Search This Blog

Wednesday, 6 September 2017

दुर्लक्षित घटकांना विद्येसारखे दान नाही --- आशुतोष सलिल


रफी अहमद किडवई हायस्कुलमध्ये डिजीटल क्लास रुम सुरु

    चंद्रपूर, दि.19 ऑगस्ट कोणत्याही समाजाला मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर त्यासाठी जगातल्या कुठल्याही मदतीपेक्षा केवळ शिक्षणाचे दान करा. तो समाज, तो समूदाय, समाजाचे नेतृत्व करण्यासाठी निश्चितच पुढे येईल त्यामुळे जर कोणाला दान करायचे असेल तर त्याने विद्येचे दान केले पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले.
    रफी अहमद किडवई हायस्कुलमधील 19 डिजीटल क्लास रुमचे उदघाटन केल्यानंतर ते बोलत होते. व्यासपिठावर या शाळेचे अध्यक्ष हाजी शफीक अहमद, प्राचार्य शफीक काझी, (माध्यमिक) शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर, (प्राथमिक) शिक्षणाधिकारी राम गारकर, ॲड.इकबाल शेख, कलाम सर आदी उपस्थित होते.
    यावेळी जिल्हाधिका-यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ऊर्दूमाध्यमातील सर्वाधिक संख्या असणा-या या शाळेमध्ये मुस्लीम मुलींची संख्या 70 टक्के आहे. मुलींच्या उपस्थितीबद्दल समाधान व्यक्त करतांना जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी या मुलींचे शिक्षण, त्या जो पर्यंत शिकू इच्छितात तो पर्यंत सुरु असले पाहिजे. या शाळेतील मुले भाग्यवान आहेत. कारण त्यांना एकाचवेळी चार भाषा मराठी, ऊर्दू, इंग्रजी हिंदी शिकायला मिळत आहे. हे बहुभाषी कत्व तुमचे सामर्थ्य असून उद्या या बळावरच समाजाच्या सर्व क्षेत्रात वावरण्यास मदत होणार आहे. जिल्हाधिकारी यांनी आपल्याला मैथीली, मराठी, हिंदी, इंग्रजी व बंगाली भाषा येत असल्याचे सांगितले. मात्र या शाळेत आल्यानंतर पुन्हा एकदा ऊर्दू शिकण्याची इच्छा जागृत झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी उपस्थित पालकांना व मुस्लीम समाजातील मान्यवरांना आवाहन केले की, त्यांनी कोणतेही दान करण्यापेक्षा शैक्षणिक सुधारणा घडविण्यासाठी मोठया प्रमाणात दान करावे. विद्येसारखे दान नाही. सामाजिक सुधारणांसाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या शाळेतील विद्यार्थ्यांनी तांत्रिक, वैद्यकीय, प्रशासन, सर्वच सेवेत चमक दाखविल्याबद्दल त्यांनी या संस्थेच्या धुरीनांचे कौतुक केले. यावेळी हाजी शफीक अहमद, प्राचार्य शफीक काझी आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी डिजीटल उपक्रमाची माहिती ज्युनिअर कॉलेजच्या प्राद्यापिका नगमा मॅडम यांनी दिली. यावेळी नगरसेवक दिपक जयस्वाल, अब्दुल बारी, पत्रकार सय्यद रमजान अली आदि उपस्थित होते.
                                                                  0000

No comments:

Post a Comment