योगामुळे असाध्य रोगांवर उपचार शक्य – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने
Ø रोजच्या दिनक्रमामध्ये योगाचा समावेश करण्याचे आावाहन
Ø जिल्हा क्रीडा संकूलात जागतिक योग दिन
चंद्रपूर, दि. 21 जून : कोरोनाच्या संकटाने नागरिकांना आरोग्याबाबत चांगलाच धडा शिकायला मिळाला आहे. आपली रोगप्रतिकार शक्ती कशी वाढेल, याकडे नागरिक गांभिर्याने लक्ष देत असून दैनंदिन योगासने करण्यावर नागरिकांचा भर आहे. कारण असाध्य रोगांवरही योगामुळे उपचार शक्य होत असल्याचे मत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी व्यक्त केले.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरू युवा केंद्र, शालेय शिक्षण विभाग आणि पतंजली योग समितीद्वारे जिल्हा क्रीडा संकूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. कार्यक्रमाला मनपा उपायुक्त विपीन पालिवाल, शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड व पतंजली योग समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
नागरिकांनी रोजच्या दिनक्रमामध्ये योगाचा समावेश करावा, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, योगा ही प्राचीन भारताने जगाला दिलेली एक भेट आहे. आज संपूर्ण विश्वात योग दिन साजरा केला जातो. योगामुळे आपले भावनिक, मानसिक, शारीरिक आरोग्य चांगले राखू शकतो. विदेशात योगाचा प्रसार अतिशय चांगला झाला, मात्र आपल्या देशात अजूनही काही प्रमाणात अनास्था दिसून येते.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आणि योगाभ्यास करण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत. फक्त एका दिवसापूरताच योगा मर्यादीत ठेवू नका तर याचे निरंतर आचरण करा. तरच आपण निरोगी राहू. आजच्या धकाधकीच्या काळात चपळ, लवचिक आणि सदृढ शरीर आवश्यक आहे. योगामुळे किडनी, हृदयसारख्या आदी अवयवांवर सुद्धा उपचार शक्य आहे. योगामुळे शरीरातील अंतर्गत अवयव मजबुत बनतात. त्यामुळे नागरिकांनी विशेषत: तरुणांनी प्राचीन भारताचा हा वारसा जपावा, असे सांगून जिल्हाधिका-यांनी सर्वांना निरोगी राहण्याच्या शुभेच्छा दिल्या.
योगगुरुंनी शिकविलेली प्रात्याक्षिके / आसने : सुखासन, विद्यासन, पद्मासन, दंडासन, ग्रीवाचारण (मानेचा विशिष्ट व्यायाम), स्कंद चक्र, कटीचक्र, ताडासन, वृक्षासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन, भद्रासन, वज्रासन, अर्ध उष्ट्रासन, सशाकासन, उत्तान मंडूकासन, मक्रासन, वक्रासन, भुजंगासन, स्कंधरासन, उत्तानपादासन, अर्धहलासन, पवनमुक्तासन, शवासन, ध्यानमुद्रा, कपालभाती, अनुलोम विलोम, आम्री प्राणायाम, मनोध्यान आदी.
या योगशिक्षकांचा झाला सत्कार : यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या हस्ते पतंजली योग समितीच्या योग शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यात वैजयंती गुहाकर, अरुणा शिरभाया, सपना नामपल्लीवार, मंजुश्री तपासे, शोभा कुडे, प्रणाली पोटदुखे, जयश्री चौधरी, फरजाना शेख, शुभांगी डोंगरवार, अक्षता देवाडे, प्रिती खरे, विजय चंदावार, शरद व्यास, सुधाकर शिरपूरवार, मुरलीधर शिरभाया आणि रमेश दडगळ यांचा समावेश होता.
सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन मंगला घागी यांनी तर आभार जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
०००००००
No comments:
Post a Comment