Search This Blog

Wednesday, 6 September 2017

चंद्रपूरच्या छायाचित्रकारांची नवी दिल्लीत प्रदर्शनी घेणार :--- केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर

छायाचित्र प्रदर्शनी रविवार व सोमवारी विद्यार्थ्यांसह सर्वांसाठी खुली

    चंद्रपूर, दि.19- चंद्रपूर व विदर्भातील अन्य जिल्हयातील छायाचित्रकारांच्या कॅमेरातून निघालेल्या छायाचित्रांना राष्ट्रीयस्तरावर प्रदर्शीत करण्यासाठी आपला प्रयत्न राहील. या भागातील छायाचित्रकारांच्या माध्यमातून या ठिकाणच्या संस्कृतीचा व समाज जिवनाचा आरसा देशापुढे ठेवता येईल, त्यासाठी राष्ट्रीय राजधानीत छायाचित्र प्रदर्शनी आयोजित करण्यासाठी प्रयत्न करु,असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आज येथे केले.
    पावर सिटी फोटो क्लब चंद्रपूर यांच्या वतीने जागतिक छायाचित्र दिनाच्या शुभपर्वावर आयोजित विदर्भस्तरीय छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शीनीचे आयोजन प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहाच्या छायाचित्र दालनामध्ये आयोजित करण्यात आले आहे. तीन दिवस चालणा-या या प्रदर्शनीमध्ये विदर्भातील शेकडो छायाचित्रकारांनी आपला सहभाग नोंदवला असून अतिशय अप्रतिम अशी छायाचित्रे या ठिकाणी रसिकांसाठी दालनात उपलब्ध आहे. आज या छायाचित्र प्रदर्शनीतील छायाचित्राच्या प्रेमात गृह राज्यमंत्री हंसराज अहीर पडले. त्यांनी स्वत:च्या कॅमेरामध्ये छायाचित्र टिपले आणि या सर्व छायाचित्रकारांना दिल्लीचे निमंत्रण दिले. महाराष्ट्र सदन किंवा दिल्लीतील प्रसिध्दी आर्ट गॅलरीमध्ये माझ्या गावातील व परिसरातील छायाचित्रकांराची प्रदर्शनी लावण्याची इच्छा असून यासाठी छायाचित्रकारांच्या संघटनेने पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले. जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी छायाचित्रकार दिनाच्या उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
    यावेळी व्यासपिठावर महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, उपमहापौर अनिल फुलझेले, जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद काकडे उपस्थित होते. या चित्रप्रदर्शनीचे परिक्षक म्हणून जेष्ठ चित्रकार सदानंद बोरकर, रणजीत देशमुख, अजय बन्सोड, निखील तांबेकर यांनी काम पाहिले. या परिक्षकांचा गृह राज्यमंत्र्यांनी सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेष्ठ छायाचित्रकार नरखेडे यांनी केले.  
    यावेळी महापौर अंजली घोटेकर यांनीही यावेळी संबोधित केले. या शहराच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय आणि ऐतिहासीक वारस्याला संग्रही करण्याचे काम छायाचित्रकारांच्या अनेक पिढयांनी केले आहे. जगापुढे आमचे बावनकशी सत्व मांडले आहे. आमची ओळख करुन देणा-या या कलेचा सन्मान या महानगरात निश्चित होईल, असे आश्वासन देतांना त्यांनी महानगरातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद काकडे यांनी 178 वर्षाच्या छायाचित्रांच्या इतिहासाचा प्रवास उलगडून दाखविला. पत्रकारातेला आणि बातमीला उठाव देणारा घटक छायाचित्रकार असतो. त्यामुळे छायाचित्रकाराचे वृत्तपत्राच्या संस्कृतीमधले महत्व केवळ पत्रकारच जाणू शकतो. त्यामुळे तमाम पत्रकारांना छायाचित्रकारांबद्दल कायम आपुलकी असते. यावेळी माजी नगर सेवक व कलाप्रेमी संजय वैद्य यांनीही मार्गदर्शन केले. जेष्ठ चित्रकार सदानंद बोरकर यांनी या ठिकाणच्या कला दालणाला अत्याधुनिक पूरक सुविधा उपलब्ध करण्याची सूचना जिल्हाधिकारी व महापौर यांना केली. या कार्यक्रमाचे आयोजन पावर सिटी फोटोग्राफर क्लबचे छायाचित्रकार गोलू बाराहाते, देवानंद साखरकर, अमोल मेश्राम, विशाल वाटेकर, अतुल कोत्रीवार, राहुल जिलमीलवार, मोहन कश्यप, टिंकु खाडे आदींनी केले. या कार्यक्रमाला पत्रकारीता, कला, चित्रकारीता यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
                                                          0000

No comments:

Post a Comment