Search This Blog

Wednesday 6 September 2017

‘हॅलो चांदा’ प्रलंबित तक्रारी पूर्ण निकाली काढा : पालकमंत्री विभागवार आढावा घेतला; गतीवाढविण्याचे निर्देश


चंद्रपूर, दि.02 सप्टेंबर – संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या ‘हॅलो चांदा’ या चंद्रपूर जिल्हयातील पालकमंत्री तक्रार निवारण केंद्राच्या कामात आणखी गती वाढविण्यात यावी. केवळ तक्रारी सोडविण्याचे आश्वासन नव्हे तर सामान्य माणसाच्या चेह-यावर हसू फुलविण्याचे कौशल्य या टोल फ्री क्रमांकामध्ये असले पाहिजे, अशा शब्दात या नव्या प्रयोगाला जिल्हयात आणि देशात लोकप्रिय करण्याचे आवाहन वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
    जिल्हयाच्या प्रशासनात रुजू झालेल्या नव्या नियोजन भवनात हॅलो चांदा या अभिनव प्रयोगाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाभरातील उच्चपदस्थ अधिका-यांची, सर्व नगरपालिकांच्या मुख्याधिका-यांची, या योजनेसाठी काम करणा-या तज्ञांची बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी या 15 जुलैला सुरु झालेल्या अभिनव प्रयोगाचा आढावा यावेळी सादर केला. जिल्हयातून आतापर्यंत जवळपास पाच हजारावर नागरिकांनी हॅलो चांदावर संपर्क साधला आहे. चंद्रपूर सारख्या महाराष्ट्राच्या टोकावरील जिल्हयामध्ये नागरिकांमध्ये आपल्या सोयी सुविधांविषयी जागृता निर्माण होत आहे. ही बाब महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले. सामान्य माणसाच्या सेवेसाठी सुरु करण्यात आलेल्या या योजनेमध्ये काही अधिका-यांनी झोकून देवून काम केले. याबद्दल जिल्हाधिका-यांनी पालकमंत्र्यांपुढे त्यांचे कौतुक केले. तथापि अनेक ठिकाणी तक्रारी सोडविण्याची प्रक्रिया दिर्घकाळ रेंगाळत राहिल्याचेही त्यांनी नमूद केले.
    पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी या नव्या प्रयोगातील सहभागाबद्दल अधिका-यांचे कौतुक केले. तथापि काही तक्रारी सोडविण्याची सुरुवात झाल्यानंतर समाधान होईपर्यंत त्याचा पाठपुरावा होत नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे केवळ एखादयाची तक्रार आल्यानंतर त्याची नोंद घेतली जाणे, ही बाब समाधानाची नसून त्याची समस्या कायमस्वरुपी निकालात काढण्याची जबाबदारी प्रशासनाने घेणे आवश्यक आहे. केवळ कार्यवाही सुरु केली हे दाखविण्यासाठी ‘हॅलो चांदा’ सुरु करण्यात आलेले नाही. त्यामुळे ज्या अधिका-यांनी तक्रारी सोडविण्यासाठी पुढाकार घेतला नाही. किंवा ज्यांच्याकडून तक्रारी सोडविण्यात विलंब होत आहे. अशा अधिकारी, कर्मचा-यांवर गंभीरतेने कारवाई करा, असे निर्देश त्यांनी दिले.
    दिड महिन्यामध्ये 1746 तक्रारीपैकी 759 तक्रारी सोडविण्यात आल्या. याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. उर्वरित तक्रारी महिन्याच्या आत सोडवण्याच्या अटीवर पूर्ण करा, असे निर्देश त्यांनी दिले. यापूर्वी अनेक लोकांचे मला शासकीय कामासाठी प्रत्यक्ष फोन येत होते. त्यांना प्रशासकीय कामासाठी हॅलो चांदा ही एक दुसरी हेल्पलाईन निर्माण झाली आहे. पुढील काही दिवसात प्रशासकीय कामासाठी थेट ‘हॅलो चांदा’ वरच समाधान होते. लोकांचे समाधान थेट व्हावे असे मला वाटते. जिल्हाधिकारी आशुतोष सलिल या संदर्भात सातत्याने आपल्या संपर्कात असून ही यंत्रणा अधिक तत्पर व दायित्व पूर्ण करणारी व्हावी. यासाठी आणखी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. जिवती पासून चिमूरपर्यंत सर्वसामान्य लोकांच्या समस्या सुटल्या पाहिजेत. पाच हजार लोकांना आपल्या कामांसाठी या यंत्रणेवर मोबाईल करावा वाटले. याचा अर्थ नागरिकांच्या समस्या आणखी जोमाने सोडविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
    या बैठकीला आमदार नाना शामकुळे, ॲड.संजय धोटे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हा पोलीस अधिक्षक नियति ठाकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, आयुक्त संजय काकडे, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी समिती अध्यक्ष राहुल पावडे, अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, औद्योगिक व सामाजिक  क्षेत्रातील  विविध मान्यवर उपस्थित होते.
                                                                       000

No comments:

Post a Comment