Search This Blog

Wednesday, 6 September 2017

संकल्प कठोर परिश्रमाचा; सिध्दी दुप्पट उत्पादनाची :-- ना.हंसराज अहीर


हजारो शेतक-यांच्या उपस्थितीत चंद्रपूरात ‘संकल्प से सिध्दी’ कार्यक्रम
    चंद्रपूर, दि.31 ऑगस्ट- नेत्यांपासून अधिका-यांपर्यंत, जिल्‍हा परिषद पासून ग्राम पंचायत पर्यंत, सरपंचापासून शेतक-यांपर्यंत आता कोणालाच कठोर परिश्रमापासून सुटका नाही. हा देश आता घोषणाबाजीवर नाही तर प्रत्येकाच्या दृढनिश्चयावर, कठोर परिश्रमावर उभा राहील. त्यामुळे शासनाकडून सिंचनाच्या सुविधा मिळतील, वीज मिळेल, जोड धंदे मिळतील, प्रशासनाकडून सुविधा आणि मार्गदर्शन मिळेल,  मात्र नेत्यापासून शेतक-यांपर्यंत सर्वांना कठोर परिश्रम करावेच लागेल, असा बोलका संदेश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी संकल्प से सिध्दी या कार्यक्रमात सर्व यंत्रणा आणि शेतक-यांना दिला.
    केंद्रातील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात देशाने अनेक क्षेत्रात क्रांती घडवली आहे. कृषी क्षेत्रात 2022 पर्यंत शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे निश्चित झाले आहे. प्रधानमंत्र्यांनी एकदा धोरण ठरवले म्हणजे त्याची शंभर टक्के अंमलबजावणी होतेच. त्यामुळे आगामी काळात केंद्रातून निधीची कमतरता भासणार नाही. तुमच्यापर्यंत न पोहचणारा अधिकारी प्रशासनात दिसणार नाही. तुम्हाला काय दयावे याचा दृष्टीकोन नसणारा सरपंचापासून खासदारापर्यंत राजकारणी बनू शकणार नाही. सगळयांना खुर्च्या खाली कराव्या लागतील. आज त्याचीच शपथ तुम्ही सर्वांनी घेतली असून प्रत्येकाची जबाबदारी निश्चित झाली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यापासून गावातल्या सामान्य शेतक-यांपर्यंत आम्ही सगळे या देशाचे 125 करोड नागरिक आज स्वच्छ भारताची, दारिद्रय मुक्त भारताची, भ्रष्टाचार मुक्त भारताची, जातीयवाद मुक्त भारताची, गाव विकसीत करण्याची आणि शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची शपथ घेत आहोत. त्यामुळे आज आळस झटकून जागृत होण्याचा संकल्प करतो आहे. या देशाला स्वराज्यपासून सुराज्यकडे नेण्यासाठी कटिबध्द होत आहोत. अशा आश्वासक शब्दात त्यांनी हजारोच्या समुदायाला संकल्प सिध्दीची शपथ दिली.
यावेळी व्यासपिठावर आमदार नाना शामकुळे, ॲड.संजय धोटे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, डॉ.पंजाबराव कृषि विद्यापीठ अकोलाचे संचालक डी.एम.मानकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
    चंद्रपूर जिल्हा परिषद, डॉ.पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत येणारे कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) स्वच्छ भारत मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संकल्प से सिध्दी’ या कार्यक्रमाचे दाताळा रोडवरील साईराम सभागृह येथे आयोजन करण्यात आले होते. जिल्हयातील हजारो शेतकरी, सर्व सरपंच, पंचायत समितीचे सदस्य, सभापती, उपसभापती, जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य, पदाधिकारी, कृषी विभागात काम करणारे सर्व अधिकारी, कर्मचारी यांची लक्षनीय उपस्थिती यावेळी होती. उपस्थित सर्वांना यावेळी गृह राज्यमंत्र्यांनी शपथ दिली. त्यानंतर केलेल्या भाषणात त्यांनी शेतक-यांनी देखील आता एक नव्हे दोन पीक कसे घेता येईल याचा विचार केला पाहिजे. प्रत्येक गावातील सरपंचाने माझ्या गावातील जनतेला केंद्र व राज्य शासनाच्या योजनाचा लाभ मिळतो की, नाही याची नोंद ठेवली पाहिजे. केंद्र शासनाच्या अनेक योजना थेट ग्राम पंचायतीला मिळत आहेत. त्यामुळे सरपंच हे पद केवळ मानाचे नसून कामाचे सुध्दा झाले आहे. कोणत्याही नेत्याच्या मागे पुढे करायची सरपंचाला गरज नसून त्यानी योजना समजून घेऊन अधिका-यांना आदेश देण्याचे दिवस आले आहे. तुमच्या कामाचे मूल्यमापन आता करण्याचे दिवस आले आहेत. महात्मा गांधींनी भारत खेडयात वसतो असे सांगितले होते. पंडित दिनदयाल उपाध्याय यांनी शेवटच्या माणसाच्या विकासासाठी अंतोदय भूमिकेची मांडणी केली होती. प्रधानमंत्री याच मार्गावर चालत असून शेतक-यांनी देखील आता आपल्या जमिनीची पत, मिळणारे पाणी, सिंचनाच्या सोयी, हवामानाचा अंदाज आणि त्यांच्यासाठी असलेल्या योजनांचा लाभ घेऊन जोमाने कामी लागले पाहिजे. उद्योग, जोडधंदे, नवे तंत्रज्ञान याबाबतची माहिती घेतली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. देश बदलत आहे. समस्यांचे मूळ शोधणारे सरकार सद्या केंद्रात आहे. त्यामुळे बदलला साथ दया आणि जगासोबतच्या प्रगतीचे भागीदार व्हा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आमदार नाना शामकुळे यांनी यावेळी कृषि क्षेत्रात काम करणा-या अधिका-यांनी शेतक-यांच्या बांधावर योजना नेण्यासाठी बाहेर पडावे, असे आवाहन केले. सिंचनासाठी 20 हजार कोटीची तरतूद केंद्र शासनाने केली आहे. 