Search This Blog

Wednesday, 20 September 2023

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना

Ø अनु.जाती व नवबौद्ध आणि अनु.जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ

चंद्रपूर,दि.20 : राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध, अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचे जीवनमान उंचाविणे तसेच स्वयंपूर्ण करण्यासाठी आवश्यक बाबी विचारात घेऊन विशेष घटक योजना सुधारित करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत 1 लक्ष 50 हजार मर्यादेपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांना नवीन विहीर रु. 2 लक्ष 50 हजार, विहीर दुरुस्ती रु. 50 हजार, ईनवेल बोअरिंग रु.20 हजार, पंप संच रु.20 हजार, विज जोडणी रु.10 हजार, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण रु. 1 लक्ष, तुषार संच रु.25 हजार किंवा ठिबक संच रु.50 हजार याबाबत अनुदान देण्यात येते.

तसेच आदिवासी उपयोजना अंतर्गत अनुसूचित जमातीतील बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत/क्षेत्राबाहेरील) राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत नवीन विहीर रु. 2 लक्ष 50 हजार, विहीर दुरुस्ती रु. 50 हजार, ईनवेल बोअरिंग रु. 20 हजार, पंप संच रु. 20 हजार, विज जोडणी रु. 10 हजार, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण रु. 1 लक्ष, तुषार संच रु. 25 हजार किंवा ठिबक संच रु.50 हजार, पीव्हीसी/एचडीपीई पाईप रु. 30 हजार याबाबत अनुदान देण्यात येते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकरी असावा. शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र, स्वतःच्या नावे किमान 0.40 हेक्टर व कमाल 6 हेक्टर शेतजमीन असावी. तसेच बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत/ क्षेत्राबाहेरील) या योजनेसाठी लाभार्थी हा अनुसूचित जमाती प्रवर्गातील असावा. शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र, स्वतःच्या नावे किमान 0.40 हेक्टर व कमाल 6 हेक्टर शेत जमीन असावी.

योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज www.mahadbtmahait.gov.in/ https://mahad.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर करावा. योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित पंचायत  समितीचे कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा. तसेच योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेऊन सिंचनाचे क्षेत्र वाढविण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment