विशेष लेख :
विद्यार्थी बोलणार, शासन ऐकणार
Ø भरती परीक्षा सुधारणांसाठी शासनाचा संवाद
Ø सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह परीक्षा व्यवस्थेकडे वाटचाल
चंद्रपूर : शासकीय नोकरीचे स्वप्न उराशी बाळगून राज्यातील लाखो युवक-युवती स्पर्धा परीक्षांसाठी दिवस-रात्र मेहनत घेतात. अभ्यासाचे नियोजन, आर्थिक अडचणींवर मात, अनेकदा घरापासून दूर राहून तयारी आणि त्यासाठी दिलेली आयुष्यातील महत्त्वाची वर्षे—या सगळ्याचा विचार करता प्रत्येक उमेदवाराला निष्पक्ष, सुरक्षित आणि पारदर्शक परीक्षा व्यवस्था मिळणे, ही त्याची रास्त अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांच्या याच अपेक्षेला केंद्रस्थानी ठेवून महाराष्ट्र शासनाने भरती परीक्षा व्यवस्थेत व्यापक सुधारणा करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे.
राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 4 सप्टेंबर 2026 रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत केला आहे. राज्यातील सध्याच्या भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्याची जबाबदारी या टास्क फोर्सवर सोपविण्यात आली आहे. मात्र या उपक्रमाचे वैशिष्ट्य केवळ टास्क फोर्सच्या स्थापनेपुरते मर्यादित नाही. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष अनुभव काय आहेत, त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो आणि परीक्षा व्यवस्थेत कोणते बदल अपेक्षित आहेत, हे जाणून घेण्यासाठी टास्क फोर्स स्वतः राज्यातील सर्व सहा विभागांमध्ये जाऊन संवाद साधणार आहे.
विद्यार्थ्यांचा आवाज थेट शासनापर्यंत : कोणत्याही परीक्षा व्यवस्थेतील सुधारणा प्रभावी होण्यासाठी प्रत्यक्ष परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचे अनुभव महत्त्वाचे असतात. याच भूमिकेतून विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था आणि अन्य संबंधित घटकांशी थेट संवाद साधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षा अर्जापासून प्रत्यक्ष परीक्षा, परीक्षा केंद्रावरील व्यवस्था, सुरक्षा, तांत्रिक बाबी आणि एकूण प्रक्रियेतील पारदर्शकता यासंदर्भातील विद्यार्थ्यांच्या सूचना, अडचणी व अभिप्राय टास्क फोर्स जाणून घेणार आहे. यातून शासनाच्या सुधारणा प्रक्रियेत विद्यार्थ्यांना केवळ लाभार्थी न मानता सक्रिय भागीदार म्हणून सहभागी करून घेण्याचा दृष्टिकोन अधोरेखित होत आहे.
एका महिन्यात सहाही विभागांत संवाद : 1) पुणे विभाग — 12 सप्टेंबर 2026, स्थळ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, ई-मेल : pune-examreformstaskforce@
2) नागपूर विभाग — 16 सप्टेंबर 2026, स्थळ : डीपीडीसी हॉल, नियोजन भवन, सदर पोलीस स्टेशनच्या मागे, सिव्हिल लाइन्स, नागपूर, ई-मेल : nagpur-examreformstaskforce@
3) अमरावती विभाग — 17 सप्टेंबर 2026, स्थळ : अमरावती, ई-मेल : amravati-examreformstaskforce@
4) छत्रपती संभाजीनगर विभाग — 21 सप्टेंबर 2026, स्थळ : स्मार्ट सिटी कार्यालय, आमखास मैदानाजवळ, छत्रपती संभाजीनगर, ई-मेल : csn-examreformstaskforce@
5) कोकण विभाग — 29 सप्टेंबर 2026, स्थळ : चेतना महाविद्यालय व मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई, ई-मेल : konkan-examreformstaskforce@
6) नाशिक विभाग — 30 सप्टेंबर 2026, स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक, ई-मेल : nashik-examreformstaskforce@
या संवाद प्रक्रियेमुळे विदर्भापासून कोकणापर्यंत आणि उत्तर महाराष्ट्रापासून पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यापर्यंत विविध भागांतील उमेदवारांचे अनुभव व अपेक्षा टास्क फोर्सपर्यंत पोहोचू शकणार आहेत.
