Search This Blog

Monday, 13 March 2023

बाजरीचे महत्व व आहारात वापर होण्याच्या दृष्टीने चिमूर येथील शेतकऱ्यांच्या शेतात बाजरी पिकाचे प्रात्यक्षिक


बाजरीचे महत्व व आहारात वापर होण्याच्या दृष्टीने चिमूर येथील शेतकऱ्यांच्या शेतात बाजरी पिकाचे प्रात्यक्षिक

चंद्रपूर, दि. 13 : 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. पौष्टीक तृणधान्याचे आहारात महत्वाचे स्थान आहे. बाजरीमध्ये असणारी पोषकतत्वे, कॅल्शियम, कर्बोदके 67.5 ग्रा., प्रथिने 11.6 ग्रा., लोह 8 ग्रा., स्निग्धपदार्थ 5 ग्रा., मॅग्नेशियम, कॅलरी, फायबर, विटामिन बी 6 तसेच पोटॅशियम मोठया प्रमाणात असते.

            दि. 9 मार्च रोजी बोथली ता. चिमूर येथील शेतकरी आनंद गजानन थुटे यांच्या शेतावर बाजरी प्रात्यक्षिकासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाउसाहेब ब-हाटे यांनी भेट दिली. जीवनसत्वाचा आहारात समावेश होण्याच्या अनुषंगाने जिल्हयात बाजरी पिकाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी चिमूरचे तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी व कृषी सहायक आदी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांसोबत बाजरीचा हुरडा करण्यात आला व बाजरी पिकाबद्दल माहिती तसेच बाजरी पिकात असलेली पौष्टीकता याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

बाजरीची पौष्टिकता व आहारातील महत्व:

            म्हशीच्या दुधासोबत बाजरीची भाकरी खाल्याने शरीराला पुष्टी येते व लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटांसाठी हे अन्न पूरक ठरते. बाजरी उष्ण असल्याने ती थंड वातावरणात म्हणजेच हिवाळ्यात व पावसाळ्यात खावी. बाजरीपासून बनविलेले दिवे, उंडे, खिचडी, चकल्या बनवल्या जातात. ज्या बलवर्धक असतात.  बाजरीचे सेवन बाळंतीणीसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. बाजरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स व वर्गीय जीवनसत्वे, फायको केमिकल्स आढळतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते. बद्धकोष्ठता असल्यास उन्हाळ्यात बाजरी टाळावी. बाजरी ही बलकारक, उष्ण, अग्निदीपक, कफनाशक मानली जाते. तसेच बाजरी ही मधुमेह व कॅन्सररोधक आहे.

            धानाच्या पट्ट्यात रब्बी ज्वारी नंतर चंद्रपूर जिल्हयात आत्मा प्रकल्पाच्या माध्यमातून उन्हाळी बाजरी पिक यशस्वी झाले. पौष्टीक तृणधान्याचा गावागावात रथ करून, गावातील ग्रामपंचायत, मंदिरे, शाळा इत्यादी माध्यमातून प्रचार, प्रसिध्दी व जनजागृती  करण्यात आली.  सन 2023-24 मध्ये 20 गावामध्ये लक्षांक निश्चित करून पुढील उन्हाळी हंगामात बाजरी क्लस्टर तयार करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाउसाहेब ब-हाटे केले आहे.

00000

No comments:

Post a Comment