चंद्रपूर, दि.18 सप्टेंबर- महाकर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज करणे पात्र शेतक-याला आवश्यक असून सोबतच सेवा सहकारी संस्थेत कागदपत्रे जमा करणेही बंधनकारक आहे.त्यामुळे ऑनलाईन अर्ज करणा-या शेतक-यांनी सेवा सहकारी संस्थेतही आपले कागदपत्रे जमा करावी व 22 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक आर.डी.कौसडीकर यांनी केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 ही योजना शासनाने सुरु केलेली असून कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतक-यांसाठी ऑनलाईन कर्जमाफीचा अर्ज भरण्याची शेवटची मुदत दिनांक 22 सप्टेंबर 2017 पर्यंत आहे. शेतक-यांनी ऑनलाईन केंद्रावर जाऊन ( http://CSMSSY.in या संकेतस्थळावर) आपला अर्ज दाखल करावयाचा आहे. तसेच ऑनलाईन अर्ज भरणा केल्यानंतर संबंधित शेतक-यांने त्यांचे आधार कार्ड, असल्यास पॅनकार्ड, 7/12 चा उतारा, बँक बचत खाते क्रमांक इत्यादी कागदपत्राची झेरॉक्स प्रत (मूळ प्रत देऊ नये) ही संबंधित सेवा सहकारी संस्थेच्या सचिवास देणे बंधनकारक आहे. जर अशी कागदपत्रे सेवा सहकारी संस्थेच्या सचिवाकडे जमा केली नाहीतर ते शेतकरी सदर कर्जमाफीच्या निकषानुसार पात्र ठरत असतील, तरीही ते या लाभापासून वंचित राहू शकतात. पात्र शेतक-यांनी या लाभापासून वंचित राहू नये यासाठी आपली वैयक्तीक माहिती कागदपत्रासह संस्थेच्या सचिवास तात्काळ सादर करावी. आतापर्यंत ज्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले त्या सर्वांसाठी ही बाब बंधनकारक आहे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक आर.डी.कौसडीकर यांनी केले आहे.
000
No comments:
Post a Comment