चंद्रपूर, दि.18 सप्टेंबर- चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (मेडीकल कॉलेज) बालमृत्यू दर कमी करणे व अन्य पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी आता पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात पाच सदस्यीय चौकशी समितीचे गठन केले आहे. ही समिती बालमृत्यू प्रकरणातील वस्तुस्थिती आणि सुधारणांबाबतचा अहवाल लवकरचसादर करणार आहे.
चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाअंतर्गत येणा-या जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्ण सेवा ही राज्यातील प्रगत रुग्ण सेवा झाली पाहिजे. यासाठी या ठिकाणच्या बालमृत्यू प्रकरणातील वस्तुस्थिती शोधून काढण्यात यावी. या ठिकाणचा मृत्यूदर शून्य आणण्यासाठी सर्व साधनसुविधांची उपलब्धता करुन देण्यात यावी. जिल्हयातील आरोग्य यंत्रणा बळकट व्हावी, तसेच महाराष्ट्रातील अद्ययावत नवे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणून चंद्रपूरला नाव लैकिक मिळावा. यासाठी सद्यास्थितीत सूचवायच्या उपाय योजनांसाठी ही पाच सदस्यीय समिती काम करणार आहे.
चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतर्गत येणा-या जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्ण सेवा, उपलब्ध औषधांचा पुरवठा, बाल व जेष्ठांचे अतिदक्षता विभागाची स्थिती. या ठिकाणी रात्री व दिवसा काम करणा-या वैद्यकीय अधिका-यांची उपलब्धता सामान्य नागरिकांसाठी आवश्यक असणा-या सोयी सुविधा, डॉक्टर व रुग्णांसाठी आवश्यक असणा-या सुरक्षा यंत्रणांची उपस्थिती. या परिसरातील सुरक्षा व्यवस्था, प्रलंबित बांधकाम व आदी विषयावर ही समिती आपला अहवाल पालकमंत्र्यांना देणार आहे.
पालकमंत्र्यांनी नुकतेच वैद्यकीय महाविद्यालयाच्यासंदर्भात मुंबई मंत्रालयात दोन बैठकी गेल्या आठवडयात घेतल्या होत्या. यामध्ये वैद्यकीय शिक्षण विभाग व आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. शनिवारी व रविवारी त्यांनी चंद्रपूरमध्ये जिल्हाधिकारी, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी चर्चा करुन जिल्हयातील आरोग्य यंत्रणेबाबत माहिती घेतली. जिल्हयातील 54 प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बळकटी करणासाठी पालकमंत्री प्रयत्नशिल आहेत. ग्रामीण भागातील जनतेला उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात, असे निर्देश त्यांनी वरिष्ठ अधिका-यांना दिले आहेत. सर्व वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर मुंबईला निघण्यापूर्वी त्यांनी या पाच सदस्यीय चौकशी समितीची घोषणा केली. या समितीमध्ये जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, अतिरीक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांच्यासह अन्य तीन जणांचा समावेश आहे.
0000
No comments:
Post a Comment