Search This Blog

Thursday, 28 September 2017

मुद्रा योजनेतून अर्ज देणा-या योग्य उमेदवाराला कर्ज उपलब्ध झालेच पाहिजे : ना.हंसराज अहीर


जिल्हयातील बँकाच्या प्रतिनिधींसोबत घेतला आढावा

चंद्रपूर, दि.28 सप्टेंबर – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा मुद्रा योजना हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून सुशिक्षित बेरोजगारांना, होतकरु तरुणांना त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी देण्यात आलेला संकल्प आहे. त्यामुळे बँकेतील अधिका-यांनी अधिकाधिक सुशिक्षित बेरोजगारांना कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी स्वत: प्रयत्न करावे. आलेल्या प्रत्येक अर्जाचा व मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आज जिल्हयातील बँकांच्या अधिका-यांना दिले.
मुद्रा बँक योजनेअंतर्गत शिशू गट, किशोर गट, तरुण गट अशा योजनेमध्ये दहा हजारापासून दहा लाखापर्यंत विविध योजनांमधून सुशिक्षित बेरोजगारांना कर्ज देण्याची योजना आखण्यात आली आहे. तथापि जिल्हयामधील अनेक बँकानी या योजनेमध्ये अपेक्षित लक्ष पूर्ण केले नसल्याबद्दल अहीर यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच ज्या सुशिक्षित युवकांना कर्ज मिळाले आहे. त्यांनी कर्जाचे हप्ते नियमित स्वरुपात बँकेत भरुन आपली पत सांभाळावी व कर्जाची परतफेड करावी, असे आवाहन त्यांनी केले.
मुद्रा बँक योजना सर्व देशभर राबविली जात असून चंद्रपूर जिल्हा सुध्दा योजनेमध्ये मागे पडता कामा नये, असे त्यांनी बजावले. गेल्या वर्षी 20 हजार लोकांना कर्ज मिळावे असे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी 85 टक्के लोकांना कर्ज वाटप करण्यात आले. तथापि, कर्ज परत येत नाही असे कारण दाखवून बँकांनी नव्या उद्योजकांना कर्ज देणे बंद करणे संयुक्तीक नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी प्रत्येक बँकेने त्यांच्याकडे अर्ज घेऊन येणा-या उमेदवारांची नोंद करावी, असे आवाहन त्यांनी केली. देशाच्या पंतप्रधानांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून बँकेमध्ये कर्मचारी नाहीत. बँकेला अन्य महत्वाचे प्रकल्प राबवायचे आहेत किंवा वारंवार उमेदवारांना परत पाठवण्याचे काम करु नये, असेही त्यांनी यावेळी उपस्थित बँक अधिका-यांना स्पष्ट केले. चालू आर्थिक वर्षात ग्रामीण भागातील नवतरुणांना या योजनेचा लाभ झाला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले. बैठकीला जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे यांच्यासह जिल्हा अग्रणी बँक, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, अलाहाबाद बँक, आंध्र बँक, महाराष्ट्र बँक, बडोधा बँक, कॅनरा बँक, आयसीआयसीआय बँक, ओरींटल बँक, युको बँक, युनीयन बँक आदींचे प्रतिनिधी हजर होते. यावेळी जिवती व कोरपना परिसरातील बँकींग व्यवहार सुरु करण्यात यावे. या ठिकाणी विविध बँकेच्या शाखा उघडण्यात याव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
            0000

No comments:

Post a Comment