Search This Blog

Tuesday, 22 September 2026

पीएम विश्वकर्मा योजनेतून पारंपरिक कारागिरांच्या कौशल्याला बळ



पीएम विश्वकर्मा योजनेतून पारंपरिक कारागिरांच्या कौशल्याला बळ

Ø पालकमंत्र्यांच्या हस्ते कारागिरांना टूलकिट व बँक मंजुरी पत्रांचे वितरण

चंद्रपूर, दि. 22 : सेवा संकल्प अभियानांतर्गत  विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधून ‘पीएम विश्वकर्मा’ योजनेतील लाभार्थी कारागिरांना टूलकिट व बँक कर्ज मंजुरी पत्रांचे वितरण तसेच रोजगार मेळाव्याचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे करण्यात आले. या कार्यक्रमात पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या कारागीर व शिल्पकारांना योजनेच्या विविध लाभांची माहिती देण्यात आली.

राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक वुईके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार देवराव भोंगळे, आमदार करण देवतळे, विधान परिषद सदस्य सुधाकर अडबाले, जिल्हाधिकारी वसुमना पंत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी शारदा ढोक, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक शेखर सोनोने यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व लाभार्थी उपस्थित होते.

पारंपरिक कौशल्याला आधुनिकतेची जोड आवश्यक – पालकमंत्री

पीएम विश्वकर्मा योजना ही पारंपरिक कारागीर आणि शिल्पकारांच्या कौशल्याचा सन्मान करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण योजना असल्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक वुईके यांनी सांगितले. पारंपरिक कौशल्य ही देशाची मोठी ताकद असून या कौशल्याला आधुनिक साधने, प्रशिक्षण, वित्तीय सहाय्य आणि बाजारपेठेची जोड मिळाल्यास कारागिरांच्या उत्पन्नवाढीसोबतच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात. कारागिरांनी आपल्या पारंपरिक कौशल्याचे जतन करतानाच बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा. पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या विविध सुविधांचा लाभ घेऊन स्वयंरोजगार आणि उद्योजकतेकडे वाटचाल करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

लाभार्थ्यांना टूलकिट व बँक मंजुरी पत्रांचे वितरण

यावेळी मान्यवरांच्या हस्ते पीएम विश्वकर्मा योजनेतील पात्र लाभार्थ्यांना टूलकिट, प्रमाणपत्रे तसेच बँक कर्ज मंजुरी पत्रांचे वितरण करण्यात आले. यामध्ये मीरा दिलीप गराटे, प्रकाश शामसुंदर मेश्राम, मधुकर गणपती नवघरे, पृथ्वीराज कैलास कालीवाले, दिलीप रामदास डाखोरे, रोशन शांताराम झाडे, निखील अशोक वांढरे आणि अमरजित कुमार मेहता आदी लाभार्थ्यांचा समावेश होता.

कारागिरांच्या सक्षमीकरणाला चालना

पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या कारागीर व शिल्पकारांच्या कौशल्याला प्रोत्साहन देणे, आधुनिक साधनांची उपलब्धता करून देणे, कौशल्यवृद्धी करणे, आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे तसेच त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठेशी जोडणे यासोबतच सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून अशा लोकाभिमुख योजनांची माहिती आणि प्रत्यक्ष लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात येत आहे.

कार्यक्रमाला गडचिरोलीचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी भास्कर मेश्राम, पी. ए. आत्राम, पी. पी. कुळमेथे, एस. आर. भांडेकर, प्रतिभा लाटेलवार, अभिषेक गोंगले तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

000000000

No comments:

Post a Comment