‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत पारधी समाजासाठी विशेष मेळावे
Ø पारधी बांधवांना विविध शासकीय दाखल्यांचे वाटप
चंद्रपूर, दि. 23 : शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आणि सेवा आदिवासी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूरच्या वतीने कोरपना आणि राजुरा तालुक्यात पारधी व इतर आदिवासी बांधवांसाठी विशेष शिबिरे आयोजित करून नागरिकांना विविध शासकीय योजना, सेवा व सुविधांची माहिती देण्यासोबतच आवश्यक शासकीय दाखले उपलब्ध करून देण्यात आले.
17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत आदिवासी समाजामध्ये शासनाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती पोहोचविणे, पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देणे आणि शासकीय सेवा अधिक सुलभपणे उपलब्ध करून देणे हा अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.
रुपापेठ येथे विशेष शिबिर
21 सप्टेंबर रोजी शासकीय आश्रमशाळा, रुपापेठ, ता. कोरपना येथे पारधी व इतर आदिवासी बांधवांसाठी विशेष शिबिर घेण्यात आले. यावेळी नागरिकांना विविध शासकीय योजना, त्यासाठी आवश्यक पात्रता, कागदपत्रे आणि उपलब्ध सेवांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शिबिराला कोरपनाच्या नायब तहसीलदार करिष्मा वासेकर, आदिवासी विकास निरीक्षक अमोल नवलकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. नागेश ढाले, ग्राम महसूल अधिकारी पूजा टेकाम, मंडळ अधिकारी दिगांबर गेडाम, ग्रामपंचायत अधिकारी अश्विनी कुळमेथे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. गटविकास अधिकारी श्री. बोबडे यांनी शिबिराला भेट देऊन ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची पाहणी केली तसेच उपस्थित अधिकारी-कर्मचारी व नागरिकांकडून अभियानाच्या अंमलबजावणीची माहिती जाणून घेतली.
हिरापूर-निमणी येथे पारधी समाज जागृती मेळावा
दि. 22 सप्टेंबर रोजी मौजा हिरापूर-निमणी, ता. राजुरा येथे पारधी समाज जागृती मेळावा आणि पारधी बांधवांना विविध शासकीय दाखल्यांचे वितरण करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात पारधी समाजातील नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, सेवा आणि सुविधांची माहिती देण्यात आली. तसेच पात्र नागरिकांना आवश्यक कागदपत्रे व शासकीय दाखले उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी मार्गदर्शन व कार्यवाही केली. यावेळी नायब तहसीलदार सुचिता पवार, आदिवासी विकास निरीक्षक अमोल नवलकर, अमोल शिंदे, मंडळ अधिकारी व्ही. व्ही. रामटेके, ग्राम महसूल अधिकारी पी. बी. भोयर, ग्रामपंचायत अधिकारी सुभाष सारये यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शासकीय सेवा शेवटच्या घटकापर्यंत
‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत आदिवासी समाजातील नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजना व सेवा प्रत्यक्ष पोहोचविणे, योजनांबाबत जनजागृती करणे तसेच पात्र लाभार्थ्यांना आवश्यक शासकीय दाखले व सुविधांचा लाभ मिळवून देण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. रुपापेठ आणि हिरापूर-निमणी येथे आयोजित उपक्रमांना पारधी व आदिवासी बांधवांचा प्रतिसाद मिळाला.
शासनाच्या योजना व सेवा गावपातळीवर उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमाबाबत उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले. आदिवासी व पारधी समाजातील पात्र नागरिकांनी अभियानांतर्गत आयोजित शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
0000000
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment