आदिवासी उमेदवारांच्या स्पर्धा परिक्षापूर्व प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ व्याख्यात्यांना आवाहन
चंद्रपूर, दि. 18 : आदिवासी उमेदवारांना वर्ग-3 व वर्ग-4 पदांच्या भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करता यावी, यासाठी आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर यांच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षण देण्यात येते. या प्रशिक्षणासाठी सामान्य ज्ञानासह विविध विषयांतील पात्र, अनुभवी व तज्ज्ञ व्याख्यात्यांनी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी रोशन शंकर गभाले यांनी केले आहे.
आदिवासी उमेदवारांना स्पर्धा परीक्षांविषयी आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, विविध शासकीय व निमशासकीय सेवांमधील रोजगाराच्या संधींची माहिती देणे तसेच कौशल्य विकास व उद्योजकतेबाबत मार्गदर्शन करणे, या उद्देशाने केंद्रामार्फत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. या माध्यमातून उमेदवारांना शैक्षणिक व रोजगारविषयक प्रगतीसाठी आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येते.
स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या आदिवासी उमेदवारांना विविध विषयांतील संकल्पना समजून घेण्यासाठी आणि संबंधित विषयांचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे. त्यानुषंगाने केंद्रामार्फत दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणासाठी सामान्य ज्ञान व इतर आवश्यक विषयांतील अनुभवी व्याख्यात्यांची आवश्यकता आहे.
आदिवासी उमेदवारांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी तसेच रोजगाराच्या संधींचा लाभ घेण्यासाठी आवश्यक विषयांचे प्रशिक्षण देण्यास इच्छुक असलेल्या पात्र व अनुभवी व्याख्यात्यांनी केंद्राशी संपर्क साधावा. विषयातील ज्ञान व अध्यापनाचा अनुभव असलेल्या व्याख्यात्यांनी या प्रशिक्षण कार्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सदर केंद्र प्रशासकीय भवन, पहिला माळा, चंद्रपूर येथे कार्यरत आहे. अधिक माहिती व प्रशिक्षणासंदर्भातील तपशिलासाठी मनोज सिडाम यांच्याशी अथवा आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर या कार्यालयाशी संपर्क साधावा.
०००००

No comments:
Post a Comment