्वे व सूक्ष्म पोषक घटकांची कमतरता तसेच विकासात्मक विलंब यांचे लवकर निदान केले जाते. निदान झालेल्या बालकांना औषधोपचार, तज्ज्ञांकडे संदर्भ सेवा, आवश्यक शस्त्रक्रिया आणि नियमित फॉलोअप सेवा उपलब्ध करून दिल्या जातात.

या विशेष शिबिरामुळे हृदयरोगग्रस्त बालकांना जिल्ह्यातच तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणीची सुविधा मिळाली. विशेषतः शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या बालकांची वेळेत ओळख झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी योग्य संदर्भ व मार्गदर्शन करणे सुलभ झाले. जिल्ह्यातील बालकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य व संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अशा विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन सातत्याने करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी दिली.

००००००

चंद्रपूर तालुक्यात दुष्काळग्रस्त शेतीच्या पंचनाम्यांना सुरुवात


चंद्रपूर तालुक्यात दुष्काळग्रस्त शेतीच्या पंचनाम्यांना सुरुवात

Ø 11 पथक प्रमुखांच्या नियंत्रणात संयुक्त पथकांकडून सर्वेक्षण

Ø  शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामे

चंद्रपूर, दि. 30 : शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीमध्ये चंद्रपूर तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. तालुक्यातील खरीप पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण व पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. चंद्रपूर तालुक्यात खरीप हंगामात सुमारे 17 हजार हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड करण्यात आली असून, या क्षेत्रातील पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्यात येणार आहेत.

याच अनुषंगाने वलनी येथील शेतकरी संतोष आत्राम यांच्या शेतामधील नुकसानग्रस्त धान पिकाची पाहणी चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, तहसीलदार विजय पवार, नायब तहसीलदार ओंकार ठाकरे, तालुका कृषी अधिकारी अनिकेत माने, मंडळ अधिकारी विशाल कुरेवार, तलाठी रमेश झिटे, पोलिस पाटील अशोक मेश्राम पोलीस पाटील, ई-पीक पाहणी सर्व्हेअर विशाल गेडाम यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी सुखदेव पेंदराम, वनपाल गेडाम, रोहित पेंद्राम हे शेतकरी सुध्दा उपस्थित होते.

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद व्हावी, कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहू नये आणि शासनाला अचूक माहिती उपलब्ध व्हावी, या दृष्टीने महसूल, ग्रामविकास आणि कृषी विभागाच्या समन्वयातून ही कार्यवाही राबविण्यात येत आहे. शेतपिकांचे पंचनामे ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि कृषी सहाय्यक यांच्यामार्फत संयुक्तरीत्या करण्यात येत आहेत. संबंधित पथक प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची पाहणी करणार असून, शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सर्वेक्षण व पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

11 पथक प्रमुखांकडून कामावर नियंत्रण : पंचनाम्याचे काम नियोजनबद्ध व गतीने पूर्ण करण्यासाठी चंद्रपूर तालुक्यात एकूण 11 पथक प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंडळ अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे पथक प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या नियंत्रणाखाली संबंधित गावांमध्ये संयुक्त पथकांमार्फत शेतपिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण व पंचनामे करण्यात येणार आहेत. पंचनाम्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता राहावी, प्रत्यक्ष नुकसानाची योग्य नोंद व्हावी तसेच पात्र शेतकऱ्यांची माहिती अचूकपणे संकलित व्हावी, यासाठी पंचनामे करताना संबंधित शेतकऱ्यांची उपस्थिती सुनिश्चित करण्यात येणार आहे. सर्वेक्षणादरम्यान पिकांची सद्यस्थिती व नुकसान याबाबत आवश्यक माहिती नोंदविण्यात येईल.

पंचनाम्यांच्या याद्या चावडीवर प्रसिद्ध होणार : संयुक्त पथकांमार्फत पंचनामे पूर्ण झाल्यानंतर तयार करण्यात आलेल्या याद्या संबंधित गावाच्या चावडीवर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पंचनाम्यामध्ये आपल्या नुकसानीची नोंद झाली आहे किंवा नाही, याची माहिती ग्रामस्तरावरच उपलब्ध होणार आहे.

