चंद्रपूर,
दि.31 ऑगस्ट- राज्य शासनातर्फे 34 हजार कोटीची कर्जमाफी नुकतीच जाहिर झाली आहे.
सद्या 15 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असून आज चंद्रपूर
येथे झालेल्या केंद्र शासनाच्या संकल्प से सिध्दी कार्यक्रमात सहभागी झालेल्या
हजारो शेतक-यांना महाकर्जमाफी पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.
चंद्रपूर जिल्हा परिषद, डॉ.पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला
अंतर्गत येणारे कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन
यंत्रणा (आत्मा) स्वच्छ भारत मिशन
यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संकल्प से सिध्दी’ या कार्यक्रमाचे दाताळा रोडवरील साईराम सभागृह येथे आयोजन
करण्यात आले होते.
केंद्रीय
गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या कार्यक्रमाला
हजारो शेतकरी, 700 सरपंच, 400 ग्रामसेवक, जिल्हयातील सर्व पंचायत समिती सदस्य,
सभापती, जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी केंद्रीय
गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागामार्फत
सुरु असलेल्या संवादपर्वाचे कौतुक केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मी मुख्यमंत्री बोलतोय या
कार्यक्रमात कर्जमाफीवर संवाद साधला होता. याबाबतचे महाकर्जमाफी हे पुस्तक
प्रकाशित करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्हा माहिती कार्यालयाने आजच्या
कार्यक्रमामध्ये प्रसिध्दीचे काम करतांनाच शेतक-यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज
शेतकरी सन्मान योजनेच्या संदर्भातील योजनेबाबतचे भिंतीपत्रक तयार केले होते.
शेतक-यांसाठी अर्ज कसा करायचा, पात्र शेतकरी कोण, अर्ज कुठे करायचा याबाबतची
माहिती देण्यात आली होती. यासोबतच योजनेबाबतचे पत्रके देखील वाटप करण्यात आली.
तसेच मुद्रा योजनेतील पत्रक वाटप करण्यात आले. यावेळी लोकराज्यचा स्टॉल लावण्यात
आला होता. या स्टॉलला देखील मोठया प्रमाणात शेतक-यांकडून प्रतिसाद मिळाला. या
मेळाव्यासाठी आलेल्या ग्रामसेवक व सरपंच यांनी मोठया प्रमाणात प्रचार साहित्य सोबत
घेतले. या मेळाव्यातील प्रत्येकाकडे महाकर्जमाफीची एक प्रत देण्यात आली.
No comments:
Post a Comment