Search This Blog

Monday, 9 April 2018

प्रतिकूलतेवर मात करण्याची आदिवासींची उपजत ताकद; एव्हरेस्ट सर करेल : विष्णू सावरा




चांदाचे एकलव्य एव्हरेस्टवर महाराष्ट्राचा झेंडा चढवतील- ना.मुनगंटीवार
चंद्रपूरने अनुभवला आदिवासी मुलांना शुभेच्छा देणारा भावनिक सोहळा

       चंद्रपूर, दि.08 एप्रिल  कठोर परिश्रमाला यशाचा सुंगध असतो आणि उपजत गुणवत्तेला संधी मिळाली की आकाश मोकळे होते,  हा संदेश देणारा एक हृदयस्पर्शी सोहळा चंद्रपूरच्या जनतेने आज अनुभवला. जिल्हयातील  आदिवासी शाळेतील 10 विद्यार्थ्यांनी वर्षभर चाललेल्या खडतर आणि कठीण प्रशिक्षणानंतर एव्हरेस्ट सर करण्याचा संकल्प सोडला. महाराष्ट्राच्या मंत्री मंडळातील दोन दिग्गज मंत्र्यांनी त्यांच्या पाठीवर यशस्वी व्हा ! अशी प्रेमाची थाप दिली आणि यासोबतच प्रवास सुरु झाला गडचांदा ते एव्हरेस्टचा !   
            चंद्रपूरच्या बोर्डा, देवाडा व जिवती या तीन आश्रमशाळेतील 10 आदिवासी विद्यार्थी 10 एप्रिलपासून हिमालयाच्या पायथ्याशी असणा-या बेस कॅम्पवरुन महिनाभराच्या एव्हरेस्ट मोहिमेला सुरुवात करणार आहेत. एक वर्षाच्या सात टप्यातील प्रशिक्षणानंतर ही मुले गिर्यारोहण मोहिमेसाठी सिध्द झाली आहे. आज चंद्रपूरमध्ये खचाखच भरलेल्या प्रियदर्शिनी सभागृहामध्ये या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या मोहिमेवर आश्रम शाळेतील आकाश चिन्नु मडावी, शुंभम रविंद्र पेंदोर, छाया सुरेश आत्राम, इंदू भाऊराव कन्नाके, कविदास पांडूरंग काटमोडे, मनिषा धर्मा धुर्वे, प्रमेश शितारामआडे, आकाश मलाका आत्राम, उमाकांत सुरेश मडावी, विकास महादेव सोयाम हे विद्यार्थी जाणार आहेत,राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, प्रशिक्षक विमला नेगी देवसकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, या प्रकल्पासाठी सुरुवातीपासून परिश्रम घेणारे सद्याचे गोदिंया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजा दयानिधी आदींच्या प्रोत्साहनपर शब्दानंतर या 10 आदिवासी विद्यार्थ्यांच्या हातात चंद्रपूरचा झेंडा दिला गेला. त्यावेळी अवघ्या सभागृहाने टाळयांचा कडकडाट करीत या मुलांना शुभेच्छा दिल्यात. यावेळी व्यासपिठावर चंद्रपूर शहराच्या महापौर अंजली घोटेकर, आमदार नाना शामकुळे, आमदार संजय धोटे, जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, आदिवासी विभागाच्या अप्पर आयुक्त माधवी खोडे, प्रकल्प अधिकारी केशव बावनकर, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत आदी उपस्थित होते.
            या कार्यक्रमात आदिवासी मुलांनी गेल्या वर्षभरात केलेल्या खडतर परिश्रमाची चित्रफित दाखविण्यात आली. काही मिनीटांच्या या चित्रफितीने मुलांच्या साहसाची कल्पना आली. सोबतच एव्हरेस्ट चढून जाणे हे किती कठीण काम आहे. त्यासाठी लागणारी चिकाटी, जिद्द आणि पैसा याचीही सभागृहातील उपस्थितांना कल्पना आली. यावेळी महाराष्ट्राचा झेंडा खांदयावर घेऊन मुलांना एव्हरेस्ट सर करण्यासाठी परवानगी देणा-या आदिवासी मुलांच्या आई वडीलांचा सत्कार करण्यात आला. 10 मुलांपैकी दोघांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांच्या मनोगतातील आत्मविश्वास त्यांच्या यशाची खात्री देत होता. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या 10 मुलांसाठी शुभेच्छा गिफ्ट म्हणून टॅब वितरीत केले.
यावेळी संबोधित करतांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, जगातल्या सर्वात कठीण असणा-या गिर्यारोहण मोहीमेसाठी एव्हरेस्टचे नाव घेतल्या जाते. कधी शाळेत असतांना एव्हरेस्टच्या पराक्रमाचे संदर्भ वाचनात आले होते. आज एव्हरेस्टवर चढाई करणा-या मुलांसोबत व्यासपिठावर उपस्थित राहणे अभिमानाचे वाटते. यावेळी त्यांनी मुलांच्या या जिद्दीला सलाम करण्यासाठी संपूर्ण सभागृहालाच उभे राहून टाळयांचा कडकडाट करण्याचे आवाहन केले. आदिवासी मुले जेव्हा एव्हरेस्ट सर करुन येतील तेव्हा पंतप्रधानांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्याचा प्रयत्न करु असे सूतोवाच करताच हा आवाज टिपेला पोहचला. त्यांनी यावेळी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांना या भागातील आदिवासीं बांधवाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक घोडदौडीची आढावा दिला. जिल्हयात सुरु असलेल्या विकास कामांचीही माहिती दिली. याशिवाय खोज, हॅलो चांदा अशा वेगळया उपक्रमांचीही माहिती दिली.  हा जिल्हा एकलव्यांचा असून जिद्दी, काटक असणा-या या आदिवासी मुलांकडून एव्हरेस्ट   सर केला जाईल, असे हीरे चंद्रपूरच्या सारख्या कोळश्याच्या खाणीत तयार होतात. ही 10 मुले म्हणजे आमचे कोहीनूर असून चंद्रपूरचा, महाराष्ट्राचा झेंडा निश्चितच एव्हरेस्टवर फडकवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सोबतच या मुलांना तुम्ही मोहिम फत्ते करुन या  तुम्हाला पोलीस विभागातील सेवा देण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासनही त्यांनी दिले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलतांना आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी आदिवासींनी जगाच्या स्पर्धेत उतरण्याची परिस्थिती सद्या निर्माण झाली आहे. मुळप्रवाहात येण्यासाठी एव्हरेस्टसारखे प्रकल्प पतदर्शी ठरतात. आदिवासींमध्ये उपजतच काटकता, जिद्द, चिकाटी असते. प्रतिकुल परिस्थितून जिवन जगत आमच्या पिढया न पिढया पुढे आल्या आहेत. कष्ट अडथळे येतीलच, मात्र इच्छा आहे ते तिथे मार्ग असतो. तुम्ही कठोर परिश्रम घेतले आहे. त्यामुळे तुमचा विजय निश्चित आहे, अशा शुभकामना दिल्या.  
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रधान सचिव मनिषा शर्मा यांनी केले. एव्हरेस्ट हे खडतर परिश्रमाचे प्रतिम म्हणून ओळखले जाते. आदिवासी मुलांमध्ये प्रचंड क्षमता, गुणवत्ता असून त्यांना संधी मिळाली तर एव्हरेस्ट सुध्दा सर करु शकतात. हे आम्हाला समाजाला सांगायचे आहे. ही मुले आदिवासी समाजाचे नवे रोल मॉडल म्हणून पुढे येतील, असेही त्यांनी सांगितले. या प्रकल्पावर सुरुवातीपासून काम करणारे आदिवासी विभागाचे तत्कालीन प्रकल्प अधिकारी सद्याचे गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजा दयानिधी यांनी या मुलांच्या सरुवातीच्या प्रवासाची मांडणी केल्याची माहिती दिली. प्रशिक्षक विमला देवसकर यांनी एव्हेरस्टस्वारी किती खडतड व कठीण असते याची माहिती दिली. मुलांनी सात टप्प्यामध्ये प्रशिक्षण घेतले असून ते निश्चित यशस्वी होतील, असे सांगितले. आमदार नाना शामकुळे यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन हेमंत शेंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रकल्प अधिकारी केशव बावनकर यांनी केले.
                                                            000

No comments:

Post a Comment