जिल्हयातील स्थानिक स्वराज्य संस्थाचा घेतला आढावा
चंद्रपूर, दि.14 सप्टेंबर- महाराष्ट्रातील वाढते नागरिकरण बघता प्रत्येक जिल्हयामध्ये महानगरपालिका असो वा नगरपालिका असो सफाई कामगारांची मोठया प्रमाणात गरज असून जिल्हयातील नव्या नगरपालिकांनी सफाई कामगार भरतीचे सुधारीत प्रस्ताव पाठवावे. चंद्रपूर महानगरपालिकेने सफाई कामगारांच्या सर्वंकष मागण्यांकडे लक्ष वेधावे, अशी सूचना महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामुजी पवार यांनी केली.
लोकसंख्येच्या आधारावर नियुक्तीचे आदेश यापूर्वी होते. मात्र आता सफाई कामगारांच्या कामामध्ये प्रचंड वाढ झाली असून त्यांच्याकडे असणा-या कामाच्या तुलनेत पदांची मागणी करणे आवश्यक आहे. शहरी लोकसंख्या वाढत असून घनकचराही प्रमुख समस्या झाली आहे. त्यामुळे सफाई कामगारांच्या पदसंख्येत नव्या शासकीय धोरणानुसार वाढ करण्याची आवश्यकता असून जिल्हयातील महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगर परिषदा यांनी याकडे गंभीरतेने लक्ष वेधावे, असे त्यांनी आवाहन केले. रामुजी पवार हे सद्या विदर्भाच्या दौ-यावर असून त्यांनी आज चंद्रपूर जिल्हयातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सफाई कामगारांच्या समस्यांचा आढावा घेतला. या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त संजय काकडे, जिल्हयातील सर्व मुख्याधिकारी तसेच आयोगाचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
महानगरपालिका परिसरातील सफाईचे काम अत्यंत किचकट व आरोग्यासाठी घातक झाले असून सफाई कामगारांच्या आरोग्याचे आणि त्यांच्या राहणीमान, जीवनमान उंचावण्यासाठी स्वंयप्रेरणेने पुढे येणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. लाड समितीमधील शिफारशींची अद्यापही अंमलबाजावणी होत नाही, ही वस्तुस्थिती असून याबाबत निर्णय न करणा-या कर्मचा-यांवर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील सफाई कामगारांच्या नियुक्तीबाबतचा गुंता कायम असून वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचा-यांची वारसा नियुक्ती लाड समितीच्या शिफारशी नुसार होत नसल्याचे त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.उमेश नावाडे यांच्या लक्षात आणून दिले. या संदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले. सफाई कामगारांना घरे उपलब्ध करुन देणे, राज्य शासनाने मंजूर करुन दिलेला सफाई भत्ता लागू करणे, नगर परिषदेच्या बजेटच्या 5 टक्के रक्कमेचा उपयोग सफाई कामगारांच्या वस्तीतील सोई सुविधा निर्माण करण्यावर खर्च करणे, 30 वर्षाच्या निवासानंतर सरकारी घरांचा ताबा देणे, सफाईचे ठेके देतांना सफाई कामगारांच्या संघटनांना प्राधान्य देणे आदीबाबत त्यांनी सूचना केल्या. या बैठकीला कामगार आघाडी अध्यक्ष जयसिंग कच्छवाह, सामाजिक कार्यकर्ते शशी सारवन, मोती जनवारे, छगन महातो, विजय मोगरे, छतीश सिरसवार, रोशन राठोड आदी उपस्थित होते.
000
No comments:
Post a Comment