००००००

क्षमता महिला सेवा सहकारी संस्थेबाबत 7 ऑक्टो रोजी सुनावणी

 क्षमता महिला सेवा सहकारी संस्थेबाबत 7 ऑक्टो रोजी सुनावणी

Ø हरकती असल्यास 7 ऑक्टोपूर्वी दाखल करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 30 : नियोजीत सक्षमता महिला सेवा सहकारी संस्था, मर्या. चंद्रपूर या सहकारी संस्थेचा नोंदणी प्रस्ताव सहायक निबंधक सहकारी संस्था या कार्यालयास प्राप्त झाला आहे. संस्थेच्या नोंदणी संबंधाने काही हरकती असल्यास या कार्यालयात 7 ऑक्टोबर पूर्वी सादर कराव्यात किंवा सुनावणीचे वेळी हरकती असल्यास दाखल कराव्यात.

या कार्यालयात विहित मुदतीत हरकती प्राप्त न झाल्यास किंवा सुनावणीला हजर न राहिल्यास संबंधीत सहकारी संस्थांना नोंदणी संबंधाने काही म्हणावयाचे नाही, असे गृहीत धरून पुढील कार्यवाही करण्यात येईल, याची चंद्रपूर तालुक्यातील बेरोजगार, सुशिक्षीत बेरोजगार, महिला बहुउद्देशिय व इतर बेरोजगार सेवा सहकारी संस्थांनी नोंद घ्यावी, असे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था एस.एस.तुपट यांनी कळविले आहे.

०००००

भारतीय सशस्त्र सैन्य दलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्ण संधी

 


भारतीय सशस्त्र सैन्य दलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्ण संधी

चंद्रपूर, दि. 30 :  भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना एसएसबी परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे नवयुवक व नवयुवतींसाठी 19 ते 28 ऑक्टोबर 2026 या कालावधीत प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे. सदर प्रशिक्षणासाठी निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात आली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, चंद्रपूर येथे 12 ऑक्टोबर रोजी मुलाखतीस हजर रहावे. एस.एस.बी. कोर्स मध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येतांना घेऊन येणे आवश्यक आहे

1) कम्बाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन अथवा नॅशनल डिफेन्स एकॅडमी एक्झामिनेशन  पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. 2) एन.सी.सी. स्पेशल एन्ट्री साठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे, 3) टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. 4) विद्यापीठ प्रवेश प्रणाली 4) साठी एस.एस.बी. कॉल लेटर असावे किंवा एस.एस.बी.साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक यांचा ईमेल आय डी -training.pctcnashik@gmail.com, व दूरध्वनी क्रमांक 0253-2451032 किंवा व्हाटसअप क्र. 9156073306 वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, चंद्रपूर यांनी केले आहे.

०००००००

सुरक्षा रक्षक पदाच्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी 12 ऑक्टोबरपासून

 

सुरक्षा रक्षक पदाच्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी 12 ऑक्टोबरपासून

चंद्रपूर, दि. 30 : चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या कार्यक्षेत्रातील चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याकरिता 396 सुरक्षा रक्षकांचा समुच्चय (पूल) तयार करण्यासाठी ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी 12 ऑक्टोबर 2026 पासून कामगार कल्याण मंडळ, बंगाली कॅम्प, चंद्रपूर येथे करण्यात येणार आहे.

उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाची प्रत, ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/ड्रायव्हिंग लायन्सन/मतदान कार्ड/पारपत्र) शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, जन्मतारखेचा पुरावा तसेच विशेष अर्हतेची प्रमाणपत्रे (असल्यास) यांची मूळ कागदपत्रे व प्रत्येकी एक स्वप्रमाणित छायांकित प्रत सोबत आणावी. उमेदवारांनी मंडळामार्फत निश्चित करण्यात आलेल्या, दिनांक व वेळेस अनिवार्यपणे उपस्थित राहावे. अनुपस्थित राहणाऱ्या उमेदवारास पुन्हा कोणतीही संधी देण्यात येणार नाही व त्याचा पुढील नोंदणी प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

सदर संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व संगणकीकृत पद्धतीने राबविण्यात येत असून उमेदवारांनी कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीच्या प्रलोभनास बळी पडू नये अथवा कोणताही आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहन अध्यक्ष तथा सहायक कामगार आयुक्त यांनी केले आहे.

०००००००

Tuesday, 29 September 2026

दुष्काळ निवारण उपाययोजनेसंदर्भात जिल्हाधिका-यांकडून आढावा


 

दुष्काळ निवारण उपाययोजनेसंदर्भात जिल्हाधिका-यांकडून आढावा

Ø विविध यंत्रणांना निर्देश

चंद्रपूर, दि. 29 : चंद्रपूर जिल्ह्यातील 15 पैकी 12 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळाच्या या पार्श्वभुमीवर विविध उपाययोजना करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी आज (दि.29) विविध विभागांची आढावा बैठक घेऊन निर्देश दिले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह उपस्थित होते.

राज्य शासनाने दुष्काळग्रस्त भागासाठी विशेष बाब म्हणून 12 प्रकारच्या उपाययोजना व सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगून जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, जमीन महसुलात सुट अंतर्गत प्रत्येक तालुकानिहाय किती सूट द्यायची आहे, ते त्वरीत कळवावे. पीक कर्जाचे पुनर्गठन अंतर्गत जिल्ह्यातील आतापर्यंत किती शेतक-यांना कर्जवाटप करण्यात आले, किती शेतक-यांची कर्जमाफी झाली, किती जणांच्या कर्जाचे पुनर्गठन करणे आवश्यक आहे, त्याबाबतची माहिती जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांनी त्वरीत द्यावी. तसेच 2 ऑक्टोबर रोजी होणा-या ग्रामसभेत कर्जाच्या पुनर्गठन संदर्भात माहिती देण्यासाठी बँक अधिका-यांना उपस्थित राहण्याचे निर्देश द्यावे.

शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती अंतर्गत बँकांना लेखी आदेश द्यावे. वसुली होत असल्यास व  याबाबत तक्रार आली तर संबंधित बँकेवर कारवाई करावी. दुष्काळग्रस्त तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचयतीमध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत किमान एक काम हाती घ्यावे. कृषी पंपाच्या चालू विजबिलात सूट संदर्भात महावितरणने नियोजन करावे. दुष्काळ निवारणासाठी वेगवेगळ्या विभागांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून प्रस्तावित कामे हाती घ्यावीत. या कामांची माहिती 2 ऑक्टोबरच्या ग्रामसभेत गावक-यांना द्यावी. तसेच उपविभागीय आणि तहसील स्तरावर सर्व विभागांची बैठक घ्यावी, अशा सुचना जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिल्या.

बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, उपजिल्हाधिकारी (रोहयो) शुभम दांडेकर, विभागीय वन अधिकारी राजन तलमले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायगुडे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुरेश कुमरे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक आशिष सोनोने, जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल बहादुरकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सलिम शेख आदी उपस्थित होते.

अशा आहेत 12 प्रकारच्या उपाययोजना व सवलती : दुष्काळग्रस्त क्षेत्रासाठी राज्य शासनाने विशेष बाब म्हणून पुढीलप्रमाणे सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यात 1) जमीन महसुलात सुट 2) पीक कर्जाचे पुनर्गठन 3) शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती 4) कृषी पंपाच्या चालू विजबिलात सुट 5) शालेय / महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्कात सुट 6) रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता आणून जास्तीत जास्त कामे सुरू करणे 7) आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर 8) टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतक-यांचा शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे 9) शेतीवर आश्रित शेतकरी / मजूर आदींना अन्नधान्‍याची टंचाई होणार नाही याबाबत व्यवस्था उभी करणे 10) जनावरांना आवश्यक चारा उपलब्ध होईल, याची व्यवस्था करणे 11) जलसंधारणाची कामे सुरू करणे 12) नागरिकांना पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी पाण्याचे नियोजन करणे.

