Search This Blog

Thursday, 7 September 2023

शेतकऱ्यांनो…सोयाबीन पिकांवरील पिवळा मोझँक व्हायरसचे करा व्यवस्थापन


शेतकऱ्यांनो…सोयाबीन पिकांवरील पिवळा मोझँक व्हायरसचे करा व्यवस्थापन

चंद्रपूर,दि. 7 जिल्ह्यात यावर्षी 66 हजार 931 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची लागवड करण्यात आली आहे. सोयाबीन हे एक महत्वाचे पीक आहे, त्यामुळे त्याचे किड व रोगाचे वेळीच योग्य व्यवस्थापन सुध्दा करणे गरजेचे आहे. मागील वर्षी पिवळा मोझँक व्हायरस रोगामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले होते. सोयाबीन पिकामध्ये पिवळा मोझँक व्हायरस / हिरवा मोझँक व्हायरस हा रोग प्रामुख्याने फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत विषाणुजन्य रोगाची लागण होते. म्हणजे फुले लागल्यानंतर दिसून येतो व मोठ्या प्रमाणावर नुकसान करतो. अंदाजित 30-90 टक्के उत्पादनात नुकसान या रोगामुळे होऊ शकते, तसेच उशीरा येणारे वाण किंवा लवचीक पान असलेल्या वाणामध्ये हा रोग जास्त प्रमाणात दिसून येतो. (शक्यतो जिल्हयात केडीएस-726 या वाणावर या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसुन येत आहे)

निरीक्षण व क्षेत्रीय भेट 

            जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही येथील शास्त्रज्ञ डॉ. विनोद नागदेवते, वरोराचे उपविभागीय कृषी अधिकारी तथा तालुका कृषि अधिकारी  सुशांत लव्हटे, मंडळ कृषि अधिकारी प्रगती चव्हाण, कृषि पर्यवेक्षक किशोर डोंगरकार व श्री गणेश ईढोळे यांनी वरोरा तालुक्यांतील शेगांव (बु.) येथील शेतकरी रविंद्र हरी साखरकर, मौजा मोखाळा येथील प्रशांत खिरटकर व बबलू खिरटकर यांच्या शेतातील वाण केडीएस-726, फुले संगम, फुले दुर्वा, पिडीकेवि-अंबा या वाणांची पाहणी करून सोयाबिन पिकावरील किड व पिवळा मोझॅकबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनतर खेमजई येथील शेतकरी चंद्रहास मोरे यांच्या शेतातील सोयाबीन पिकवाण केडीएस-726 ची पाहणी करून व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केले.

शेतकरी रविंद्र हरी साखरकर यांच्या शेतामध्ये सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅकचा प्रादुर्भाव आढळून आला असून सदर प्रादुर्भाव एक ते दोन झाडांवर असते. वेळीच शेतकऱ्यांना प्रादुर्भाव झालेली झाडे मुळापासून उपटून जमिनीमध्ये गाडुन टाकण्याच्या सूचना यापूर्वीच कृषि सहायक यांनी दिल्या होत्या. परंतू, शेतकऱ्यांनी झाडे उपटून न टाकल्यामुळे पिवळा मोझॅक शेतात पसरण्यास सुरूवात झाली आहे.

 असे करा व्यवस्थापन :

शेतात पिवळा मोझॅक रोगाची लागण दिसताच रोगग्रस्त झाडे समूळ उपटून खड्यात पुरुन किंवा जाळून नष्ट करावीत. पिवळा मोझॅक या रोगाचा प्रसार पांढरी माशीद्वारे होत असल्याने या किडीच्या व्यवस्थापनाचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्यावर गेल्यास कीटकनाशके Thiamethoxam 12.6 टक्के + Lambda Cyhalothrin 9.5 टक्के ZC. 15 ml प्रति पंप किंवा Imidachloprid + beta-cyfluthrin 25 ml प्रतिपंप किंवा Indoxacarb + Acetamipride 15 ml किंवा Chlorantraniliprole + Lambdacyhlothrin 10 ml प्रति पंप किंवा Emametin benzoate + Novaluron 30 ml प्रतिपंप याप्रमाणे वरीलपैकी कोणतेही एक कीटकनाशक फवारणी साठी वापरावे. तसेच आपले पिक जोमदार व सशक्त असेल तर या रोगाचा प्रादुर्भाव कमी असतो,त्यामुळे पिकात हवा खेळती राहील व पीक सशक्त राहील याकडे लक्ष द्यावे. तसेच 12 इंच x 10 इंच आकाराचे हेक्टरी 10 ते 15 पिवळे चिकट सापळे लावावेत.  

छायाचित्रात दर्शविण्यात आलेल्या सोयाबीन पिवळा मोझॅकग्रस्त झाडाचे सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी निरीक्षण करुन अशाप्रकारची झाडे आढळुन आल्यास तात्काळ उपटुन जमीनीत गाडुन टाकावित. जेणेकरुन, या रोगाचा प्रसार होणार नाही. या रोगाचा प्रसार पांढ-या माशीद्वारे अल्प कालावधीत मोठया प्रमाणावर व झपाट्याने होतो, त्यामुळे वेळीच खबरदारी घेणे आवश्यक आहे.

शेतकरी बांधवानी शेतामध्ये सर्वेक्षण करून सोयाबीन पिकावर पिवळा मोझँक व्हायरस / हिरवा मोझँक व्हायरसचा प्रादुर्भाव नियंत्रीत करण्यासाठी वरील उपाययोजना कराव्यात, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment