Search This Blog

Wednesday, 16 September 2026

मतदार नोंदणीसाठी चार दिवस विशेष शिबिरे


 

मतदार नोंदणीसाठी चार दिवस विशेष शिबिरे

Ø 19, 20, 26 व 27 सप्टेंबरला सर्व मतदान केंद्रांवर आयोजन

Ø नवमतदारांसह महिला व दिव्यांगांच्या नोंदणीवर विशेष भर

चंद्रपूर, दि. 16 : विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम-2026 अंतर्गत पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांतील मतदान केंद्रांवर 19, 20, 26 आणि 27 सप्टेंबर 2026 रोजी विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या विशेष मोहिमेचा लाभ घेऊन मतदार यादीतील आपली नोंद अद्ययावत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नागरिकांकडून नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतील नोंदींमध्ये दुरुस्ती तसेच नाव वगळण्यासाठी अर्ज स्वीकारण्यात येत आहेत.

1 ऑक्टोबर 2026 रोजी किंवा त्यापूर्वी 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या युवक-युवतींना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी उपलब्ध आहे. तसेच गैरहजर, स्थलांतरित अथवा अन्य कारणांमुळे प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट नसलेल्या पात्र नागरिकांना त्यांच्या सध्याच्या सर्वसाधारण रहिवासाच्या ठिकाणी नव्याने नाव नोंदविता येणार आहे.

सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत शिबिरे : जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांतील सर्व मतदान केंद्रांवर शनिवार 19 सप्टेंबर,  रविवार 20 सप्टेंबर,  शनिवारी 26 सप्टेंबर आणि रविवार 27 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत विशेष शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या दिवशी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) मतदान केंद्रांवर उपस्थित राहतील. नागरिकांकडून नवीन मतदार नोंदणीसाठी नमुना 6, नाव वगळण्यासाठी नमुना 7 तसेच दुरुस्ती व स्थलांतरासाठी नमुना 8 मधील अर्ज स्वीकारण्यात येतील. विशेषतः महिला आणि दिव्यांग व्यक्तींच्या मतदार नोंदणीला प्राधान्य देण्यात येणार आहे.

शाळा-महाविद्यालयांतही विशेष नोंदणी : 1 ऑक्टोबर 2026 या अर्हता दिनांकानुसार 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या युवक-युवतींची जास्तीत जास्त मतदार नोंदणी व्हावी, यासाठी सुट्टीचे दिवस वगळता कार्यालयीन वेळेत जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमध्येही विशेष नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक पात्र नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र नागरिक, विशेषतः नवमतदार युवक-युवतींनी आपल्या संबंधित मतदान केंद्रावर जाऊन मतदार यादीत नाव असल्याची खात्री करावी. नाव नसल्यास आवश्यक अर्ज भरून मतदार नोंदणी करून घ्यावी आणि या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment