खेळातून सिकलसेल जनजागृतीचा अभिनव प्रयोग
Ø ब्रम्हपुरीत 93 विद्यार्थ्यांची तपासणी
चंद्रपूर, दि. 24 : सिकलसेलसारख्या गंभीर आजाराची माहिती विद्यार्थ्यांना सहज आणि सोप्या पद्धतीने समजावी, यासाठी ब्रह्मपुरी येथे खेळाच्या माध्यमातून जनजागृतीचा अभिनव प्रयोग राबविण्यात आला. कॅरमच्या गोट्यांद्वारे आनुवंशिकता, सापशिडीच्या खेळातून उपचार व घ्यावयाची काळजी, तर ‘पेन्सिल ड्रॉप’ उपक्रमातून एकाग्रतेचे महत्त्व विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह समजावून सांगण्यात आले.
राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या सिकलसेल ॲनिमिया निर्मूलन कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर व पंचशील एज्युकेशन सोसायटी, ब्रह्मपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सिकल सेल व थॅलेसेमिया मुक्त ब्रह्मपुरी’ या संकल्पनेवर मायादेवी कन्या वसतिगृह येथे सिकलसेल तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडू रामटेके आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
खेळातून समजावली सिकलसेलची आनुवंशिकता : जिल्हा सिकलसेल समन्वयक संतोष चात्रेश्वर यांनी पारंपरिक व्याख्यान पद्धतीऐवजी खेळ आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सिकलसेल आजाराची माहिती दिली. आई-वडिलांकडून मुलांमध्ये सिकलसेलशी संबंधित जनुके कशी संक्रमित होऊ शकतात, हे कॅरमच्या गोट्यांच्या उदाहरणातून समजावून सांगण्यात आले.
सापशिडीच्या खेळातून सिकलसेलची लक्षणे, नियमित औषधोपचाराचे महत्त्व, पुरेसे पाणी पिणे, थंडीपासून बचाव करणे तसेच बदलत्या वातावरणात घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढविण्यासाठी ‘पेन्सिल ड्रॉप’ उपक्रमही घेण्यात आला. खेळातून दिलेल्या माहितीमुळे विद्यार्थ्यांना सिकल सेलसारखा तुलनेने गुंतागुंतीचा विषय कमी वेळेत आणि सोप्या पद्धतीने समजण्यास मदत झाली.
93 विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी : शिबिरात मायादेवी कन्या वसतिगृह, पंचशील मुलांचे वसतिगृह आणि पी. एस. रामटेके मुलांचे वसतिगृह येथील एकूण 93 विद्यार्थ्यांची सिकल सेल तपासणी करण्यात आली. त्यापैकी 14 विद्यार्थी सिकलसेल वाहक प्रकारात आढळून आले. संबंधितांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच सिकलसेल रुग्णांनी घ्यावयाची काळजी तसेच त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय सुविधा व सेवांची माहिती देण्यात आली.
उपजिल्हा रुग्णालय, ब्रह्मपुरीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास दुधपचारे यांनी शिबिरात मार्गदर्शन केले. पंचशील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मिलिंद रामटेके, सचिव अशोक रामटेके, सहसचिव धम्मदीप रामटेके, युनिव्हर्सल हायजिन केअरच्या संचालक व संशोधक रुद्राक्षी सोनकुल तसेच दादा राऊत यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे संचालन राजेंद्र वधाई यांनी तर सोनाली भावरे यांनी आभार मानले. सिकलसेल तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, नागभीड येथील प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रतिभा भोगेकर व तेजस बावणे यांनी सहकार्य केले.
०००००००

No comments:
Post a Comment