Search This Blog

Sunday 24 September 2017

सुसज्ज अभ्यासिका बॅरिस्टर खोब्रागडे यांना खरी आदरांजली : मुनगंटीवार



बाबूपेठ परिसरात विद्यार्थांना अभ्यासाठी मिळाली हक्काची जागा

चंद्रपूर दि २४ सप्टेंबर : विद्यादानाचे व विद्या आत्मसात करण्याचे महत्त्व आयुष्यभर आपल्या वाणीतून व कृतीतून दर्शवणारे भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे सच्चे अनुयायी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांना खरी आदरांजली या वास्तुतील ही अभ्यासिका आहे. चंद्रपुरातील गरजू, हुशार, चिकित्सक व अभ्यासू मुलांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून हे काम आपण करू शकलो याचा मनस्वी आनंद असल्याचे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.
        बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांची उद्या २५ सप्टेंबरला जयंती आहे. त्यांना मान्यवरांनी आजअभिवादन केले. १४ जुलै रोजी बाबूपेठमधील बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृहाचे लोकार्पण पालकमंत्री मुनगंटीवार यांनी केले होते. यावेळी त्यांनी या सभागृहाच्या बेसमेंटमध्ये अद्यावत अभ्यासिका उभारण्याची घोषणा केली होती. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यात त्याचे लोकार्पण झाले. या विक्रमी वेळेतील कामाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्र्यांनी महानगर पालिकेला धन्यवाद दिलेत.
      या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार नानाभाऊ शामकुळे, महापौर अंजली घोटेकर, आयुक्त संजय काकडे, उपमहापौर अनील फुलझेले, स्थायी समिती सभापती राहुल पावडे, सभापती अनुराधा हजारे,  सभागृह नेता वसंत देशमुख उपस्थित होते. तसेच खोब्रागडे कुटुंबातील मृणालीनीताई गिरीष खोब्रागडे, गौतमी डोंगरे, देशक खोब्रागडे,  सत्यजित खोब्रागडे,  प्रवीण खोब्रागडे, या स्मारकासाठी जागा देणारे स्नेहल देवानंद रामटेके, प्रतीक डोरलीकर  आदि उपस्थित होते .
      यावेळी बोलताना पालकमंत्र्यांनी चंद्रपूर शहरात शामाप्रसाद मुखर्जी व बाबा आमटे अभ्यासिके नंतर बाबूपेठ परिसरात बॅरिस्टर खोब्रागडे सभागृहात आणखी एक अभ्यासिका उभी राहत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. जिल्ह्यातील भावी पिढीसाठी अभ्यासिका महत्त्वपूर्ण कार्य आहे. मूल येथे उभारण्यात आलेल्या शामा प्रसाद मुखर्जी अभ्यासिकेतील मुलांना अभ्यासाची ओढ लागल्याचे सांगीतले.  चंद्रपूर जिल्हयातील मुले जेव्हा या अभ्यासिकेतून अभ्यास करून केंद्र, राज्य व शासनाच्या विविध सेवा परीक्षेतून विविध पदावर नियुक्ती होतील ती खरी बॅरिस्टर साहेबांना श्रद्धांजली ठरेल.  आपल्यालाही समाधान मिळेल,  असेही त्यांनी स्पष्ट केले. ज्यांच्या घरात अभ्यासाठी जागा नाही, वातावरण नाही, शांतता नाही, मात्र शिक्षणाच्या माध्यमातून परिस्थिती बदलण्याची जिद्द आहे. अशा जिद्दी, गुणवान व गरजू विद्यार्थ्यांसाठी  ही जागा उपयोगी पडणार आहे, याचे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.
       ही अभ्यासिका निर्माण करण्याच्या घोषणेनंतर १६९६ तासात महानगरपालिकेने लोकार्पित केल्याबद्दल त्यांनी महापौर घोटेकर, आयुक्त संजय काकडे व त्यांच्या सर्व टीमचे अभिनंदन केले. सभागृह निर्मिती, अभ्यासिकेचे लोकार्पण, साहित्य निर्मिती याबाबतचे दिलेले आश्वासन पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले.

        यावेळी गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी शुभेच्छापर संबोधन केले. रस्ते, विकास, पायाभूत सुविधांचे निर्माण यासोबतच गुणवान, अभ्यासू विद्यार्थांसाठी अभ्यासिका निर्मितीचे प्रेरणादायी काम जिल्हयात सुरू असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. ही अभ्यासिका परिसरातील सर्व स्तरातील जनतेच्या ज्ञानार्जनासाठी कामी येईल असे त्यांनी सांगितले. आमदार नानाभाऊ शामकुळे यांनी विक्रमी वेळेत पालकमंत्री महोदयांच्या आश्वासनाची पूर्तता झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. महापौर अंजली घोटेकर यांनी पालकमंत्री यांनी दिलेल्या अभिवचनाला वेळेत पूर्ण करू शकलो याचे समाधान व्यक्त केले. हे काम विक्रमी वेळेत पूर्ण करणारे आयुक्त काकडे, उपायुक्त विजय देवळीकर, अभियंता विजय बोरीकर, अभियंता महेश बारई या टीमचे त्यांनी कौतुक केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयुक्त संजय काकडे यांनी तर संचालन नगरसेविका सविता कांबळे यांनी केले. यावेळी नगरसेविका वंदना तिखे, शीतल गुरुनुले, पुष्पा उराडे, माया उईके, वंदना जांभुळकर, निलीमा अखेवार, ज्योती गेडाम, आशा आबुजवार, कल्पना बबुलवार, पुष्पा मून, अश्वीनी खोब्रागडे आदीसह परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
000000

No comments:

Post a Comment