Search This Blog

Sunday 24 September 2017

गांधी जयंतीला सेवाग्राममध्ये वर्धा जिल्हयाचा कायापालट करणारा संकल्प से सिद्धी महामेळावा


  • एकाच दिवशी 5 हजार 74 कोटीच्या कामांचे भूमीपूजन
  • सेवाग्राम आश्रमाच्या 266 कोटीच्या आराखड्याच्या कामाचा शुभारंभ
  • मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री गडकरी, पालकमंत्री मुनगंटीवार यांची उपस्थिती

चंद्रपूर दि 23 सप्टेंबर :  रोजगार, आरोग्य, स्वच्छता, शिक्षणयुक्त जिल्हा आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी यांच्या जयंतीला संपूर्ण जिल्हयाचा कायापालट करण्याचा संकल्प करणारा एक भव्य कार्यक्रम वर्धा येथे होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, वित्त, नियोजन व वने तथा वर्धा जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत एकाच दिवशी 5 हजार 74 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम होणार आहे.
         सेवाग्राम येथील महात्मा गांधी यांच्या आश्रमाचा 266.53 कोटीच्या विकास आराखडयातील कामाचा प्रत्यक्ष प्रारंभ व वर्धा जिल्हयाच्या आर्थिक, सामाजिक आणि पायाभूत सुविधांमध्ये भर घालण्याचा संकल्प या कार्यक्रमात केला जाणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्प से सिद्धी उपक्रमाप्रमाणे सर्वकष विकासाची रूपरेषा कार्यक्रमातून ठरणार आहे. या कार्यक्रमाला स्थानिक स्वराज्य संस्थांचे सर्व पदाधिकारी, सदस्य, नगरसेवक यांना आमंत्रित करण्यात येणार असून शहर व ग्रामविकासाचा गाडा चालविणारे सर्व कर्मचारी देखील आमंत्रित केले जाणार आहेत. याच वेळी वर्धा जिल्हयासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या ड्राय पोर्ट, राष्ट्रीय महामार्ग, केंद्रीय मार्ग निधी याच्या कोट्यवधीच्या कामाचे भूमीपूजन होणार आहे. सोबतच संपूर्ण देशाला स्वराज्याचे स्वप्न जेथून पडले होते. त्या महात्मा गांधी यांच्या सहवासाने पावन झालेल्या सेवाग्राम आश्रमाच्या कामाचाही शुभारंभ यावेळी होणार आहे.
     आज चंद्रपूर येथे वनविभागाच्या विश्रामगृहावर या कार्यक्रमाच्या  योजनाची बैठक झाली. हा कार्यक्रम केवळ भूमीपूजन सोहळा नसून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आखलेल्या संकल्प से सिद्धी उपक्रमातील एक आदर्श आयोजन असेल. या ठिकाणावरून आगामी काळात वर्धा जिल्हयाच्या संपूर्ण कायापालटचा संदेश सर्वाना जाईल, अशी सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
        यावेळी या कार्यक्रमाच्या अभिनव नियोजनाबद्दल त्यांनी खासदार रामदास तडस, आमदार पंकज भोयर, आमदार समीर कुनावार, जिल्हाधिकारी शैलेष नवल, नगराध्यक्ष अतुल तराळे, संगीता शेंडे, अधीक्षक अभियंता डी.के. बालपांडे, कार्यकारी अभियंता शरद चौधरी, जिल्हा नियोजन अधिकारी अरविंद टेम्भूर्णे, सुनील गफाट, भुपेंद्र शहाणे आदींची चर्चा केली.
सेवाग्राम आश्रमासाठी
266.53 कोटीचा आराखडा
जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 1 ऑक्‍टोंबर 2016 रोजी 266.53 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मान्यताही  दिली होती. आता या आराखडयातील कामांचे भूमीपूजन होणार आहे.
   या विकास आराखड्यात सेवाग्राम, वर्धा आणि पवनार विभागातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन, पवनार येथील दिल्ली गेट आणि परिसराचे वारसा संवर्धन, धाम नदी काठाचा विकास, नूतनीकरण व सुशोभीकरण, नदीच्या दोन्ही बाजूस, पवनार आश्रम ते विनोबा भावे यांच्या समाधीपर्यंत चालण्यासाठी पादचारी रस्त्याची निर्मिती, नदी काठाची स्वच्छता व नूतनीकरण तसेच पर्यटकांसाठी सुविधा,  सेवाग्राम परिसरामध्ये अंगुरी बागेजवळ 1000 व्यक्तींसाठी सभागृह, यात्री निवासाच्या परिसरातील प्रदर्शन हॉलची दुरुस्ती, गांधी चित्र प्रदर्शनी येथील दुरुस्ती व नूतनीकरण,  हेरिटेज पर्यटन विकासासाठी नागरी सुविधा करण्यात येणारआहेत. 
     गांधी फॉर टूमारो - महात्मा गांधी प्रशिक्षण व संसाधन केंद्र हे विकास आराखड्यातील  सर्वात जास्त आकर्षणाचे केंद्र  ठरणार आहे. 
महात्मा गांधी यांचे तत्वज्ञान, त्यांचे साधे राहणीमान, स्वच्छतेचा आग्रह, ग्रामीण विकास, तंत्रज्ञान,  निसर्गोपचार, कला, संस्कृती याची माहिती पुढील पिढीला अध्ययनाकरिता उपलब्ध करून देण्यासाठी हे केंद्र तयार करण्यात येणार आहे.  

000

No comments:

Post a Comment