Search This Blog

Thursday 11 April 2024

मतदारांनो जिंका मोटारसायकल, रेसिंग सायकल आणि मोबाईल


 

मतदारांनो जिंका मोटारसायकल, रेसिंग सायकल आणि मोबाईल

Ø मतदान केल्यानंतरचा सेल्फी अपलोड करून सहभागी होण्याचे आवाहन

Ø जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आकर्षक स्पर्धा

चंद्रपूर, दि. 11 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, सर्व स्तरातीलवयोगटातील मतदारांनी अधिकाधिक संख्येने मतदान करावे तसेच नवमतदार म्हणजेच युवा वर्गाचा यात मोठ्या प्रमाणात सहभाग वाढावा, यादृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे ‘तुमचे मत द्या आणि आकर्षक बक्षीसे जिंका’ ही स्पर्धाआयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात सहभाग घेऊन विजेत्या ठरणा-या पहिल्या तीन मतदारांना अनुक्रमे मोटारसायकल, रेसिंग सायकल आणि मोबाईल मिळणार आहे.  

लोकशाही प्रक्रियेमध्ये मतदान करून देशाच्या प्रगतीसाठी, ध्येयधोरणे ठरविण्यासाठी आपला सहभाग नोंदविणे अत्यंत महत्वाचे आहे.  13 - चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक 19 एप्रिल 2024 रोजी 2118 मतदान केंद्रावर होणार असून सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. 18 वर्षांवरील प्रथम मतदार मोठ्या संख्येने असल्याने व युवकांमध्ये मतदानाप्रती उत्साह निर्माण होण्यासाठी प्रशासनातर्फे स्वीप अंतर्गत अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे.

19 एप्रिल रोजी मतदान केल्यानंतर मतदारांनी शाई लावलेले बोट दाखवत मतदान केंद्रासमोर सेल्फी क्लिक करावा व आपला फोटो अपलोड करून ‘तुमचे मत द्या आणि आकर्षक बक्षीसे जिंका’ या स्पर्धेत सहभागी व्हावे. फोटो अपलोड करण्यासाठीची लिंक / क्यूआर कोड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://chanda.nic.in/en/divisions/collector-office-contact-details/  तसेच जिल्हा परिषदेच्या https://zpchandrapur.co.in/ वेबसाईटवर उपलब्ध आहे.

स्पर्धेमध्ये भाग घेणा-या स्पर्धकांकरीता प्रथम पारितोषिक 1 लक्ष 60 हजार रुपयांची अपाची मोटारसायकल, द्वितीय पारितोषिक उच्च प्रतीची रेसींग सायकल आणि तृतीय पारितोषिक ॲड्राईड मोबाईल फोन देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment