चंद्रपूरातील
‘हॅलो चांदा’ चे
महाराष्ट्राला आकर्षण
चंद्रपूर, दि.21
ऑगस्ट – चंद्रपूर जिल्हयातील
सामान्य नागरिक 1800-266-4401 हा क्रमांक
मोबाईलवरुन डायल करतात... आणि समोरुन ‘बोला काय समस्या आहे’? अशी विचारणा होते. मग शाळा प्रवेशापासून सातबा-यापर्यंत
आणि अवैध वाहतूकीपासून तर अवैध दारुविक्रीपर्यंत कोणत्याही तक्रारीची नोंद घेतली
जाते. 30 दिवसाच्या आत समस्या सोडविली जाते आणि स्वत: जिल्हाधिकारी किंवा संबंधित
अधिकारी तुमची समस्या सुटली अथवा नाही याची चौकशी करते, असा सुखद अनुभव सद्या
महाराष्ट्रातील पूर्वेच्या टोकावर असणा-या चंद्रपूर जिल्हयातील नागरिकांना येत
आहे.
वेगवेगळया विभागाच्या टोल फ्री
क्रमांकाची नेहमी जाहिरात ऐकली आहे. मात्र चंद्रपूरमध्ये सद्या या टोल फ्री
1800-266-4401 क्रमांकाची धूम आहे. कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी असो. गृहीणी असो,
शेतकरी असो, सामान्य नागरिक असो, कोणीही या क्रमांकाचा वापर करुन आपल्या समस्या
सोडवून घेत आहे. या अभिनव उपक्रमाची सुरुवात वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा
चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व जिल्हाधिकारी आशुतोष सलिल
यांच्या कल्पकतेतून 15 जुलैला झाली.
टोल फ्री क्रमांकावर डायल केल्यानंतर
संबंधित ऑपरेटरकडून तक्रारीची नोंद घेतली जाते. तक्रारीचा टोकन नंबर लगेच एसएमएस
केला जातो. त्यानंतर ती तक्रार ज्या विभागाची असेल त्या विभागाच्या प्रमुखाकडे ती
पाठविण्यात येते. या सगळया प्रक्रियेवर पालकमंत्री व जिल्हाधिकारी स्वत: लक्ष
ठेवून असतात. त्यांच्या डॅशबोर्डवर संबधित तक्रारीचा प्रवास दिसत असतो. त्यामुळे
प्रलंबित असणा-या तक्रारी, सोडविण्यात आलेल्या तक्रारी, गुंतागूंतींच्या तक्रारी
याबाबतचा आलेख वरिष्ठांकडे असतो. गेल्या महिन्याभरात या सेवेच्या माध्यमातून 578
तक्रारी सोडविण्यात आल्या आहेत. 17 ऑगस्ट पर्यंत महिनाभरात 808 तक्रारी प्रलंबित
आहेत. रोज शेकडो कॉल धडकत असून ऑनलाईन यंत्रणा वापरु शकणा-यांसाठी ऑनलाईनवर सुध्दा
तक्रार देण्याची व्यवस्था केली आहे. सद्या कार्यालयीन वेळेत ही यंत्रणा काम करते. मात्र
आदिवासी बहूल या जिल्हयात सद्या हातातील मोबाईलच्या तक्रारींनी प्रशासनाला कार्यप्रवण
केले असून चंद्रपूरच्या प्रशासनाला गती आल्याचे जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी
स्पष्ट केले आहे. नागरिकांच्या प्रतिसादाबद्दल त्यांनी आभार मानले आहे.
No comments:
Post a Comment