Search This Blog

Tuesday, 22 September 2026

उत्सव काळात डॉल्बी, प्लाझमा व प्रेशरमिड साऊंड सिस्टिमच्या वापरास प्रतिबंध

 

उत्सव काळात डॉल्बी, प्लाझमा व प्रेशरमिड साऊंड सिस्टिमच्या वापरास प्रतिबंध

Ø जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; 1 नोव्हेंबरपर्यंत अंमलबजावणी

चंद्रपूर, दि. 22 : जिल्ह्यात गणेशोत्सव, धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन तसेच दुर्गोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी डॉल्बी साऊंड (टॉप, मिड, बेस मल्टी स्पीकर), प्लाझमा साऊंड सिस्टिम, प्रेशरमिड साऊंड सिस्टिम तसेच या साऊंड सिस्टिमच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या व बदल (Modify) करण्यात आलेल्या वाहनांच्या वापरास प्रतिबंध करण्यात आला आहे. जिल्हादंडाधिकारी वसुमना पंत यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 च्या कलम 163 अन्वये याबाबत प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

हा आदेश दि. 16 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 24 वाजेपासून दि. 1 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात लागू राहणार आहे. जिल्ह्यात या कालावधीत गणेशमूर्ती आगमन व विसर्जन मिरवणुका, गणेशोत्सव, धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन, दुर्गा मूर्ती आगमन व विसर्जन मिरवणुकांसह विविध उत्सव व कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. या कार्यक्रमांदरम्यान काही ठिकाणी डॉल्बी साऊंडच्या टॉप, मिड व बेस अशा मल्टीस्पीकर सिस्टिमचे थरावर थर चढवून भिंतीसारखी रचना उभारण्यासाठी वाहनांमध्ये बदल करून त्यांचा वापर होण्याची शक्यता आहे.

अशा उच्च क्षमतेच्या साऊंड सिस्टिमच्या वापरावरून मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध राजकीय पक्ष व संघटनांचे पदाधिकारी तसेच पोलीस प्रशासन यांच्यात तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता आहे. तसेच अशा साऊंड सिस्टिममुळे पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, 1986 आणि ध्वनी प्रदूषण (विनियमन व नियंत्रण) नियम, 2000 मध्ये निश्चित करण्यात आलेल्या ध्वनी मर्यादेचे उल्लंघन होण्याची शक्यता असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

साऊंड सिस्टिम व सुधारित वाहने सिलबंद ठेवण्याचे निर्देश

आदेशानुसार डॉल्बी साऊंड (टॉप, मिड, बेस मल्टी स्पीकर) सिस्टिम, प्लाझमा साऊंड सिस्टिम, प्रेशरमिड साऊंड सिस्टिम तसेच अशा सिस्टिमच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी व बदल (Modify) केलेली वाहने यांच्या मालक व धारकांनी संबंधित साऊंड सिस्टिम आणि वाहने स्वतःच्या ताब्यात सिलबंद स्थितीत ठेवावीत. प्रतिबंधात्मक कालावधीत त्यांचा वापर अथवा उपयोग करू नये. हे निर्देश गणेशोत्सव व दुर्गादेवी मंडळांचे पदाधिकारी तसेच धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन कार्यक्रमांच्या आयोजकांनाही लागू राहतील.

मर्यादित ध्वनी पातळीतील साऊंड सिस्टिमला आदेश लागू नाही

दरम्यान, ध्वनी प्रदूषण (विनियमन व नियंत्रण) नियम, 2000 मध्ये विहित करण्यात आलेल्या ध्वनी मर्यादेचे उल्लंघन न करणाऱ्या साऊंड सिस्टिमना हा प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाही. जिल्ह्यातील सर्व संबंधित साऊंड सिस्टिम मालक, वाहनधारक, गणेश व दुर्गादेवी मंडळांचे पदाधिकारी तसेच विविध कार्यक्रमांच्या आयोजकांनी जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

०००००

No comments:

Post a Comment