राज्यातील पहिल्या बांबू पदविका अभ्यासक्रमाचे उद्घाटन
बांबूच्या सायकलीवर पालकमंत्र्यांनी मारला फेरफटका
चंद्रपूर, दि.29 सप्टेंबर – चंद्रपुरातील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रातून (बीआरटीसी) तयार होणा-या वस्तू देश-विदेशातील बाजारात देशासोबतच चंद्रपूरचे नाव उज्वल करेल. या ठिकाणी फक्त प्रशिक्षणार्थीच घडणार नाही, तर कुशल उद्योजक या केंद्रातून उभे राहतील. चंद्रपूर व परिसरातील आर्थिक विकासाला चालना देणारे केंद्र म्हणून ‘बीआरटीसी’ ची ओळख होईल, हे केंद्र स्वप्नपूर्तीचा आनंद आहे, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन, वनेमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.
राज्यातील पहिल्या बांबू पदविका अभ्यासक्रमाचा शानदार शुभारंभ सोहळा चंद्रपूरच्या प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे वैशिष्टय म्हणजे सभागृहातील समईपासून व्यासपिठावरील खुर्च्या, पोडीयम, मेज, भेट वस्तू, स्मृतीचिन्ह, रोपटयांची कुंडी, तिरंगा झेंडा, बांबूपासून तयार केलेली सायकल सर्वच काही बांबूपासून तयार करण्यात आले होते. याशिवाय प्रियदर्शिनी सभागृहाच्या दर्शनी भागामध्ये बांबूपासून बनवलेल्या विविध शोभेच्या वस्तूंची प्रदर्शनी लावण्यात आली होती. सभागृहामध्ये बांबू प्रशिक्षण केंद्रातर्फे तयार करण्यात आलेल्या पदविका अभ्यासक्रमाचे विद्यार्थी व बांबूपासून विविध वस्तू तयार करण्यासाठी उत्सुक असणा-या महिला बचत गटांच्या शेकडो भगीनी उपस्थित होत्या. सभागृहात प्रवेश करतांनाच पालकमंत्र्यांनी बांबूच्या सायकलवर फेरफटका मारुन या केंद्राच्या कर्मचा-यांच्या कौशल्यला व कल्पकतेला दाद दिली.
व्यासपीठावर आमदार नाना शामकुळे, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक जीत सिंग, महाराष्ट्र बांबू विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक टी.एस.के.रेड्डी, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक आर.एस.यादव, वन अकादमीचे संचालक अशोक खडसे, मुख्य वनसंरक्षक व्ही.एस.गुप्ता, उच्च तंत्र शिक्षण विभागाचे पाटील, आयआयटी मुंबईचे सहप्राध्यापक संदेश आर.एम., बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील आदींची उपस्थिती होती.
सत्तेत नसतांना बांबू या वनस्पतीबद्दल कल्पवृक्षाच्या कल्पानांना कायदेशिर आयाम कसा देता येईल, याबाबत आपण नेहमी विचार करत होतो, असे पालकमंत्री म्हणाले. चिचपल्ली व परिसरात मोठया प्रमाणात बांबूपासून वस्तू तयार करणारे कुशल कामगार आहेत. त्यांना यातून व्यवसाय मिळावा यासाठी आमदार म्हणून मोठया प्रमाणात पत्र व्यवहार केला होता. मात्र 2014 मध्ये जेव्हा कॅबीनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. तेव्हा दुस-याच बैठकीत बांबू प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला. लगेच बांबूवरील वाहतूक कर रद्द केला. बांबू प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनला देशातील जेष्ठ उद्योजक रतन टाटा यांना प्राचारण करण्यात आले. महाराष्ट्राच्या पूर्वेकडील चंद्रपूर जिल्हयातील बांबू कारागिराच्या कौशल्याला बघून रतन टाटा देखील भारावून गेले. चिचपल्ली येथे 1 लाख फुटामध्ये जी इमारत बनणार आहे. तशी इमारत भारतात कुठेही नसून या ठिकाणच्या वास्तूसाठी रतन टाटांनी वास्तूविशारदांचे शुल्क ट्रस्टतर्फे दिले आहे. भारतातील सर्वांत सुंदर आणि संपूर्ण बांबूपासून तयार झालेली वास्तू चिचपल्ली येथे उभी राहणार आहे.
या ठिकाणी दोन वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा त्यांनी प्रातिनिधीक सत्कार केला. ते म्हणाले, केवळ हाच अभ्यासक्रम नव्हे तर येणा-या काळामध्ये अनेक कमी कालावधीचे अभ्यासक्रम या ठिकाणी सुरु केले जातील. या ठिकाणच्या प्रशिक्षणातून तयार होणा-या विद्यार्थ्यामध्ये आम्ही उद्याचे उद्योजक बघतो आहे. त्यासाठी आयआयटी मुंबई सोबत आज आपण करार केला आहे. भविष्यामध्ये या ठिकाणी तयार होणा-या वस्तूंचे उत्तम मार्केटींग करण्याचे प्रशिक्षणही या ठिकाणी दिले जाणार आहे. जागतिक दर्जाच्या फर्निचर कंपनीसोबत आम्ही विक्रीचा करार करणार असून ॲमेझान कंपनी सारख्या वितरण व्यवस्थेलाही सोबत घेणार आहे. त्यांनी यावेळी सर्व शासकीय कार्यालयामध्ये बांबूपासून तयार होणा-या वस्तू वापरण्याबाबतचे निर्देश जिल्हयातील वरिष्ठ अधिका-यांना दिले. यासोबतच त्यांनी अगरबत्ती, टूथपीक व अन्य वस्तू यापुढे चीन, जापान, तैवान आदी ठिकाणावरुन आयात करावे लागणार नाही. चीन सारखी अर्थव्यवस्था बांबूमुळे सुदृढ होवू शकते तर हा प्रयोग चंद्रपूर व आसपासच्या परिसरात का होवू शकत नाही. असा प्रश्न करुन पोंभूर्णांमध्ये अगरबत्ती क्लस्टरची निर्मिती केली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. जिल्हयामध्ये बांबूपासून वस्तू निर्मिती करणा-यांना मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करुन देता येईल का याची तपासणी करण्याचेही त्यांनी सांगितले. रेल्वे विभागाने देखील बांबूच्या वस्तू वापरण्याबाबत सहमती दर्शविली असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे व आमदार नाना शामकुळे यांनी संबोधित केले. प्रास्ताविक मुख्य संरक्षक विजय शेळके यांनी केले. वनविभागाचे उपसचिव आर.एस.यादव यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन हेमंत शेंडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील यांनी मानले. यावेळी व्यासपीठावर बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीष शर्मा, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी समिती सभापती राहुल पावडे, जिल्हा परिषदेचे सभापती ब्रिजभुषण पाझारे, नगरसेवक रामपालसिंग, राजू गोलीवार, महिला आर्थिक विकास मंडळाचे जिल्हा समन्वयक नरेश उगेमुगे आदी उपस्थित होते. यावेळी बी.आर.टी.सी. आणि आयआयटी मुंबई यांच्यात सामजंस्य करारावरही स्वाक्षरी करण्यात आली. महिला बचत गटांच्या भगीनींना बांबूपासून विविध वस्तू तयार करणा-या साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच बिआरटीसीच्या संख्येत स्थळाचे उदघाटन व विविध स्पर्धांच्या विजेत्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते बक्षिस देण्यात आले.
000
No comments:
Post a Comment