'सुपोषित भारत' घडविण्यासाठी जनसहभागातून विविध उपक्रम
Ø 9 वा राष्ट्रीय पोषण माह 2026
चंद्रपूर, दि. 08 : महिला व बाल विकास विभागाच्यावतीने 9 सप्टेंबर 2026 पासून 9 वा राष्ट्रीय पोषण माह आयोजित करण्यात येत आहे. या अभियानादरम्यान जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून चालक, गर्भवती महिला, स्तनदा माता आणि किशोरवयीन मुली यांच्या पोषण व आरोग्यविषयक जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
यावर्षीच्या अभियानाची संकल्पना "आमची अंगणवाडी, आमची जबाबदारी" ही असून, अंगणवाडी केंद्रांच्या विकासात आणि त्यांच्या प्रभावी कार्यात पालक, ग्रामस्थ, स्थानिक स्वराज्य संस्था, लोकप्रतिनिधी तसेच समुदायाचा सक्रिय सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. अंगणवाडी केंद्र हे बालकांच्या पोषण, आरोग्य आणि पूर्व प्राथमिक शिक्षणाचे महत्त्वपूर्ण केंद्र असल्याने त्याच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी समाजातील प्रत्येक घटकाने स्विकारणे आवश्यक आहे.
राष्ट्रीय पोषण माहच्या माध्यमातून संतुलित व पौष्टिक आहार, कुपोषण प्रतिबंध, अॅनिमिया प्रतिबंध, स्तनपानाचे महत्त्व, बालकांच्या वाढीचे नियमित निरीक्षण, स्वच्छता व वैयक्तिक स्वच्छता तसेच स्थानिक व पौष्टिक खाद्यपदार्थांचा वापर याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या अभियानांतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस, पर्यवेक्षिका तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या समन्वयातून पालक सभा, पोषण जनजागृती रॅली, पोषण शपथ, पाककला व पौष्टिक आहार प्रात्यक्षिके, गृहभेटी, बालकांच्या वाढीचे निरीक्षण, आरोग्य तपासणी आणि मार्गदर्शन सत्रे आयोजित केली जाणार आहेत. तसेच अंगणवाडी केंद्रांची स्वच्छता, परिसर सुशोभीकरण, आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आणि केंद्राच्या कामकाजात समुदायाचा सहभाग वाढविण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्याने पोषणाबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे. बालकांना योग्य व सकस आहार देणे, गर्भवती महिला व स्तनदा मातांच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे तसेच कुपोषणाची लक्षणे आढळल्यास तात्काळ आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. "आमची अंगणवाडी, आमची जबाबदारी" या भावनेतून प्रत्येक कुटुंबाने अंगणवाडी केंद्राशी जोडले जाऊन बालकांच्या आरोग्य, पोषण आणि विकासासाठी सहकार्य करावे.
"सुदृढ बालक, निरोगी माता, सक्षम कुटुंब - सुपोषित भारत" या संकल्पनेला बळ देण्यासाठी नागरिकांनी राष्ट्रीय पोषण माहमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, अंगणवाडी केंद्रांच्या विकासात योगदान द्यावे आणि पोषणाचा संदेश प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन महिला व बाल विकास विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
०००००००

No comments:
Post a Comment