34 हजार कोटीची महाकर्जमाफी महाराष्ट्र सरकारने केली आहे. सुविधा निर्माण मोठया प्रमाणात केली जात आहे. तथापि त्याचे दृश्यपरिणाम दिसत का नाही ?  शेवटच्या घटकापर्यंत बांधावरच्या शेतक-यांपर्यंत योजना जात का नाही ? त्यासाठी आता कृषि क्षेत्राशी संबंधीत कर्मचा-यांनी थेट बांधावर जाण्याची तयारी ठेवावी. त्यावरच त्यांचे मुल्यमापन करावे.  शेतक-यांनी देखील अधिका-याच्या मागे लागून नव्या योजनांची माहिती करावी व नवे प्रयोग करावे, असे आवाहन त्यांनी केले.
आमदार ॲड.संजय धोटे यांनी श्रमाची प्रतिष्ठा जपणा-या आणि शेवटच्या माणसाच्या विकासाचा विचार करणारा प्रधानमंत्री देशाला भेटला असून आता स्वस्थ बसून चालणार नाही. नव्या योजना पूर्णत्वास नेण्याचा संकल्प आम्हाला करायचा असून हा संकल्प शासन, प्रशासन यांनी संयुक्तपणे सिध्दीस नेणे आवश्यक आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी प्रधानमंत्री सिंचाई योजनेतून मोठया प्रमाणात देशभरात सिंचनाचे जाळे विणले जात असून यामध्ये पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात मोठया प्रमाणात चंद्रपूरमध्ये सिंचनाचे काम सुरु आहे. सन 2022 पूर्वीच या जिल्हयातील शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा आमचा प्रयत्न असून प्रत्येक उद्दिष्ट केंद्राच्या मुदतीच्या आत पूर्ण करण्यासाठी आम्ही संकल्पबध्द असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या भाषणापूर्वी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, अकोला कृषी विद्यापिठाचे संचालक डॉ.डी.एम.मानकर यांनी मार्गदर्शन केले.  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी विद्यापीठाच्या सिंदेवाही येथील कार्यक्रम समन्व्यक प्रेरणा धुमाळ यांनी केले. यावेळी कृषि क्षेत्रामध्ये वेगवेगळे प्रयोग करुन हजारो शेतक-यांना प्रेरणा देणारे यशस्वी व प्रयोगशील शेतकरी हेमंत चव्हान, घनश्याम चोपडे, राजू गरोडे आदींचा सत्कार करण्यात आला. सत्कारमुर्तींनी पहिल्या सत्रात शेतक-यांना आपल्या प्रयोगाबद्दल माहिती दिली. तत्पूर्वी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अण्णासाहेब हसनाबादे यांनी सन 2022 पर्यंतच्या दुप्पट उत्पादनाच्या केंद्र शासनाच्या सात सूत्रांबाबत माहिती दिली.  आत्माच्या प्रभारी संचालक डॉ.विद्या मानकर यांनी शेतक-यांनी सामूहीक शेती कशी करावी. या संदर्भातील योजना व वैशिष्टयाची माहिती दिली. कार्यक्रमामध्ये संत गाडगेबाबा स्वच्छता अभियाना अंतर्गत अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय आलेल्या मूल तालुक्यातील राजगड, कोरपना तालुक्यातील कुकुडसात, वरोरा तालुक्यातील आनंदवन यांना सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात आले. तसेच कुटूंब कल्याण कार्यक्रमात योगदान देणारे ब्रम्हपूरी तालुक्यातील भूज, सामाजिक ऐकता राखण्यात वैशिष्टयपूर्ण काम करणा-या सावली तालुक्यातील मुंडाळा, पिण्याचे पाणी व सांडपाणी व्यवस्थापनात अव्वल ठरलेले चिमूर तालुक्यातील उसेगांवच्या सरपंच, सचिवांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाकरीता जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष कृष्णा सहारे, सभापती ब्रिजभूषण पाझारे, अर्चना जिवतोडे, गोदावरी केंद्रे, संतोष तंगडपल्लीवार, उपमहापौर अनिल फुलझले, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र मोहिते, ओमप्रकाश यादव, प्रभू जाधव, शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर, राम गारकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्रीराम गोगुलवार, पशुसंवधन अधिकारी राजेश देशपांडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन श्रीमती काशीकर यांनी केले.                          
                                                                        000

No comments:

Post a Comment