Search This Blog

Tuesday 4 January 2022

पालकमंत्र्यांच्या हस्ते 15 ते 18 वयोगटातील कोरोना लसीकरणाचा शुभारंभ


 

पालकमंत्र्यांच्या हस्ते 15 ते 18 वयोगटातील कोरोना लसीकरणाचा शुभारंभ

चंद्रपूर, दि. 4 जानेवारी : कोव्हीड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने आता पुढील टप्प्यात 15 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुला-मुलींसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेचा शुभारंभ चंद्रपूर शहरातील पंजाबी समाजसेवा समिती येथे जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, पोलिस अधिक्षक अरविंद साळवे, सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम, मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. गर्गेलवार आदी उपस्थित होते.

लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करतांना पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, रुग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी आता 15 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुला-मुलींचे लसीकरण करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबत नियोजन केले आहे. त्यासाठी सर्वांनी ऑनलाईन नोंदणी करावी. चंद्रपूर जिल्ह्यात 15 ते 18 वयोगटातील जवळपास 1 लक्ष 9 हजार मुलामुलींचे लसीकरण करायचे असून सदर मोहीम 264 कनिष्ठ महाविद्यालयात व 553 माध्यमिक विद्यालयात राबविण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस आहे. आरोग्य विभागाने आयोजित केलेल्या दिवशी माध्यमिक विद्यालय अथवा कनिष्ठ महाविद्यालयात आपल्या पाल्यांना पाठवून 100 टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी पालकांनी प्रशासनाला सहकार्य करावे , असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

यावेळी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत यशवंत नगर, पडोली येथील रहिवासी अवंती हेमराज चिवंडे (वय 17) आणि वडगाव येथील रहिवासी तनुश्री आंबटवार (वय 17) यांचे लसीकरण करण्यात आले.

00000


No comments:

Post a Comment