०००००००

2 ऑक्टोबरला हर घर जल गावांमध्ये ‘जल अर्पण दिवस’


2 ऑक्टोबरला हर घर जल गावांमध्ये ‘जल अर्पण दिवस’

Ø पाणीपुरवठा योजनांचे ग्रामसमुदायाकडे औपचारिक हस्तांतरण

 

चंद्रपूर, दि. 29 : जल जीवन मिशन अंतर्गत गावातील पाणीपुरवठा योजनांचे औपचारिक हस्तांतरण ग्रामसमुदायाकडे करण्याच्या उद्देशाने राज्य पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 2 ऑक्टोबर 2026 रोजी ‘जल अर्पण दिवस’ साजरा करण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ‘हर घर जल’ घोषित झालेल्या  गावांमध्ये ज्या गावांतील पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे आणि पाणीपुरवठा योजना पूर्ण झालेल्या आहेत, अशा गावांमध्ये ‘जल अर्पण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

ग्रामपंचायत व ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजनेची प्रत्यक्ष पाहणी व तपासणी करण्यात येणार आहे. ग्रामसभेतून पाणी पुरवठा योजनेबाबत तसेच पाणी गुणवत्ता या बाबत जनजागृती करण्यात येणार आहे. ‘जल अर्पण’ कार्यक्रमाच्या दिवशी ग्रामसभेमध्ये  ग्रामस्थांना पाणीपुरवठा योजना, तिचे हस्तांतरण तसेच योजनेच्या देखभाल व दुरुस्तीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यक्रमात महिला बचत गट, युवक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षक, ग्रामस्थ, भजनी मंडळे आणि लोकप्रतिनिधी यांचा सक्रिय सहभाग घेण्यात येणार असून सकाळी प्रभात फेरीचे आयोजन केले जाणार आहे.

 ‘जल अर्पण’ कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याच्या टाकीला ‘जल बंधन’ करण्यात येणार आहे. यामधून “आजपासून ही पाणीपुरवठा योजना गावाची असून, तिची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी गावाची राहील” असा संदेश पाणी पुरवठा विभागातर्फे ग्रामस्थांना देण्यात येणार आहे. गावातील पाणीपुरवठा योजना केवळ शासनाची मालमत्ता न राहता ग्रामसमुदायाच्या सहभागातून तिचे योग्य व्यवस्थापन, देखभाल व संवर्धन व्हावे, हा ‘जल अर्पण’ उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

त्यामुळे सर्व पात्र गावांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक बाबींची पूर्तता करून गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, ग्रामसेवक, पाणी पुरवठा व स्वच्छता समिती  यांनी 2 ऑक्टोबर रोजी ‘जल अर्पण’ कार्यक्रम उत्साहात साजरा करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकीत सिंग यांनी केले आहे.

०००००००

तालुका पातळीवर सफाईमित्र सुरक्षा सेवा आणि सन्मान शिबिराचे आयोजन

 

तालुका पातळीवर सफाईमित्र सुरक्षा सेवा आणि सन्मान शिबिराचे आयोजन

चंद्रपूर, दि. 29 : ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत सफाईमित्रांच्या आरोग्याची काळजी, सुरक्षिततेला प्राधान्य आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी तालुका पातळीवर ‘सफाईमित्र सुरक्षा सेवा आणि सन्मान शिबिर’ आयोजित करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी केले आहे.

सफाईमित्र हे स्वच्छ आणि निरोगी समाजाच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांच्या कामाच्या ठिकाणी निर्माण होणारे धोके लक्षात घेता त्यांना आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध करून देणे, त्यांचा योग्य वापर करण्याबाबत मार्गदर्शन करणे तसेच नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे. या अनुषंगाने तालुकास्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या शिबिरामध्ये सफाईमित्रांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी, आवश्यक लसीकरण, आजार प्रतिबंध व आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात यावे. तसेच कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेचे नियम, संभाव्य धोके व प्रतिबंधात्मक उपाय याबाबत मार्गदर्शन करावे. सफाईमित्रांनी काम करताना हातमोजे, मास्क, गमबूट, हेल्मेट, सुरक्षा जॅकेट यांसारख्या वैयक्तिक संरक्षणात्मक साधनांचा योग्य वापर करावा, याबाबतही शिबिरातून प्रबोधन करण्यात यावे. ‘सुरक्षित काम, सुरक्षित जीवन’ हा संदेश सफाईमित्रांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात येणार आहे.

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सफाईमित्रांचा सन्मान : स्वच्छता व्यवस्थेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सफाईमित्रांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव व सन्मान करावा. सफाईमित्रांच्या योगदानाला सामाजिक प्रतिष्ठा मिळावी आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी सांगितले.

