Search This Blog

Tuesday, 5 July 2022

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातंर्गत तालुक्यातील प्रत्येक गावात कृषी संजीवनी मोहीम


 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातंर्गत तालुक्यातील प्रत्येक गावात कृषी संजीवनी मोहीम

चंद्रपूर, दि. 5 जुलै : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत दि. 25 जून ते 1 जुलै या कालावधीत तालुक्यात व प्रत्येक गावात कृषी संजीवनी मोहिमेतंर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कालावधीत विविध पिकाचे तंत्रज्ञान, प्रसार मूल्य साखळी, बळकटीकरण दिन, पौष्टिक तृणधान्य दिन, महिला कृषी तंत्रज्ञान सक्षमीकरण दिन, खत बचत दिन, प्रगतशील शेतकरी संवाद दिवस, शेती पूरक व्यवसाय, तंत्रज्ञान दिवस आदींचा समावेश होता.

या मोहिमेचा एक भाग म्हणून मौजा चेक निंबाळा येथे महिला कृषी तंत्रज्ञान सक्षमीकरण दिन आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला पुणे कृषी आयुक्तालयाचे कृषी उपसंचालक तथा चंद्रपूर जिल्हा पालक संचालक खंडेराव सराफ, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे, सिंदेवाही कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. विनोद नागदेवते प्रामुख्याने उपस्थित होते.

महिलांनी कृषी विभागाच्या विविध कार्यक्रमात सहभागी होऊन शेती व शेतीपूरक विषयांची संपूर्ण माहिती जाणून घ्यावी व विभागाअंतर्गत आयोजित विविध कौशल्य आधारित प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी उपसंचालक खंडेराव सराफ यांनी केले. शेतामध्ये उत्पादित होणारे विविध शेतमालाचे मूल्यवर्धन करून विक्री केल्यास शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनात अधिक भाव मिळू शकतो. याकरिता महिलांनी एकत्रित येऊन गटाच्या माध्यमातून कार्य करावे, असे मत तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे यांनी व्यक्त केले. तर कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ.नागदेवते यांनी भात व कापूस या पिकाच्या लागवड तंत्रज्ञानाची माहिती तसेच कीड व रोग व्यवस्थापन याबाबत प्रत्यक्ष छायाचित्राच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.  

सदर कार्यक्रमादरम्यान ग्रामपंचायत कार्यालयात बीज प्रक्रिया ड्रमद्वारे भात बियाणे बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आंबा पिकांची फळबाग लागवड करण्यात आली. या कार्यक्रमास सरपंच अनिता पिदुरकर, पोलीस पाटील किरण राजुरकर, मंडळ कृषी अधिकारी भास्कर गायकवाड, कृषी पर्यवेक्षक श्री. बुग्गेवार, कृषी सहाय्यक उषा तरोणे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) भूषण धानोरकर तसेच गावातील महिला व पुरुष शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००००००

No comments:

Post a Comment