Search This Blog

Wednesday 12 January 2022

अवकाळी पावसाची मदत व पुनर्वसन मंत्र्यांकडून दखल


अवकाळी पावसाची मदत व पुनर्वसन मंत्र्यांकडून दखल

Ø विदर्भातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे दिले आदेश

चंद्रपूर दि. 12 जानेवारी: जिल्ह्यात मागील दोन ते तीन दिवसापासून ढगाळ वातावरण होते तर काही ठिकाणी गारपीट व अतिवृष्टी झाली. त्यामुळे झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने खरीप व रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कापूस, तूर, हरभरा, गहू, ज्वारी या हातच्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची दखल राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतली असून विदर्भातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले.

हवामान विभागाने जिल्ह्यात 10 व 11 जानेवारीला वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीट होण्याची शक्यता वर्तविली होती. जिल्ह्यात मंगळवार पासून मेघगर्जनेसह पाऊस आला. बल्लारपूर, वरोरा तालुक्यातील काही ठिकाणी गारपीट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. राजुरा, गोंडपिपरी, जिवती, कोरपना, पोंभूर्णा, मुल, भद्रावती, वरोरा, नागभीड व ब्रह्मपुरी या तालुक्यात अवकाळी पावसाने शेतातील पिकांचे नुकसान झाले. त्यामध्ये गहू, तूर, ज्वारी, चना तसेच रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी झालेल्या नुकसानाचे त्वरित पंचनामे करावे. असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रशासनाला दिले आहे.

विदर्भात तसेच जिल्ह्यामध्ये झालेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेले पिक हिरावले आहे. तसेच काही भागामध्ये पावसाचे पाणी घरात घुसल्याने घरांचे मोठे प्रमाणात नुकसान सुद्धा झाले आहे.घरांचे नुकसान झाल्याने नागरिकांना राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात येणार असून प्रशासनाकडून योग्य ती मदत दिली जाईल. असे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

00000

No comments:

Post a Comment