स्वच्छ भारत मिशन, जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या माध्यमातून हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी संबंधित पंचायत समित्या, ग्रामपंचायती, आरोग्य विभाग आणि स्वच्छता यंत्रणेने समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

०००००००

‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियान जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न


 ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियान जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न

चंद्रपूर,दि.29 : जिल्ह्यात 'माझं गाव आरोग्य संपन्न गाव' अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना शिरसागर मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा घेण्यात आली.

प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी मीना साळुंके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, कार्यकारी अभियंता संदीप खांबाईत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्रनाथ धस, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. स्नेहल कासारे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. लक्षदीप पारेकर, सहाय्यक संचालक डॉ. संदिप गेडाम, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रकाश साठे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ललित पटले तसेच विभागीय समन्वयक सविता गजभिये व रजनी गजभिये आदी उपस्थित हेाते.

कार्यशाळेचा उद्देश व सहभाग : ग्रामीण भागातील आरोग्यमान सुधारण्यासाठी राज्य शासनाने 1 एप्रिल 2026 पासून 'माझं गाव आरोग्य संपन्न गाव' हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानांतर्गत चंद्रपूर जिल्ह्याला एक निरोगी, सक्षम, जागरूक आणि सशक्त जिल्हा घडविण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील सर्व नागरिकांचा लोकसहभाग अत्यंत आवश्यक आहे. गावोगावी आरोग्य सेवा अधिक बळकट करणे आणि अभियानाची उद्दिष्टे तळागाळापर्यंत पोहोचवणे हा या कार्यशाळेचा मुख्य हेतू आहे.

 कार्यशाळेचे संचालन भावना सोडवले यांनी तर आभार जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी उज्वला सातपुते यांनी मानले. या कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील गटविकास अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, विस्तार अधिकारी (आरोग्य), विस्तार अधिकारी (पंचायत), ग्रामपंचायत अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक/सेविका, तालुका समूह संघटक, गटप्रवर्तक  असे एकूण 200 तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

००००००

मासळ येथे सर्वकष प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण


मासळ येथे सर्वकष प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण

चंद्रपूर, दि. 29 : ग्रामीण भागातील नागरिकांना गावपातळीवरच सर्वकष आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, मासळ (ता. चिमूर) येथे दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या डॉ. मिना मडावी यांच्या नियोजनातून हे प्रशिक्षण पार पडले. प्रशिक्षणात 57 प्रशिक्षणार्थीनी सहभाग घेतला.

ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करणे, आरोग्य कर्मचाऱ्यांचे ज्ञान, कौशल्य व कार्यक्षमता वाढविणे हा प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश आहे. गावपातळीवरच अधिकाधिक आजारांचे निदान व उपचार करून अनावश्यक संदर्भीकरण टाळण्यासाठी "अधिक सेवा, कमी संदर्भ या संकल्पनेवर काम करण्यावर भर देण्यात आला.

प्रशिक्षणात 13 प्रमुख घटकावर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये 1) गरोदरपण, प्रसूती व प्रसूती पश्चात काळजी, 2) नवजात व अर्भक आरोग्य सेवा, 3) बालक व किशोरवयीन आरोग्य, 4) कुटुंब नियोजन व प्रजनन आरोग्य, 5) संसर्गजन्य आजाराचे व्यवस्थापन, 6) सामान्य व किरकोळ आजाराचे उपचार, 7) असंसर्गजन्य आजाराचे प्रतिबंध व नियंत्रण, 8) डोळे व कान यांचे प्राथमिक आरोग्य, 9) मौखिक आरोग्य सेवा, 10) वृद्धापकाळ व पेलटिव्ह केअर, 11) आपत्कालीन वैद्यकीय सेवा, 12) मानसिक आरोग्य, 13) योग व आयुष पद्धती या सेवांचा समावेश आहे.

याशिवाय प्रभावी संवाद कौशल्य, साकारात्मक देहबोली, रुग्णांशी आपुलकीने संवाद साधणे आणि नेतृत्व कौशल्य याबाबतही प्रशिक्षण देण्यात आले. माता व बालमृत्यू कमी करणे, असंसर्गजन्य आजारांचे वेळेत तपासणी करणे, नियमित गृहभेटी तसेच आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून आरोग्य सेवा अधिक प्रभावी करण्यावर विशेष भर देण्यात आला.

प्रशिक्षणात डॉ. प्रिती राजगोपाल, डॉ. गजानन राऊत, डॉ. मिना मडावी, डॉ. संदीप भटकर, डॉ. भावेश वानखेडे, डॉ. मनोज शेंडे, डॉ. किशोर भट्टाचार्य, शोभा नैनावत, वंदना किन्नाके, रमेश घुटके यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. प्रशिक्षणात वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, गटप्रवर्तक तसेच आशा स्वयंसेविकासह 57 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले.

००००००

5 ऑक्टोबर रोजी वरोरा पोलिस स्टेशन येथील बेवारस वाहनाचा लिलाव


5 ऑक्टोबर रोजी वरोरा पोलिस स्टेशन येथील बेवारस वाहनाचा लिलाव

            चंद्रपूर, दि.29 : उपविभागीय अधिकारी, वरोरा यांच्या आदेशानुसार पोलिस स्टेशन वरोरा येथील अपघातातील तसेच बेवारस स्थितीत असलेल्या 28 दुचाकी वाहनांचा 5 ऑक्टोबर 2026 रोजी लिलाव करण्यात येणार आहे. लिलावधारकांनी आपले लायसन्स व 20 हजार रुपये अनामत रक्कमेसह सदर दिवशी सकाळी 11 वाजता पोलिस स्टेशनला हजर राहावे, असे पोलिस निरीक्षक वरोरा यांनी कळविले आहे.

००००००

Monday, 28 September 2026

नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा – जिल्हाधिकारी वसुमना पंत



नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा – जिल्हाधिकारी वसुमना पंत

Ø ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहाय्यकांनी समन्वयाने काम करावे

Ø तहसीलदारांना दररोज आढावा घेण्याचे निर्देश

चंद्रपूर, दि. 28 : दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेले नुकसान हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या शेतापर्यंत प्रशासन पोहोचले पाहिजे. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे वस्तुनिष्ठ, गांभीर्याने आणि संवेदनशीलपणे करून त्याचा अहवाल दररोज सादर करावा. एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्यांच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. पुढे त्या म्हणाल्या, चंद्रपूर जिल्ह्यातील 12 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळावी, या दृष्टीने शासनाची भूमिका आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेने पंचनाम्याच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. पीकपेरा व प्रत्यक्ष नुकसान यांची खातरजमा करून ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी सहाय्यक यांनी संयुक्तपणे शेतावर जाऊन पंचनामे करावेत..

 पिकांचे नुकसान हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने कळीचा विषय आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याने या कामाकडे संवेदनशीलतेने पाहावे. आपल्या परिसरात नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू झाले आहेत आणि प्रशासन आपल्या शेतापर्यंत पोहोचत आहे, हा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला पाहिजे, असे जिल्हाधिकारी पंत यांनी सांगितले. तालुकास्तरावर तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांनी परस्पर समन्वय ठेवून पंचनाम्याच्या कामावर बारकाईने लक्ष द्यावे. ग्रामस्तरावर ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी सहाय्यकांच्या संयुक्त पथकांनी काम करावे. तहसीलदारांनी या कामाचा दररोज आढावा घेऊन प्रगती अहवाल सादर करावा, असेही त्यांनी निर्देशित केले.

पंचनाम्याच्या कामात हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असे स्पष्ट करत जिल्हाधिकारी म्हणाल्या की, ग्रामसेवक, तलाठी, कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यकांकडून काम व्यवस्थित होत नसल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत वरिष्ठांकडे तातडीने अहवाल सादर करावा. तहसीलदारांनीही अधूनमधून प्रत्यक्ष पंचनामा सुरू असलेल्या ठिकाणी भेट देऊन कामाची पडताळणी करावी.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी सांगितले की, पिकांचे नुकसान वेगवेगळ्या टप्प्यांवर आणि विविध स्वरूपात दिसून येऊ शकते. त्यामुळे पंचनामे करताना संभाव्य नुकसानीचे सर्व पैलू विचारात घेणे आवश्यक आहे. केवळ पीक हिरवे दिसत आहे म्हणून त्याचे नुकसान झालेले नाही, असा निष्कर्ष काढू नये. प्रत्यक्ष उत्पादनावर होणारा परिणाम आणि पिकाची सद्यस्थिती यांचेही योग्य मूल्यमापन करावे.

ऑक्टोबरमधील वाढत्या तापमानामुळे पिकांच्या नुकसानीत आणखी भर पडण्याची शक्यता लक्षात घेऊन कृषी व महसूल यंत्रणेने सतर्क राहावे. तालुका कृषी अधिकारी आणि तहसीलदारांनी समन्वयाने काम करून शेतकऱ्यांच्या तक्रारींना तत्काळ प्रतिसाद द्यावा. कोणतेही गाव किंवा नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, उपविभागीय कृशी अधिकारी गजानन पवार, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्री. सोनोने यांच्यासह दूरदृष्यप्रणालीद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

००००००

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून धान पिकाची पाहणी



दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून धान पिकाची पाहणी

Ø मूल तालुक्यातील चिखली, डोंगरगाव व राजोली येथील पीक परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा

चंद्रपूर, दि. 28 : पावसाच्या कमतरतेमुळे निर्माण झालेल्या संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी मूल तालुक्यातील चिखली, डोंगरगाव व राजोली येथे प्रत्यक्ष शेतात जाऊन भात पिकाच्या सद्यस्थितीची पाहणी केली. पावसाअभावी पिकांच्या वाढीवर झालेला परिणाम, उपलब्ध पाण्याची स्थिती तसेच शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींची माहिती त्यांनी यावेळी घेतली.

पाहणीदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी, पुलकित सिंग, उपविभागीय अधिकारी आनंद जाधव, तहसीलदार मृदुला मोरे, तालुका कृषी अधिकारी सुनील कारडवार यांच्यासह महसूल व कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक शेतकरी उपस्थित होते.

चिखली येथे जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी शेतकरी सविता गुणाजी कडस्कर यांच्या शेतातील भात पिकाची पाहणी केली. उशिरा झालेली भात लागवड आणि पावसाची कमतरता यामुळे पिकाची वाढ अपेक्षेप्रमाणे झाली नसल्याचे तसेच फुटव्यांची संख्या कमी असल्याचे यावेळी निदर्शनास आले.

त्यानंतर शेतकरी नरेश योगेश्वर कडस्कर यांच्या शेतातील भात पिकाची पाहणी करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पीक परिस्थिती, पाण्याची उपलब्धता आणि पिकांच्या वाढीबाबत माहिती जाणून घेतली.

डोंगरगाव येथे संजय यादव गेडाम यांच्या शेतातील तर राजोली येथे रमेश चितावार यांच्या शेतातील भात पिकाची पाहणी करण्यात आली. या ठिकाणीही पावसाच्या कमतरतेचा पिकांच्या वाढीवर परिणाम झाल्याचे तसेच भात पिकामध्ये फुटव्यांची संख्या कमी असल्याचे आढळून आले.

ई-पीक पाहणी तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना

दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी ई-पीक पाहणीच्या कामाचाही आढावा घेतला. एकूण खातेदारांपैकी किती खातेदारांची ई-पीक पाहणी पूर्ण झाली आहे, याबाबत माहिती घेतली. ई-पीक पाहणी करताना येणाऱ्या अडचणी जाणून घेत उर्वरित खातेदारांची ई-पीक पाहणी लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या.

शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतावर मार्गदर्शन करा 

पिकांची सद्यस्थिती लक्षात घेता कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या संपर्कात राहून त्यांना आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिले. तालुका कृषी अधिकारी सुनील कारडवार यांच्याकडून भात पिकावरील रोग व कीड नियंत्रणासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना तसेच त्यासंदर्भातील जनजागृती व प्रचार-प्रसिद्धीचा आढावाही त्यांनी घेतला.

पावसाची कमतरता लक्षात घेऊन कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतांना भेटी द्याव्यात. भात पिकावरील कीड व रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. तसेच उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन व व्यवस्थापन करण्यासंदर्भात शेतकऱ्यांना आवश्यक तांत्रिक सल्ला द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिले.

