Search This Blog

Monday 18 July 2022

भर पावसात जिल्हाधिका-यांनी केली नुकसानग्रस्त शेतीची पाहणी





भर पावसात जिल्हाधिका-यांनी केली नुकसानग्रस्त शेतीची पाहणी

Ø त्वरीत पंचनामे करण्याचे आदेश

चंद्रपूर, दि. 18 जुलै : गत दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. यात शेतमालासह नागरिकांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्याकरीता जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी भर पावसात धानोरा, पिपरी, मारडा या गावांना भेट देऊन शेतकरी व ग्रामस्थांशी चर्चा केली. तसेच नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश संबंधितांना दिले.

यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, तहसीलदार नीलेश गौड, तालुका कृषी अधिकारी श्री. ठाकरे तसेच तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक व ग्रामस्थ उपस्थित होते.

पूर परिस्थितीबाबत आढावा : तत्पूर्वी जिल्हाधिका-यांनी वीस कलमी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे पूर परिस्थितीबाबत तालुकास्तरीय यंत्रणेचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, सततच्या पावसामुळे जिल्ह्यात अनेक तालुक्यात घरांची पडझड झाली असून शेतमालाचे नुकसान झाले आहे. पडलेली घरे, नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर, शेतीचे नुकसान, विविध विभागांचे नुकसान, मृत किंवा जखमी व्यक्ती, पायाभुत सुविधांमध्ये रस्ते, पूल, वीज पुरवठा, इमारतींचे नुकसान आदींची भरपाई करण्यासाठी तसेच पूरग्रस्त नागरिकांना मदत देण्यासंदर्भात शासन निर्णयानुसार आर्थिक मदतीचे प्रस्ताव तात्काळ जिल्हास्तरावर पाठवावे.

नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत / जखमींना तातडीने मदत देणे आवश्यक आहे. असे प्रस्ताव तातडीने निकाली काढावे. यासाठी स्थानिक स्तरावरच कागदपत्रे उपलब्ध असतात. त्यामुळे या प्रस्तावांना विलंब होता कामा नये, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.

०००००० 

No comments:

Post a Comment