Search This Blog

Thursday, 17 September 2026

गणेशोत्सवानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विशेष आरोग्य शिबिरे

 गणेशोत्सवानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विशेष आरोग्य शिबिरे

Ø नागरिकांना परिसरातच मिळणार मोफत आरोग्य तपासणी व उपचार मार्गदर्शन

चंद्रपूर, दि. 17 : गणेशोत्सवनिमित्त नागरिकांना दर्जेदार, सुलभ आणि मोफत आरोग्य सेवा त्यांच्या परिसरातच उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध सार्वजनिक गणेश मंडळे, सार्वजनिक ठिकाणे तसेच नागरिकांच्या परिसरात आयोजित करण्यात येणारा हा उपक्रम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.

गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने भाविक आणि नागरिक विविध ठिकाणी एकत्र येतात. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे, विविध आजारांचे लवकर निदान करणे आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविणे, हा या विशेष आरोग्य शिबिरांचा प्रमुख उद्देश आहे.

या शिबिरांमध्ये सर्वसाधारण आरोग्य तपासणी, रक्तदाब व मधुमेह तपासणी, असंसर्गजन्य आजारांचे स्क्रीनिंग, माता व बाल आरोग्य सेवा, आवश्यक औषधांचे मोफत वितरण आदी आरोग्य सेवा देण्यात येणार आहेत. तपासणीदरम्यान पुढील उपचारांची आवश्यकता आढळल्यास संबंधित रुग्णांना आवश्यकतेनुसार उच्चस्तरीय आरोग्य संस्थांकडे संदर्भित करण्यात येणार आहे.

सर्वसामान्य नागरिकांसह महिला, ज्येष्ठ नागरिक, किशोरवयीन मुली तसेच विविध आजारांनी ग्रस्त रुग्णांना या शिबिरांचा लाभ घेता येणार आहे. नागरिकांच्या परिसरातच प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध झाल्यामुळे आजारांचे वेळेत निदान होऊन आवश्यक उपचारासाठी योग्य मार्गदर्शन मिळण्यास मदत होणार आहे.

18 सप्टेंबर रोजी येथे आहे आरोग्य शिबीर : ओम श्री राम गणेश मंडळ, विवेकानंद वॉर्ड, आणि एकता गणेश मंडळ, कन्नमवार वॉर्ड, बल्लारपूर (वेळ : दुपारी 2 ते सायं. 6), शिंदे ले-आऊट, भद्रावती (दुपारी 12 ते 4), विघ्नहर्ता गणेश मंडळ, ब्रम्हपुरी (12 ते 4), ओंकार गणेश मंडळ, वॉर्ड क्र. 2 चिमूर (10 ते 2), एकदंत गणेश मंडळ, वॉर्ड क्र. 4 आणि हनुमान गणेश मंडळ, वॉर्ड क्र. 3 कोरपना (2 ते 6), जिजामाता नगर, गडचांदूर (2 ते 6), हनुमान मंदीर, वरोरा (10 ते 2) आणि हनुमान मंदीर, सरदार पटेल वॉर्ड, वरोरा (3 ते 5), शिव बाल गणेश मंडळ, रमाबाई वॉर्ड, राजुरा (10 ते 2), ढाबा रोड कॉर्नर, गोंडपिपरी (10 ते 2) आणि बोथली रोड, नागभीड (दुपारी 2 ते सायं. 5 वाजेपर्यंत)

नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कटारे

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील नागरिकांनी गणेशोत्सवानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या या विशेष आरोग्य शिबिरांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. तसेच आपल्या कुटुंबातील सदस्य आणि परिसरातील नागरिकांनाही शिबिरात आरोग्य तपासणी करून घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी केले आहे.

 

००००००

No comments:

Post a Comment