0000000

आदर्श आचारसंहितेचे गांभिर्याने पालन करा – जिल्हाधिकारी पंत



आदर्श आचारसंहितेचे गांभिर्याने पालन करा – जिल्हाधिकारी पंत

Ø महाराष्ट्र विधान परिषद नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणूक

चंद्रपूर दि. 28 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघांच्या द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी 23 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान होणार असून नागपूर विभागातील जिल्ह्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. सर्व संबंधित विभागांनी आदर्श आचारसंहितेचे गांभिर्याने पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे नोडल अधिका-यांचा आढावा घेतांना त्या बोलत होत्या. पुढे जिल्हाधिकारी म्हणाल्या, निवडणुकांमध्ये सर्व संबंधित विभागांना देण्यात आलेली जबाबदारी अतिशय काळजीपूर्वक आणि गांभिर्याने पार पाडणे अपेक्षित असते. यात कोणतीही चूक होता कामा नये. आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता सर्वांनी घ्यावी. आचारसंहितेमधून दुष्काळी उपाययोजना, नुकसानीचे पंचनामे यांना सूट देण्यात आली आहे. त्यामुळे पंचनामे थांबवू नये. जिल्ह्याच्या सीमेवर एसएसटी/एफएसटी आदी पथकांची नियुक्ती करावी. आतापासूनच मतदान केंद्राची तपासणी करून किरकोळ दुरुस्ती असल्यास करून घ्यावी, अशा सुचना त्यांनी दिल्या.

बैठकीला मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संजीव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपजिल्हाधिकारी संजय पवार, शुभम दांडेकर, नगर पालिका प्रशासन अधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांच्यासह दूरदृष्यप्रणालीद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार उपस्थित होते.

असा आहे निवडणूक कार्यक्रम : 29 सप्टेंबर 2026 रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 6 ऑक्टोबर असून, 7 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 9 ऑक्टोबर आहे. 23 ऑक्टोबर रोजी मतदान झाल्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 31 ऑक्टोबर २०२६ पूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे.

0000000

ग्रामीण महिला व युवतींसाठी कौशल्य प्रशिक्षण व स्वयंरोजगाराच्या संधी

 

ग्रामीण महिला व युवतींसाठी कौशल्य प्रशिक्षण व स्वयंरोजगाराच्या संधी

Ø जिल्हा परिषदेचे ‘ग्रामसमृद्धी’ पोर्टल कार्यान्वित

चंद्रपूर, दि. 28 : ग्रामीण भागातील महिला व युवतींना कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी करण्यासाठी जि.प. महिला व बालकल्याण विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत सुलभपणे पोहोचविण्यासाठी ‘ग्रामसमृद्धी’ हे स्वतंत्र ऑनलाइन पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे.

महिला व युवतींच्या कौशल्य विकासाला चालना देणे, रोजगार व स्वयंरोजगारासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करणे आणि त्यांच्यासाठी उत्पन्नाचे शाश्वत साधन निर्माण करणे हा या योजनांचा प्रमुख उद्देश आहे. यासोबतच मुला-मुलींना इयत्ता 10 वी व 12 वी नंतरच्या उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचाही विविध योजनांमध्ये समावेश आहे.

आवडीनुसार कौशल्य प्रशिक्षण : महिला व बालकल्याण विभागाच्या योजनेंतर्गत पात्र महिला व युवतींना त्यांच्या आवडी, गरज आणि उपलब्ध संधींनुसार विविध व्यवसाय व कौशल्याधारित प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणातून व्यवसायासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याबरोबरच स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

ऑनलाइन अर्जाची सुविधा : या योजनांसाठीची अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने gramsamruddhi.in/wcdscheme हे स्वतंत्र ऑनलाइन पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे. या पोर्टलवर विविध योजनांची माहिती, पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे तसेच ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज सादर करावा.

पात्र महिलांनी लाभ घ्यावा – पुलकित सिंह

ग्रामीण भागातील अधिकाधिक महिला व युवतींना कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देऊन स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा जिल्हा परिषदेचा उद्देश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र व इच्छुक महिला व युवतींनी ‘ग्रामसमृद्धी’ पोर्टलवर उपलब्ध योजनांची माहिती घेऊन या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी केले आहे.

0000000