Search This Blog

Tuesday 18 January 2022

पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने ब्रम्हपूरीमध्ये स्वतंत्र 50 बेडच्या रूग्णालयास मंजुरी




 

पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने ब्रम्हपूरीमध्ये स्वतंत्र 50 बेडच्या रूग्णालयास मंजुरी

Ø सिंदेवाहीतसुध्दा ऑक्सीजनयुक्त 20 बेड निर्माण होणार

चंद्रपूर, दि. 18 जानेवारी :  ब्रम्हपूरी येथे 50 बेडचे ग्रामीण रुग्णालय अस्तित्वात आहे. कोरोनाच्या तिसर-या लाटेच्या पार्श्वभूमीवर इमरजंसी कोव्हीड रिस्पॉन्स पॅकेज अंतर्गत राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढकाराने ब्रम्हपूरी येथे कोव्हीडसाठी 50 बेडच्या स्वतंत्र रुग्णालयास मंजूरी मिळाली आहे. विशेष म्हणजे या स्वतंत्र 50 बेड व्यतिरिक्त 20 बेड आयसीयु युक्त राहणार आहे. त्यामुळे आता ब्रम्हपूरीत रुग्णांसाठी  एकूण 120 बेड उपलब्ध होणार असल्याची माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

            इमरजंसी कोव्हीड रिस्पॉन्स पॅकेज अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात अतिरिक्त बेड, ऑक्सीजन तसेच विविध बाबी उपलब्ध करून देण्यात येत आहे. पालकमंत्री श्री. वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने ब्रम्हपूरी येथे ग्रामीण रुग्णालयाव्यतिरिक्त कोव्हीड रुग्णांसाठी 50 स्वतंत्र बेड, आयसीयु युक्त 20 बेड तसेच सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात 20 बेडचे ऑक्सीजनयुक्त फ्री फॅब्रीकेटेड युनीट उभारण्यास मंजूरी देण्यात आली आहे. एवढेच नाही तर 10 किलोलीटरची लिक्विड मेडीकल ऑक्सीजन टँक ब्रम्हपूरीत निर्माण होत आहे.

चंद्रपूर मुख्यालयापासून दूर असलेल्या ब्रम्हपूरी क्षेत्रात कोव्हीडसाठी सुसज्ज रुग्णालय तसेच ऑक्सीजनची व्यवस्था करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाला लागूनच अडीच एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या जागेवर फिल्ड हॉस्पीटलची निर्मिती करण्यात येईल. तसेच प्रतिमिनीट 607 लिटर क्षमतेचे ऑक्सीजन जनरेशन प्लाँट कार्यान्वित करण्यात आले आहे. ब्रम्हपूरी येथे लिक्विड ऑक्सीजन आणि पीएसए प्लाँट अशा दोन्ही बाबी उपलब्ध होत असल्यामुळे येथील नागरिकांना आता जिल्हास्तरावरील रुग्णालयात जाण्याची आवश्यकता भासणार नाही.

ब्रम्हपूरी येथे उभारण्यात येणारे स्वतंत्र रुग्णालय अद्ययावत सोयीसुविधायुक्त करावे. तसेच इमारतीचे बांधकाम अंतर्गत रस्ते, शवविच्छेदन केंद्र, संरक्षण भिंत, परिसरातील सुशोभिकरण दर्जेदार करावे, अशा सुचना पालकमंत्री श्री. वडेट्टीवार यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.

215 कोटींच्या प्रारुप आराखड्यास मंजूरी : सन 2022 – 23 चा जिल्ह्याचा प्रारुप आराखडा शासनास सादर करावयाचा असल्याने जिल्हा नियोजन समितीची विशेष सभा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली. ब्रम्हपुरी येथील उपविभागीय कार्यालयातून पालकमंत्र्यांनी बैठकीला संबोधित केले. शासनाने 2022 – 23 करीता जिल्ह्याचा नियतव्यय आराखडा 215 कोटींचा करण्यास मान्यता दिली आहे. तसेच आदिवासी उपयोजनेंतर्गत 85 कोटी तर अनुसूचित जाती योजनेंतर्गत 72 कोटींचा प्रारुप आराखडा आहे. सन 2022 – 23 करीता निर्धारीत करण्यात आलेला सर्वसाधारण, आदिवासी उपयोजना आणि अनुसूचित जाती उपयोजना प्रारुप आराखड्यात 25 ते 30 टक्क्यांची वाढ करण्याचा ठराव पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंजूर करण्यात आला.

बैठकीला व्हीसीद्वारे जि.प. अध्यक्षा संध्या गुरुनुले, आमदार सुभाष धोटे, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

००००००

No comments:

Post a Comment