ऑनलाईन नोंदणी केंद्र 24 तास सुरु ठेवा
चंद्रपूर, दि.13 सप्टेंबर- शेतक-यांच्या महाकर्जमाफीसाठी 15 सप्टेंबर ही ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून जिल्हाभरातील शेतक-यांनी याचा लाभ घ्यावा. तसेच ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा. याकरीता नोंदणी केंद्र 24 तास ठेवण्यात यावे, असे निर्देश जिल्हा प्रशासनाला वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात मोठी कर्जमाफी राज्य सरकारने केली असून कोणीही पात्र शेतकरी या योजनेपासून वंचित राहता कामा नये, यासाठी राज्यातील सर्व ऑनलाईन केंद्र सुरु ठेवण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहे. चंद्रपूर जिल्हयातील शेतक-यांना देखील या संदर्भातील लाभ मिळावा. यासाठी जिल्हाधिकारी मार्फत सहायक निबंधक सहकारी संस्था, सर्व संवर्ग विकास अधिकारी, सर्व तहसिलदार, महाऑनलाईन व आपले सरकारचे जिल्हा समन्वय या सर्वांना जिल्हाधिका-यांनी या यंत्रणेवर लक्ष ठेवण्याचे बजावले आहे.
ज्या शेतक-यांना ऑनलाईन अर्ज करतांना आधारकार्डमुळे अर्ज भरण्यास अडचण आहे. त्यांची यादी तयार करण्याचेही सांगण्यात आले आहे. सर्व तहसिलदार व गट विकास अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व केंद्र 15 सप्टेंबरपर्यंत 24 तास सुरु राहतील. तसेच त्यांच्या कार्यक्षेत्रातील एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वातील जिल्हास्तरीय, तहसिलदाराच्या नेतृत्वातील तालुकास्तरीय व उपविभागीय अधिकारी यांच्या नेतृत्वातील उपविभागीय स्तरीय समित्यांनी देखील पुढील दोन दिवसात युध्द पातळीवर या संदर्भात यंत्रणेवर लक्ष ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
000
No comments:
Post a Comment