गैरप्रकारांना प्रतिबंध; परीक्षा सुरक्षेवर विशेष भर : भरती प्रक्रियेवरील विश्वास टिकवून ठेवण्यासाठी परीक्षेची निष्पक्षता आणि सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. कोणत्याही गैरप्रकारामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या उमेदवारावर अन्याय होऊ नये, यासाठी परीक्षा व्यवस्थेतील संभाव्य त्रुटी ओळखून त्यावर प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे. राज्यव्यापी संवादातून प्राप्त सूचना व अभिप्रायांचा टास्क फोर्स सखोल अभ्यास करणार आहे. त्याआधारे भरती परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध करणे, परीक्षा सुरक्षा अधिक मजबूत करणे, प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढविणे तसेच परीक्षा व्यवस्था अधिक उमेदवाराभिमुख करणे यासाठी आवश्यक सुधारणांच्या शिफारशी शासनाला सादर करण्यात येणार आहेत.
गुणवत्तेला न्याय देणाऱ्या व्यवस्थेकडे वाटचाल : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मेहनतीला आणि गुणवत्तेला न्याय मिळण्याचा विश्वास. परीक्षेचे नियम स्पष्ट असावेत, प्रत्येक उमेदवाराला समान संधी मिळावी आणि संपूर्ण प्रक्रिया विश्वासार्ह असावी, ही विद्यार्थ्यांची मूलभूत अपेक्षा आहे. विशेषतः ग्रामीण, दुर्गम आणि सर्वसामान्य कुटुंबांतील अनेक युवक-युवती शासकीय सेवेला आपल्या भविष्याचा आधार मानून स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. अनेक कुटुंबे आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी आणि परीक्षेच्या तयारीसाठी आर्थिक भारही उचलतात. अशा परिस्थितीत परीक्षा व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास ही अत्यंत महत्त्वाची बाब ठरते.
म्हणूनच भरती परीक्षा सुधारणांच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना थेट सहभागी करून घेण्याचा शासनाचा निर्णय महत्त्वपूर्ण आहे. यामुळे प्रत्यक्ष अनुभवातून पुढे आलेल्या समस्यांची नोंद होण्यासोबतच त्यावर व्यवहार्य उपाय शोधण्यासही मदत होणार आहे.
विद्यार्थ्यांनीही पुढे यावे : टास्क फोर्सचा हा राज्यव्यापी संवाद म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आपले मत शासनापर्यंत पोहोचविण्याची महत्त्वाची संधी आहे. परीक्षा पद्धतीत सुधारणा व्हावी, अशी अपेक्षा असलेल्या उमेदवारांनी केवळ समस्या मांडण्यापुरते मर्यादित न राहता त्यावरील व्यवहार्य उपाय आणि सूचना देखील मांडणे गरजेचे आहे. परीक्षा सुरक्षा, पारदर्शकता, तांत्रिक व्यवस्था, उमेदवारांना मिळणाऱ्या सुविधा, प्रक्रियेतील सुलभता किंवा अन्य कोणत्याही बाबतीत विद्यार्थ्यांना आलेले अनुभव भविष्यातील सुधारणा निश्चित करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
शासन ऐकणार, विद्यार्थी बोलणार आणि अनुभवातून सुधारणा घडणार, ही या उपक्रमाची महत्त्वाची दिशा आहे. भरती परीक्षा अधिक सुरक्षित करणे म्हणजे केवळ परीक्षेचे व्यवस्थापन सुधारणे नव्हे, तर प्रामाणिकपणे मेहनत करणाऱ्या प्रत्येक युवक-युवतीच्या स्वप्नाचे संरक्षण करणे होय. विद्यार्थ्यांचे म्हणणे प्रत्यक्ष ऐकून, त्यांच्या अनुभवांचा अभ्यास करून आणि त्यातून आवश्यक सुधारणा निश्चित करण्याच्या दिशेने महाराष्ट्र शासनाने सुरू केलेला हा राज्यव्यापी संवाद त्यामुळे विशेष महत्त्वाचा ठरतो.
पारदर्शक प्रक्रिया, सुरक्षित परीक्षा, गुणवत्तेला न्याय आणि विद्यार्थ्यांचा विश्वास—या चार आधारस्तंभांवर अधिक सक्षम व उमेदवाराभिमुख भरती व्यवस्था उभारण्याच्या दिशेने महाराष्ट्राने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे.
००००००

No comments:
Post a Comment