चंद्रपूर, दि.15 सप्टेंबर- फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन (फिफा) मार्फत 17 वर्षाखालील वर्ल्डकप भारतात घेण्यात येणार असून त्यापूर्वी फुटबॉलमय भारत करण्याच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील सर्व शाळा 15 व 16 सप्टेंबरला फुटबॉल मॅचेस खेळणार आहे. महाराष्ट्र मिशन 1 मिलीयन फुटबॉलचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी स्वत: फुटबॉल खेळत जिल्हा क्रीडा संकुलात केला. यावेळी महापौर अंजली घोटेकर, मनपाच्या नगर सेविकेच्या टिमसह उपस्थित होत्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये बॉम्बे जिमखाना येथे या स्पर्धेला सुरुवात केली. अशा प्रकारच्या एखादया खेळाला प्रोत्साहन देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. आज महाराष्ट्रात 10 लाखाहून अधिक विद्यार्थी फुटबॉल खेळणार आहेत. चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे उद्या जिल्हा क्रीडा स्टेडीयमवरील अंतीम सामन्याला उपस्थित राहणार आहेत. प्रत्येक जिल्हयात पालकमंत्री चषक फुटबॉल स्पर्धा आजपासून सुरु होत असून त्यातील पहिला सामना महापौर अंजलीताई घोटेकर यांच्या संघाने जिल्हा क्रीडा स्टेडीयमवर खेळला. चंद्रपूर जिल्हयामध्ये खाजगी व जिल्हा परिषदेच्या मिळून 570 शाळा या स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत. याशिवाय जिल्हयातील सर्व फुटबॉल क्लब, क्रीडा संघटना यामध्ये सहभागी झाल्या आहेत. जिल्हाभरात 25 हजार विद्यार्थ्यासह नागरिकांचा सहभाग असणार आहे. तत्पूर्वी जिल्हा क्रीडा स्टेडीयम येथे आलेल्या अनेक चमूंचे जिल्हाधिकारी आशुतोष सलिल व महापौर अंजली घोटेकर यांनी स्वागत केले. जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे यांनी या महाराष्ट्रव्यापी स्पर्धेची माहिती दिली.
महापौर अंजली घोटेकर यांनी या अभियानाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी, शिक्षणाधिकारी यांचे कौतुक केले. एकाचवेळी जिल्हाभरात सुरु असलेल्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी बोलतांना जिल्हाधिका-यांनी उपस्थित खेळाडूंशी संवाद साधला. मैदानी खेळ हे व्यक्तीगत आत्मविश्वास वाढविण्यासाठी महत्वपूर्ण ठरत असून नव्या पीढीने ईलेक्ट्रॉनिक्स गॅझेटच्या मोहातून बाहेर पडले पाहिजे. यावेळी व्यासपीठावर शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संजय डोर्लीकर, विख्यात क्रीडा पटू राजेश नायडू, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी समिती सभपाती राहूल पावडे, मनपा सभापती देवानंद वाढई, आशाताई आबुजवार उपस्थित होते. तत्पूर्वी आज सकाळी चंद्रपूर पोलीस मैदानावर पालकमंत्री चषक फुटबॉल स्पर्धेचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्या वनीताताई आसुटकर, नगर सेवक रामपालसिंह, विलासबाबू टेभूर्णे, शांतारामजी चौखे, रवी गुरुनुले, भारत रायपूरे आदींच्या हस्ते करण्यात आला.
महानगरपालिकेच्या टिममध्ये छबुताई वैरागडे, शितल गुरुनुले, सविता कांबळे, पुष्पा उराडे, वंदना तिखे, माया उईके, शितल चौहान, शितल आत्राम, आशाताई आबुजवार, चंद्रकला सोयाम, कल्पना बबुलकर, रंजना यादव, संगीता खांडेकर, सीमा रामेडवार, अनुराधा हजारे या नगर सेविकांचा समावेश होता. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका क्रीडा अधिकारी अब्दुल मुश्ताक यांनी तर संचालन श्री.मोंटूसिंग यांनी केले.
No comments:
Post a Comment