चंद्रपूर, दि.16 सप्टेंबर – शिक्षण घेत असतांना आपण फक्त पुस्तिकी ज्ञान ग्रहण करीत असतो. परंतु आपल्याला रोजगार उपलब्ध करुन घेण्यासाठी अनुभवाची आवश्यकता असते. त्यामुळे शिक्षणासह रोजगार मिळवण्यासाठी अशा रोजगार मेळाव्याचा लाभ युवक, युवतींना घ्यावा, असे आवाहन चंद्रपूर जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक संचालक सुनंदा बजाज यांनी आज जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्यातर्फे कौशल्यम सभागृह चंद्रपूर येथे आयोजित रोजगार मेळाव्यात बोलतांना केले.
यावेळी मंचावर यशस्वी गृपचे व्यवस्थापक आशिष अतकरी, औद्योगिक प्रशिक्षण संस्था बीटीआर विभागाचे श्री.नखाते, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी सी.बी.कोहाडे, संत रोहीदास चर्म महामंडळ व्यवस्थापक विजयालक्ष्मी भगत, इतर मागासवर्गीय महामंडळाच्या व्यवस्थापक दिपाली मांजरे, व्हीटीपीचे प्रमुख प्रवीण पोशेट्टीवार उपस्थित होते.
यावेळी श्रीमती बजाज म्हणाल्या, या ठिकाणी आलेल्या उद्योग समुहामध्ये काम करुन अनुभव घेण्याची सुवर्ण संधी प्राप्त झाली असल्याने या संधीचा फायदा आपण घेतला पाहिजे. या अनुभवाचा आपल्याला कधी ना कधी रोजगार मिळविण्यासाठी उपयोग होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यशस्वी गृपचे व्यवस्थापक आशिष अतकरी यांनी आमच्या कंपनीतर्फे युवकांना तीन वर्षाचे प्रशिक्षण देण्यात येवून त्यांना सक्षम करण्यात येत असते. या तीन वर्षाच्या कामाचे मुल्यमापन केल्यानंतर त्यांना याच कंपनीत किंवा इतरही कंपनीमध्ये रोजगार उपलब्ध होते. त्यामुळे युवकांनी घरी न बसता इतर ठिकाणी रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे त्यांनी सांगितले. आपण एकाच रोजगाराच्या मागे न लागता जेथे काम मिळेल त्यापासून सुरुवात करणे योग्य असते. त्यामुळे आपल्यामधील आत्मविश्वास वाढून संधी उपलब्ध होत असल्याने या संधीचे सोने करावे, असेही ते म्हणाले.
तसेच यावेळी महामंडळाचे व्यवस्थापक कोहाडे, श्रीमती मांजरे, श्रीमती भगत यांनी आपल्या महामंडळातर्फे बेरोजगार युवकांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच अस्वीन पालीकर यांनी मॅक्स लाईफ इन्शुरन्समध्ये कशा संधी उपलब्ध आहेत यासंबंधीची माहिती दिती. तर श्री.नखाते यांनीही युवकांना मार्गदर्शन केले. या मेळाव्यात सिपेट व्हीटीपी चंद्रपूर, एज्युब्रिज व्हिटीपी, युवापरिवर्तन व विविध महामंडळाचे स्टॉल लावण्यात आले होते.
यावेळी विविध उद्योगांचे प्रतिनिधी बहुसंख्येने उपस्थित होते. तसेच युवक, युवतीही मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाचे संचालन राहूल गुल्हाने यांनी तर प्रास्ताविक व आभार कनिष्ठ सेवायोजन अधिकारी विजय गराटे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय राऊत, रमेश गाऊत्रे, विजय पांढव, अशोक बुरेवार, योगेश काळे, पंकज कचरे व प्रकाश चहारे यांनी सहकार्य केले.
0000
No comments:
Post a Comment