माता महाकाली यात्रेच्या पार्श्वभुमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल
चंद्रपूर दि. 24 : 27 मार्चपासून चंद्रपूर येथे माता महाकालीची यात्रा सुरू होत आहे. यात्रेमध्ये येणाऱ्या प्रवाशांना, भाविकांना व यात्रेकरूंना जाण्याकरीता एकेरी मार्ग आहे. त्यामुळे जटपुरा गेट येथे यात्रेच्या कालावधीदरम्यान जास्त गर्दी होत असते. त्याअनुषंगाने, चंद्रपूर शहरातील रहदारी सुरळीत चालावी, रहदारीस कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये व जनतेला त्रास होऊ नये म्हणून दि. 27 मार्च ते 10 एप्रिल 2023 पर्यंतच्या कालावधीत शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात येत आहे. त्याबाबतच्या सूचना पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी निर्गमित केल्या आहे.
या कालावधीत अंचलेश्वर गेट ते बागला चौक हा मार्ग सायकल खेरीज सर्व वाहनांकरीता बंद राहील. तसेच अंचलेश्वर गेट ते बागला चौक हा मार्ग नो पार्किंग झोन म्हणून घोषित करण्यात येत आहे. 29 मार्च रोजी काष्ठपूजन शोभायात्रेची रॅली असल्याने बागला चौक ते अंचलेश्वर गेट या मार्गावर रॅलीमधील वाहनांच्या वाहतुकीसाठी शिथिलता देण्यात येत आहे. बागला नगर, महाकाली वार्ड, भिवापुर वार्ड या यात्रा परीसरात राहणाऱ्या नागरीकांनी शहरात जाण्यासाठी व परत येण्यासाठी भिवापूर-हनुमान खिडकी-दादमहल वार्ड या मार्गाचा वापर करावा. सदरचा मार्ग हा मोटार सायकल व ऑटो यासाठीच राहील. बागला नगर, महाकाली वार्ड, भिवापूर वार्ड या यात्रा परीसरात राहणाऱ्या नागरीकांना चारचाकी वाहनाने शहरात किंवा बाहेर जायचे असल्यास लालपेठ कॉलरी-पठाणपुरा गेट-गांधी चौक या मार्गाचा वापर करावा. तसेच शहराबाहेर इतरत्र जायचे असल्यास कामगार चौक मार्गे बायपास रोडचा वापर करावा.
यात्रेकरीता बाहेरून येणाऱ्या वाहनांकरीता पार्किंग व्यवस्था:
नागपूर मार्गे येणाऱ्या जीप, कार, बस व जड वाहनांकरीता कोहिनूर तलाव मैदान, बल्लारशा मार्गे येणाऱ्या वाहनाकरीता भिवापूर मार्केट मैदान, महाकाली पोलीस चौकी ते इंजीनियरिंग कॉलेज रोडचे बाजूस, बाबूपेठ पोलीस चौकी (डी.एड कॉलेज) तसेच संपूर्ण यात्रा स्पेशल राज्य परिवहन बसेसकरीता विश्राम गृहासमोरील न्यु इंग्लिश हायस्कूल मैदान या नियोजित स्थळी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. याची नागरिकांनी नोंद घ्यावी. तसेच
वरील निर्देशांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी केले आहे.
०००००००
No comments:
Post a Comment