चंद्रपूर, दि.28 सप्टेंबर – चंद्रपूर जिल्हयामध्ये जिवती, कोरपना व अन्य तालुक्यामध्ये मोठया प्रमाणात बारमाही नाल्यांची मोठी संख्या आहे. वर्षभरातून किमान काही महिने वाहना-या नाल्यांच्या पाण्यांची साठवणूक करण्यासाठी खर्चिक बंधारे बांधण्याऐवजी या नाल्यांचे खोलीकरण करण्याची धडक मोहीम आखण्यात यावी, अशी सूचना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आज येथे केली.
जिल्हयातील जलयुक्त शिवार अभियानाच्या आढावा बैठकीचे आयोजन आज जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. या बैठकीला जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ.अण्णासाहेब हसनाबादे, आत्माच्या प्रकल्प संचालक विद्या मानकर, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश सोनोने आदी उपस्थित होते.
यावेळी त्यांनी जिल्हयातील 2015 पासूनच्या जलयुक्त शिवारमधील कामांचा आढावा घेतला. जिल्हयामध्ये सिंचन क्षमता वाढवायची असेल, तर जलसाठे वाढविणे गरजेचे आहे. कोल्हापूर बंधा-यामध्ये दरवाज्यांचे नियंत्रण, त्याची सुरक्षितता व पावसाळयातील देखभाल याबाबत अनिश्चितता असते. तसेच अशा पध्दतीचे बंधारे बांधणे जिल्हयासाठी खर्चिक ठरते. त्यातून पाणीसाठा होत नाही. मात्र नाल्यांचे खोलीकरण सलगरित्या केल्यास त्यातून सिंचनाची अधिक उपलब्धता होवू शकते. त्यामुळे जिल्हयात असणा-या पूर्वापार बंधा-यांना जीवंत करण्यासाठी त्यामध्ये पाणीसाठा वाढविण्यासाठी नाल्या खोलीकरण मोहीमेवर अधिक भर देण्यात यावा, अशी सूचना अहीर यांनी यावेळी केली.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सिंचन क्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करत असतांना जिल्हयाच्या जलयुक्त शिवार योजनेतून पाणीसाठा वाढवणे जिल्हा प्रशासनाचे कर्तव्य असून उपलब्ध वाहत्या नाल्यांना जलयुक्त बनविण्यासाठी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्या नेतृत्वात खोलीकरणाचे काम पूर्ण करण्यात यावे, असे आवाहनही त्यांनी केले. कृषी, सिंचन, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते
000
No comments:
Post a Comment