Search This Blog

Thursday 28 September 2017

पाऊस व संभाव्य परिस्थितीचा आढावा घेऊन रब्बीचे नियोजन करण्यात यावे- ना.हंसराज अहीर


फवारणी करणा-या शेतक-यांनी काळजी घेण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि.28 सप्टेंबर- महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर व लगतच्या भागात या वर्षी पावसाने दडी मारल्याने खरीपामधील पिकांना धोका पोहचला आहे. मात्र उपलब्ध जलसाठे आणि हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन कृषी, सिंचन व अन्य विभागानी समन्वयाने रब्बी हंगामाचे नियोजन करावे, अशी सूचना केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहीर यांनी आज येथे केली.
कृषी, सिंचन, पशुसंवर्धन विभागाचा आढावा घेण्यासाठी आज विश्रामगृहावर त्यांनी बैठक आयोजित केली होती. या बैठकीला जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती अर्चना जिवतोडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ.अण्णासाहेब हसनाबादे, आत्माच्या प्रकल्प संचालक विद्या मानकर, पशुसंवर्धन अधिकारी डॉ.दिपक चव्हाण, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सोनोने आदीसह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी यावर्षी झालेल्या पर्जन्यमानाचा आढावा घेण्यात आला. जिल्हयामध्ये भाताच्या पिकाचे नुकसान झाले असल्याचे अधिका-यांनी सांगितले. सोयाबिनचा पेरा कमी झाला असून कपासीचा पेरा वाढला आहे. तथापि, जिल्हयातील अनेक प्रकल्पामध्ये पाण्याचा साठा अत्यल्प असल्यामुळे रब्बीचे नियोजन करतांना प्रकल्पनिहाय नियोजन कृषी विभागाने करावे, असे आवाहन हंसराज अहीर यांनी केले. जिल्हयातील आसोलामेंढा प्रकल्पामध्ये पुरेसे पाणी असून गरज पडल्यास गोसेखूर्द प्रकल्पातून पाणी मिळवता येईल, असे कार्यकारी अभियंता यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कृषी विभागाने आसोलामेंढा प्रकल्पाशेजारी 16 हजार हेक्टर जमिनीसाठी वेगळे नियोजन करावे. या ठिकाणी गहू आणि चना या रब्बी पिकाची लागवड करण्यासाठी कृषी व संबंधित विभागाने शेतक-यांशी संवाद साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बंदी घातलेल्या बियांन्यांची लागवड, कृषी मित्र, उन्नत शेती, बियान्याची उपलब्धता, युरीयाची उपलब्धता या संदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. औषधी विक्री दुकानांमधून औषध विक्री करतांना शेतक-यांना आवश्यक सल्ला आणि सुविधा पुरविल्या जात नसल्याबद्दल या बैठकीत चर्चा झाली. तसेच आत्मा व पशुसंवर्धन विभागामार्फत विविध प्रशिक्षण देतांना दोन्ही विभागांच्या समन्वयाची आवश्यकता असल्याचे अहीर यांनी स्पष्ट केले. यावेळी सर्व विभागामार्फत शेतक-यांसाठी सुरु असणा-या योजनांवर त्यांनी यावेळी चर्चा केली.
बैठकीला विविध विभागांच्या अधिका-यांसह  नरेंद्र जिवतोडे, शेखर चौधरी, चंद्रकांत गुप्ते, विजय वानखेडे, डॉ.भगवान गायकवाड आदींची उपस्थिती होती.


शेतक-यांनो फवारणी करतांना काळजी घ्या

नव्या पध्दतीच्या बियान्यांमुळे कपासी व अन्य पिकांची उंची वाढली आहे. त्यामुळे फवारणी करतांना शेतक-यांनी सुरक्षा उपाययोजनांचा अवलंब करावा. चेहरा व  शरीरावर विषारी किटकनाशकांचा प्रभाव होणार नाही,  याची काळजी घ्यावी. विषारी औषध अंगावर सांडणे म्हणजे त्याची विषबाधा होण्याची शक्यता असतेच तसेच फवारणी यंत्र वापरतांना शरीरापासून दूर राहील याची काळजी घ्यावी. तसेच वा-याचा प्रवाह बघून फवारणी करण्याची दिशा शेतक-यांनी निश्चित केली पाहिजे. हल्ली किटकांची प्रतिकार शक्ती वाढल्यामुळे मानवी शरीरांवर परिणाम होईल, अशा प्रकारच्या औषधांची संख्या वाढली आहे. त्यामुळे फवारणी ही जीवावर बेतू शकते. त्यासाठी आवश्यक उपाय योजना व औषधी कंपनी, कृषी विभाग, औषध दुकानदार यांनी दिलेला सल्ला मानावा तसेच कोणताही संकोच न बाळगता डोळे, चेहरा व शरीराच्या अन्य भागाचे संरक्षण करणारे चष्मा व अन्य संरक्षण साहित्य वापरावे.

    

No comments:

Post a Comment