Search This Blog

Thursday 14 September 2017

बाल मृत्यूदर शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न करा- सुधीर मुनगंटीवार


राज्यातील सर्वोत्तम वैद्यकीय महाविद्यालयाचा लौकीक चंद्रपूरला मिळावा

चंद्रपूर, दि.14 सप्टेंबर- राज्यातील सर्वोत्तम आरोग्य सुविधा असणारा जिल्हा निर्माण करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध केल्या जातील. मात्र गरीबांच्या तक्रारी येता कामा नये, जिल्हयातला बाल मृत्यूदर शून्यापर्यंत नेण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयापासून ग्रामीण भागातील संपूर्ण आरोग्य व्यवस्था बळकट करा, अशी सूचना राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
गेल्या काही दिवसात जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हयातील अन्य आरोग्य यंत्रणेबाबत नागरिकांकडून तक्रारी आल्या आहेत. प्रसार माध्यमामध्येही याबाबत वृत्त उमटत आहे. त्यातील वैद्यकीय दृष्टया आकडेवारीमध्ये न जाता जिल्हयातील नवजात शिशूंचा मृत्यूदर शुन्यावर कसा येईल, यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी कार्यकर्त्यांशी संपर्क साधल्यानंतर रात्री उशीरा जिल्हयातील आरोग्य यंत्रणेची तातडीची बैठक घेतली. राज्यातील अन्य जिल्हयाच्या आरोग्य सुविधा आणि  तत्सम आकडेवारीसी तुलना न करता चंद्रपूरचे वैद्यकीय महाविद्यालय सर्व सुविधांनी परिपूर्ण आणि उपचाराच्या दृष्टीने राज्यातील अव्वल इस्पितळ झाले पाहीजे. औषधी, इमारती, तांत्रिक सुविधा, डॉक्टरांची भरती कोणत्याही बाबतीत अडचण असेल तर ती तातडीने दूर करण्यात येईल. मात्र जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झालेल्या भगीनीला पूर्ण सुविधा बहाल झालीच पाहिजे, असे आढावा घेताना त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीला, आमदार नाना शामकुळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीष शर्मा आदींची उपस्थिती होती.
प्रसूती विभागातील नवजात शिशूंचा अतिदक्षता विभाग (एसएनसीयू) मध्ये औषधांचा तुटवडा किंवा सुविधांचा अभाव असेल तर आताच त्याची मागणी करा. मात्र या ठिकाणी येणा-या जिल्हा व जिल्हाबाहेरील कोणत्याही भगीनीला त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाभरामध्ये आरोग्य यंत्रणेच्या प्रत्येक टप्प्यावर प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतर रुग्णांची काळजी घेण्याची जबाबदारी आरोग्य यंत्रणेची असून यामध्ये कसूर करणा-या सर्व अधिकारी, कर्मचा-यांवर थेट कारवाई केली गेली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. आदिवासी व दुर्गम भागातील गरीब लोकांचा या रुग्णालयात सतत राबता असून त्यांच्याशी नीट आणि सभ्यतेने न बोलणा-या कर्मचा-यांना अन्यत्र हलवा, त्यांच्यावर कारवाई करा. रुग्णालय परिसरातील सुरक्षा व्यवस्था व नियमित कार्यरत असणा-या पोलीस विभागाच्या कर्मचा-यांचे या ठिकाणावरुन सेवा बदलविण्यात यावी, या ठिकाणी कर्तव्यदक्ष, इमानदार कर्मचा-यांची नियुक्ती केली जावी, अशी सूचना त्यांनी केली. या परिसरात काही समाजकंटाकडून रुग्णांची दिशाभूल होत असेल तर त्यांचा शोध घेऊन कडक कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
सरकारी सेवेमध्ये पूर्णवेळ असणारे डॉक्टर सेवेचा भत्ता घेऊनही खाजगी दवाखान्यात प्रॅक्टिस करीत असतील तर त्यांनाही शोधून तात्काळ कारवाई करण्यात यावी. या दवाखान्यातील प्रत्येक डॉक्टरांच्या संदर्भात अधिष्ठातांनी व्यक्तिगत नोंद ठेवावी. अतिदक्षता विभागातील रुग्णांची हेळसाड होणार नाही. यासाठी नियमित पाहणी करावी, असे निर्देशही त्यांनी अधिष्ठातांना दिले. पुढील 15 दिवसानंतर याबाबत पुन्हा आढावा घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी बैठकीतूनच त्यांनी मुंबईतील आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांशी संपर्क साधून औषधांचा तुटवडा, अत्याधुनिक सुविधा आणि कर्मचा-यांच्या नियुक्त्यांबाबत चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाला व सामान्य रुग्णालयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याचे सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांनी या परिसरातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यावेळी उपस्थित आमदार नाना शामकुळे, महापौर अंजली घोटेकर यांच्या सुचनाबाबतही त्यांनी अधिष्ठातांना माहिती दिली. तसेच या दोनही पदाधिका-यांनी नियमित व आकस्मिक भेटी देवून या विभागातील प्रलंबित कामांना व मागण्यांना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना केली.
000

No comments:

Post a Comment