Search This Blog

Wednesday, 6 September 2017

अवयदानातून जीवनदान देणे हे पुण्यकर्म – देवराव भोंगळे.

महा अवयवदान महोत्सव प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

    चंद्रपूर, दि.29 ऑगस्ट- अवयदानाची सर्वांना गरज असून आपल्या अवयवदानाने एखादयाचे प्राण वाचू शकत असेल तर या सारखे पुण्याचे कोणतेही दान नसल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्षे देवराव भोंगळे यांनी आज जिल्हा परिषदेमध्ये आयोजित महा अवयवदान कार्यक्रमाप्रसंगी  बोलतांना व्यक्त केले.  
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्रीराम गोगुलवार, शिक्षणाधिकारी राम गारकर, जिल्हा अवयवदान समन्वय अधिकारी डॉ.गजानन राऊत, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. त्या सर्वांना महा अवयवदानाची प्रतिज्ञा देण्यात आली.
अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करुन जनतेत जनजागृती होऊन अवयवदानाला चालना मिळावी.  याकरीता राज्यस्तरावर महाअवयवदान महोत्सव 2017 चे 29 व 30 ऑगस्ट 2017 या दिवशी आयोजित करण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार चंद्रपूर जिल्हयातही दोन दिवस विविध प्रकारच्या उपक्रमाव्दारे अवयवदान जनजागृतीसाठी महा अवयवदान महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम जिल्हाधिकारी तथा जिल्हा अवयवदान समन्वय समितीचे अध्यक्ष आशुतोष सलिल यांचे विशेष मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. सदर अभियान जिल्हयातील सर्व ग्रामीण भागात संवर्ग विकास अधिकारी तसेच सर्व तालुका आरोग्य अधिका-यांना सूचना देऊन राबविण्यात येत आहे. तसेच अवयवदान महोत्सवाप्रसंगी जिल्हयातील सर्व ग्राम पंचायतीमध्ये विशेष ग्रामसभा घेण्यात येणार असून या सभेत अवयवदानाची प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे.
30 ऑगष्ट रोजी गावातील प्रत्येक घरासमोर अवयवदानासंबंधी रांगोळी काढण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये उत्कृष्ट रांगोळी काढणा-यांना प्रोत्साहनपर 300, 200 व 100 रुपये बक्षिस प्रत्येक गावातील ग्राम आरोग्य, पोषण, पाणी पुरवठा व स्वच्छता समितीकडून देण्यात येणार आहे. याशिवाय शिक्षण संस्था, गणेश मंडळे यांचे मार्फत रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रभातफेरीचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच इंडियन मेडीकल असोसिएशन व शासकीय वैद्यकिय महाविद्यालय चंद्रपूरव्दारा इतर महाविद्यालयाचे सहभागाने रांगोळी व इतर विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्व युवक, युवतींनी अवयवदानासंबंधीची माहिती नागरिकांना समजवून सांगावी आणि अवयवदानाचा संकल्प करुन गरजू रुग्णांच्या जीवनात आनंद फुलविण्याच्या पुण्य कार्यात सहभागी होण्याची प्रतिज्ञा घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्रीराम गोगुलवार यांनी जिल्हयातील सर्व नागरिकांना केले
                                                                                             000

No comments:

Post a Comment