Search This Blog

Tuesday 25 January 2022

जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा






 जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा

            चंद्रपूर, दि. 25 जानेवारी : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात मंगळवारी (दि.25 जानेवारी) राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. यावेळी नव मतदारांना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या हस्ते मतदार ओळख पत्र देण्यात आले. राष्ट्रीय मतदार दिनाचे महत्त्व समाजात रुजावे यासाठी जिल्ह्यात ‘राष्ट्रीय मतदार दिन’ दरवर्षी अनिवार्यपणे साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आयोजित राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमाला सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रोहन घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी विशाल कुमार मेश्राम, व इतर अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

25 जानेवारी 1950 रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली. आयोगाचा हा स्थापना दिवस 2011 पासून संपूर्ण देशभरात राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. 25 जानेवारी 2020 रोजी 12 वा राष्ट्रीय मतदार दिन आयोजित करण्याबाबत भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमात 18-19 वर्ष वयोगटातील 5 नवीन मतदारांना पिवीसी मतदार ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. तसेच रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा यामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावलेल्या स्पर्धकांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी,राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने यांनी मतदारांना शपथ दिली व कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.

00000

No comments:

Post a Comment