Search This Blog

Monday, 27 March 2023

29 व 30 मार्च रोजी चंद्रपूर ग्रंथोत्सवाचे आयोजन


 29 व 30 मार्च रोजी चंद्रपूर ग्रंथोत्सवाचे आयोजन

Ø पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन

चंद्रपूरदि. 27 : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण-2010 अंतर्गत, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 29 व 30 मार्च 2023 रोजी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक ग्रंथालय, चंद्रपूर येथे चंद्रपूर ग्रंथोत्सवाचे आयोजन होणार आहे. सदर ग्रंथोत्सवाचे उद्घाटन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पार पडणार आहे.

या ग्रंथोत्सवात 29 मार्च रोजी सकाळी 9 वाजता ग्रंथदिडीचे आयोजन करण्यात आले असून शहरातील आझाद बगीचा-प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौक-डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय पर्यंत ग्रंथदिडी काढण्यात येणार आहे. त्यानंतर ग्रंथोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन व सत्कार समारंभ आयोजित आहे. 29 मार्च रोजी दुपारी 3 ते 4 या कालवधीत पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांची प्रकट मुलाखत, सायंकाळी 4 ते 6 वा. चर्चासत्र, सायंकाळी 6 ते रात्री 8 वा. कविसंमेलन, गुरवार दि. 30 मार्च रोजी सकाळी 11 वाजता चर्चासत्र, दुपारी 2 वाजता कथाकथन, दुपारी 3 वाजता गझल मुशायरा, सायंकाळी 5 वाजता समारोप होणार आहे.

ग्रामीण व शहरी भागातील जनतेच्या वाचन संस्कृतीमध्ये वाढ व्हावी या हेतूने राज्य शासनातर्फे ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. ग्रंथ प्रेमींना एकच ठिकाणी विविध ग्रंथ प्राप्त व्हावेत, तसेच प्रकाशक व ग्रंथ विक्रेता यांना ग्रंथ विक्रीसाठी एकाच ठिकाणी आवश्यक ती सुविधा उपलब्ध व्हावी तसेच वाचन संस्कृती संवर्धनासाठी ग्रंथ महोत्सव आयोजनाचा मुख्य उद्देश आहे.

सदर ग्रंथोत्सवाचा लाभ जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या विद्यार्थी, वाचक, साहित्यिक व ग्रंथप्रेमींनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी भीमराव जीवने यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment