Search This Blog

Friday 15 September 2017

चंद्रपूर मेडिकल कॉलेजबाबत पालकमंत्र्यांनी घेतले तातडीचे निर्णय


* 5 सहयोगी प्राद्यापकांची नियुक्ती
* बांधकाम विभागाला दिला अल्टीमेटम
* डॉक्टरांचा मोबाईल लागला भिंतीवर
* चंद्रपुरात अतिरिक्त अतिदक्षता विभागाची घोषणा
* औषध खरेदीसाठी तत्काळ निधीची उपलब्धता
* आकस्मिक पाहणीत थेट कारवाईचे निर्देश
* जिल्हाधिकारीही यंत्रणेवर ठेवणार निगराणी

चंद्रपूर, दि.15 सप्टेंबर- चंद्रपूर जिल्‍हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशूंच्या मृत्यूबाबत व येथील आरोग्य यंत्रणेबाबत राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अत्यंत गंभीरतेने निर्णय घेणे सुरु केले आहे. राज्याचे आरोग्य मंत्री डॉ.दिपक सांवत तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांचेशी संपर्क साधून काही महत्वपूर्ण निर्णय झाले आहेत. चंद्रपूरात प्रसूती विभागात अतिरीक्त अतिदक्षता विभागाला मंजूरी मिळाली असून आज सांयकाळी 5  सहयोगी प्राध्यापकांच्या नियुक्तीचा आदेश धडकला आहे. तसेच या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रलंबीत बांधकामासाठी संबंधित विभागाला कडक आदेश देण्यात आले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे यांनी या संदर्भात सांयकाळी माहिती देतांना पाच सहयोगी प्राध्यापकांच्या नियुक्तीचा आदेश धडकल्याचे सांगितले. चार दिवसांपूर्वी मुंबईमध्ये चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भात उच्चस्तरीय बैठक झाली होती. या बैठकीमध्ये 15 दिवसात या ठिकाणच्या रिक्तपदावर डॉक्टरांची नियुक्ती करण्याचे आदेश वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले होते. या बैठकीनंतर वैद्यकीय शिक्षण विभागाकडून हालचाली सुरु झाल्या होत्या. आणखी काही रिक्त जागांवर नवीन आदेश येण्याची अपेक्षा आहे. नव्या नियुक्तीमध्ये स्त्रीरोग शास्त्रविभागामध्ये दोन सहयोगी प्राध्यापक, बधीरीकरण विभागात दोन सहयोगी प्राध्यापक तर औषध वैद्यकीय शास्त्र विभागात एका सहयोगी प्राध्यापकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्याचे आरोग्य मंत्री डॉ.दिपक सांवत यांनी चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रसूती विभागातील नवजात शिशूंचा अतिदक्षता विभाग (एसएनसीयू) देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे या ठिकाणी वाढलेल्या रुग्ण संख्येवर योग्य इलाज करणे शक्य होणार आहे. सोबतच औषधी खरेदीसाठी राज्यस्तरावरुन निधी कमी पडणार नाही. याचे नियोजन करण्यात आले आहे. तथापि सुलभरित्या निधीचा पुरवठा होत नसल्यास स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी यांनी आवश्यकतेनुसार निधी वळता करावा, असा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांना या वैद्यकीय महाविद्यालयाच्या संदर्भातील अडचणीमध्ये लक्ष घालण्याची सूचना करण्यात आली असून अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे, जिल्‍हा शल्य चिकित्सक डॉ.उमेश नावाडे यांना आकस्मिक भेटी देवून अतिदक्षता विभाग व अन्य विभागातील अडचणी शोधून यंत्रणा सुलभ करण्याचे सांगितले आहे. कामचुकार व रुग्णांना त्रास देणा-यावर कारवाई करण्याचेही स्पष्ट केले आहे. सर्व विभागात संबंधित डॉक्टरांचे मोबाईल नंबर रुग्णांना उपलब्ध करण्याचे निर्देशही अधिष्ठाता यांनी दिले असून तशा पध्दतीचे भिंतीपत्रक लावण्यात आले आहे. बांधकाम विभागाच्या प्रलंबित कामांसाठी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांना मर्यादित वेळेत बांधकाम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे. बल्लारपूर बायपास रोडवर शंभर एकरात अतिभव्य वैद्यकीय महाविद्यालय उभे राहणार असून सद्या अस्तित्वात असणा-या जिल्हा सामान्य रुग्णालयाचा देखील कायापालट होणार आहे.

सुविधा वाढणार
वैद्यकीय महाविद्यालयात सद्या एमबीबीएसची तिसरी तुकडी आली असून या वैद्यकीय महाविद्यालयातील तुकडी जशी वाढत जाईल. त्यापध्दतीने सुविधा उपलब्ध करावीच लागते. त्यामुळे पायाभूत सुविधा, वैद्यकीय सुविधा आणि शैक्षणिक सुविधा यामध्ये पुढील दोन वर्षात अमूलाग्र बदल होणार आहे. हा प्रत्येक बदल सामान्य माणसाच्या आरोग्याशी संबंधित असून त्याचा उपयोग प्रत्येक रुग्णाला होणार आहे. आदिवासी भागातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वाधिक अद्ययावत वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूरचे असणार असून पूर्ण बांधकामा अंती एक अतिभव्य सुविधापूर्ण रुग्णालय सामान्य जनतेच्या सेवेत रुजू होणार आहे. कोणत्याही खाजगी दवाखान्यापेक्षा सर्व सुविधा मोफत या ठिकाणी उपलब्ध होणार असून यासाठी राज्याचे वित्त मंत्री प्रत्येक्ष लक्ष ठेवून असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ.मोरे यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment