- उपमुख्यमंत्री फडणवीस
Ø नवेगाव पेठ पिंपळनेर चावडी मोहल्ला येथील पूरग्रस्त भागाची पाहणी
चंद्रपूर, दि. 19 जुलै : सततच्या पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यात त्यातही चिमूर तालुक्यात झालेले नुकसान खूप मोठे आहे. नागरिकांच्या शेतात तसेच घरातही पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून पूरग्रस्तांना लवकरात लवकर मदत करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. चंद्रपूर जिल्ह्यातील नवेगाव (पेठ) येथे नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करताना ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत चिमूरचे आमदार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास 55 हजार हेक्टरवर शेतमालाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, नदी, नाल्यांना पूर आल्यामुळे पुराचे पाणी शेतात तसेच नागरिकांच्या घरात घुसले. यात घरांची पडझड झाली. पुराच्या पावसामुळे सोयाबीन, कापसाचे पीक पूर्णपणे उध्वस्त झाले. ज्या घरांची अंशतः किंवा पूर्णतः पडझड झाली, अशा नागरिकांना प्रशासनातर्फे सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. आता पाणी ओसरत असल्याने नागरिक आपापल्या घरी परत जात आहे. नुकसानग्रस्त नागरिकांना शासनाच्या वतीने त्वरित मदत देण्यात येईल. मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही. त्यासाठी तातडीने पंचनामा करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहे. अंतिम आकडेवारी आल्यावर जास्तीत जास्त मदत केली जाईल, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला.
चिमूर तालुक्यामध्ये 1 जून ते 19 जुलैपर्यंत सरासरी 701 मी.मी. पावसाची नोंद करण्यात आली. तालुक्यातील उमा नदी, गोधनी नदी तसेच सातनाला व हत्तीघोडा नाल्याला आलेल्या पुरांमुळे एकूण 41 गावे बाधित होतात. पुरामुळे नेरी, सिरपूर, कळमगाव, पांजरेपार, बाम्हणी, सावरगाव व मालेवाडा, वाढोणा तर महालगाव काळू या गावातील एकूण 60 कुटुंबे बाधित झाली असून 208 नागरिकांचे जिल्हा परिषद शाळेमध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे.
चिमूर तालुक्यात आलेल्या पुरामुळे खडसंगी, नेरी, चिमूर, मासळ, जांभूळघाट, भिसी व शंकरपूर या गावातील 547 घरे व 38 गोठे अंशतः बाधित झाली असून 17 घरे व 3 गोठे पूर्णतः पडली आहे. कृषी विभागाकडून केलेल्या प्राथमिक तपासणीच्या अनुषंगाने 33 हजार 645 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. नवतळा, चिखलापार, गदगाव या गावातील मोठी 21 जनावरे तर लहान 2 असे एकूण 23 जनावरांचे नुकसान झाले आहे. या भागात पुरामध्ये अडकून पडलेल्या नागरिकांचे शोध व बचाव कार्य चंद्रपूर आपत्ती निवारण पथकाद्वारे करण्यात येत आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकार, चिमूरचे उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, चिमूरच्या तहसीलदार प्राजक्ता बुरांडे, गटविकास अधिकारी श्रीमती खोचरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ललित पटले, तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव टिके यांच्यासह प्रशासनाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment