Search This Blog

Thursday 20 January 2022

कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी नियमांचे पालन करा - पालकमंत्री विजय वडेट्टीवार

 





कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी नियमांचे पालन करा - पालकमंत्री विजय वडेट्टीवार

Ø ब्रम्हपूरी येथे जनजागृतीपर चित्ररथाला हिरवी झेंडी

चंद्रपूर दि. 20 जानेवारी : कोरोनाच्या तिस-या लाटेची चाहूल आपल्या सर्वांना आली आहे. ही लाट आपल्या दारावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. संकटे येत असतात. पण संकटात काळजी घेतली नाही तर ते अधिक गडद होते. शासन आणि प्रशासनाने तिस-या लाटेसंदर्भात संपूर्ण तयारी केली असून या संकटावर मात करण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.

जिल्हा प्रशासन व जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या चित्ररथाला ब्रम्हपूरी येथे हिरवी झेंडी दाखविल्यानंतर प्रसारीत संदेशातून ते बोलत होते. यावेळी ब्रम्हपूरीचे उपविभागीय अधिकारी संदीप भस्के, तहसीलदार उषा चौधरी, प्रभाकर सेलोकार, विलास विखार, डॉ. नितीन उराडे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात रुग्णवाढीचा वेग जास्त आहे, असे सांगून श्री. वडेट्टीवार म्हणाले, रुग्णांसाठी संपूर्ण व्यवस्था प्रशासनाने केली आहे. ऑक्सीजन बेड, व्हेंटीलेटर बेड, ऑक्सीजनची आवश्यकता आदी बाबींची कमतरता पडणार नाही. विशेष म्हणजे आपण स्वत:ची काळजी घेतली तर रुग्णालयापर्यंत जाण्याची आपल्याला आवश्यकताच पडणार नाही. पुढील दोन महिने अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. यात नियमित मास्कचा वापर, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, सुरक्षित अंतर ठेवणे, बाहेरून आलेल्या व्यक्तिंची माहिती देणे, कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरीत रुग्णालयात संपर्क करणे आदी बाबी अतिशय महत्वाच्या आहेत. त्यामुळे शासनाच्या नियमांचे पालन करा. संकटावर मात करण्यासाठी दक्ष रहा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. कोरोनाच्या दोन संकटात आपण सर्वांनी सहकार्य केले आहे. भविष्यातही तिस-या लाटेचे संकट आपण सर्वांच्या सहकार्याने परतवून लावू, अशा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

यावेळी त्यांनी चित्ररथावर प्रदर्शित करण्यात आलेल्या योजनांची पाहणी केली. यात कोव्हीडमध्ये मृत्यु झालेल्या कुटुंबासाठी सानुग्रह अनुदान, 15 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुला-मुलींचे लसीकरण यासोबतच सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा समावेश होता. सदर चित्ररथांद्वारे जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यात जनजागृती करण्यात येणार आहे.

००००००

No comments:

Post a Comment