दिव्यांग बेरोजगार युवकांना स्वयंरोजगारासाठी मिळणार आर्थिक सहाय्य
Ø स्वयंरोजगार तसेच शैक्षणिक योजनेअंतर्गत पात्र उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित
चंद्रपूर, दि. 21 : महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळ, शासनाच्या दिव्यांग विभाग मंत्रालय मार्फत विशेष घटक योजनेंतर्गत दिव्यांगांना व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य अल्प व्याजदराने उपलब्ध करुन देण्यात येते. महामंडळ दिव्यांगांच्या कुटूंबाचा आर्थिक व सामाजिक विकास साधण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहे.
दिव्यांग महामंडळामार्फत वैयक्तिक थेट कर्ज योजना, मुदत कर्ज योजना, महिला समृदधी योजना, शैक्षणिक कर्ज योजना, मानसिक दिव्यांगांच्या पालकांसाठी स्वयंरोजगार योजना, मानसिक दिव्यांगांच्या पालकांच्या संस्थेसाठी आर्थिक सहाय्य योजना, दिव्यांग क्षेत्रामधील काम करीत असलेल्या अशासकीय संस्थांसाठी कर्ज योजना, महाशरद दिव्यांग सहायता योजना, दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना, हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरते वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन व्हेईकल) योजना दिव्यांगाकरीता राबविण्यात येत आहे. स्वयंरोजगार तसेच शैक्षणिक योजनेअंतर्गत पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात कर्जमागणी अर्ज जिल्हा कार्यालयात मागविण्यात येत आहे.
महामंडळाच्या विविध कर्ज योजना:
राष्ट्रीय दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळाच्या मुदत कर्ज योजना, महिला समृद्धी योजना, शैक्षणिक कर्ज योजना, मानसिक दिव्यांगांच्या पालकांसाठी स्वयंरोजगार योजना, मानसिक दिव्यांगांच्या पालकांच्या संस्थेसाठी आर्थिक सहाय्य योजना तसेच दिव्यांग क्षेत्रामध्ये कार्य करीत असलेल्या अशासकीय संस्थांसाठी कर्ज योजनेत राष्ट्रीय महामंडळाचा सहभाग 90 टक्के, शासनाचा 5 टक्के तर लाभार्थी सहभाग 5 टक्के आहे. रु. 5 लाखापर्यंत 6 टक्के व्याज तसेच रु. 5 लाखापेक्षा अधिक रकमेवर 7 ते 9 टक्के व्याज आकारण्यात येतो. वैयक्तिक थेट कर्ज योजनेतंर्गत दिव्यांगांना स्वयंरोजगार करण्याकरीता रु. 50 हजार कर्ज मर्यादा असून त्यावरील व्याजदर 2 टक्के इतके आहे. कर्जाची परतफेड 3 वर्षात करावयाची आहे.
महिला समृद्धी योजनेतंर्गत दिव्यांग महिलांकरीता राष्ट्रीय महामंडळाच्या योजनेंतर्गत व्याजादरात 1 टक्का सुट देण्यात येते. शैक्षणिक कर्ज योजनेतंर्गत महामंडळाद्वारे दिव्यांग विद्यार्थ्यींना शैक्षणिक कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. देशातंर्गत शिक्षण घेण्याकरीता रु. 10 लक्ष तर परदेशात शिक्षण घेण्याकरीता रु. 20 लक्ष कर्ज रु. 4 टक्के व्याजदराने महामंडळाकडून उपलब्ध करुन देण्यात येत आहे. दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजनेंतर्गत रु. 10 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध आहे. याकरीता अर्जदार दिव्यांग प्रवर्गातील व जिल्ह्याचा रहिवासी असावा. तसेच वय 18 ते 60 वर्ष वयोगटातील असावा. कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादेची अट नाही.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे:
अर्ज दोन प्रतिमध्ये करावयाचा असून अर्जासोबत पासपोर्ट आकाराचे फोटो, नवीन दिव्यांगत्वाचा दाखला, शिधापत्रिका, जन्मतारखेचा दाखला, फोटो ओळखपत्र जसे आधारकार्ड, पॅन कार्ड, व्यवसाय जागेचा उपलब्धतेचा पुरावा, व्यवसाय स्थळाची कागदपत्रे जसे भाडेपावती, भाडे करारनामा किंवा संमतीपत्र, 7/12 उतारा किंवा मालमत्ता धारकाचे कागदपत्रे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या व्यवसायाचा नाहरकत प्रमाणपत्र,आवश्यक शैक्षणिक व अनुभवाचे प्रमाणपत्र, तांत्रिक व्यवसायाकरीता आवश्यक परवाना/लायसंस, प्रकल्प अहवाल व लागणारा कच्चा माल, यंत्रसामुग्रीचे दरपत्रक आदी कागदपत्रांच्या साक्षांकीत प्रती जोडणे आवश्यक आहे.
विहित नमुन्यातील अर्ज महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात उपलब्ध असून गरजूंनी या संधीचा लाभ घ्यावा, असे महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एम. डी. बारमासे यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment