* कृषी व सरस प्रदर्शनीचा थाटात समारोप
* बचत गटांनी केली विक्रमी 25 लाखाची विक्री
* चंद्रपूर शहरवासियांच्या प्रतिसादाला आयोजकांकडून धन्यवाद
चंद्रपूर, दि.15 जानेवारी : केंद्रातील शासन शेतकऱ्यांसाठी विविध उपाययोजना करून सिंचनाच्या सोयी उपलब्ध करत आहे, त्यांचे उत्पादन वाढावे, त्यांना मार्केटिंग पॅकेजिंग पासून तर रास्त भाव मिळावे, यासाठी वेगवेगळ्या योजना आखत आहे. जुन्या काळाप्रमाणे शेतीला प्रतिष्ठा देण्याचे व उत्तम मिळकतीचे साधन बनविण्याचा प्रयत्न केंद्र शासन करीत आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या तंत्रज्ञान माहिती आणि प्रशिक्षणाचे आयोजन म्हणून चंद्रपूरच्या चांदा क्लब मैदानावरील कृषि व सरस मेळावा उपयुक्त ठरला, असे प्रशस्तीपत्रक केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी आज आयोजकांना दिले. यासोबतच गेल्या पाच दिवसांपासून चांदा क्लब मैदानावर सुरू असलेल्या कृषी व सरस मेळाव्याचा शानदार समारोप झाला.
11 ते 15 जानेवारी या दरम्यान आयोजित या कृषी व सरस मेळाव्यामध्ये एकट्या बचत गटाने 25 लाख रुपयांच्या वस्तूंची विक्री केली. या विक्रीसाठी चंद्रपूरच्या जनतेने मोठ्या संख्येने पाच दिवस या मैदानावर उपस्थिती लावून बचत गट व शेतकरी बांधवांनी आणलेल्या विविध वस्तू खानपानाचे साहित्य याचा लाभ घेतला. शहरातील सर्व नागरिक या काळामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहीले. याबद्दल केंद्रीय गृहराज्यमंत्री यांनी चंद्रपूरातील नागरिकांचे देखील आभार मानले.
या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर चंद्रपूरच्या महापौर अंजलीताई घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, सहा.प्रकल्प संचालक रविंद्र मनोहरे, उपमहापौर अनिल फुलझेले, सभापती अर्चना जीवतोडे, ब्रिजभूषण पाझारे, खुशाल बोंडे, सभापती सुनील मडावी आदी उपस्थित होते.
257 स्टॉल या मैदानावर होते. पाच दिवस माहिती, विक्री, मार्गदर्शन व प्रात्यक्षिकाने प्रबोधनाचे कार्य सुरु होते. माहितीचे स्टॉल, बचत गटांचे स्टॉल, शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या वस्तूंसाठी लावलेले स्टॉल, खाणपाणाचे स्टॉल असे आयोजनाचे स्वरूप होते.
आज शेवटच्या दिवशी या आयोजनात सहभागी झालेल्या गुणवंतांचा सत्कार देखील करण्यात आला. यावेळी बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. अहीर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुरू झालेल्या मेक इन इंडिया, स्किल इंडिया व अन्य केंद्रीय योजनांचा संबंध शेती आणि शेतीमधील कौशल्य विकास यांच्याशी राहिला असल्याचे स्पष्ट केले. गेल्या चार वर्षांमध्ये शेतकऱ्यांनी केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिला. शासन व शेतकऱ्यांच्या मधला उत्तम समन्वय बघायला मिळाला आहे. त्यामुळेच ज्या क्षेत्रांमध्ये आम्ही मागे होतो त्या क्षेत्रामध्ये बंपर पीक घेण्याची किमया शेतकऱ्यांनी केली आहे. डाळीचे भाव गगनाला भिडले असताना तूर उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात प्रयोग शेतकऱ्यांनी केले. आता डाळ निर्यात करू शकतो. उत्पादकता गेल्या काही वर्षात वाढली आहे. यासाठी केंद्र शासनाने अनेक गोष्टी काटेकोरपणे पाळल्या. गेल्या चार वर्षात कोणतीही वाढ होणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष दिले आहे. पूर्वी उत्तम शेती मध्यम व्यवसाय व कनिष्ठ चाकरी होती. मात्र पुन्हा एकदा उत्तम शेतीचे दिवस आणण्यासाठी केंद्र शासन प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.
नव्या तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये करणे आवश्यक आहे. आपल्याकडे शेती करण्याचे कौशल्य आहे. ते परंपरेने मिळाले आहे. मात्र त्यामध्ये बदल करावे लागतील आणि त्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. मेहनत घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रदर्शनाला या प्रदर्शनीमध्ये दाखविण्यात आल्या बद्दल त्यांनी आयोजकांना धन्यवाद दिले. ज्या शेतकर्यांनी आपल्या शेतीमध्ये उत्तम प्रयोग केले आहेत. त्या लोकांची लक्षणीय उपस्थिती इतरांना प्रेरणादायी ठरेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहा.प्रकल्प संचालक रवींद्र मनोहरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर वाघमारे यांनी केले. यावेळी महापौर अंजली घोटेकर, कृषी सभापती अर्चना जिवतोडे, समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे आदींनी शेतकऱ्यांना संबोधित केले. यावेळी उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात आले.
No comments:
Post a Comment