Search This Blog

Monday 9 April 2018

डॉ.बाबासाहेब आंबेडकरावरील विशेष लोकराज्य अंकाचे प्रकाशन


चंद्रपूर, दि.9 एप्रिल- एप्रिल 2018 चा लोकराज्य अंक महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारा अंक आहे. यामध्ये त्यांच्या व्यक्तिमहत्वाच्या विविध पैलूंना उलगडणारे लेख घेण्यात आले असून याशिवाय या अंकामध्ये 2018 च्या अर्थसंकल्पावरील विश्लेषन घेण्यात आले आहे. राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहीर, राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी चंद्रपूरमध्ये आयोजित वेगवेगळया कार्यक्रमात लोकराज्याच्या एप्रिल महिन्याच्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
            यावेळी राज्य शासनाने गेल्या काही वर्षात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भातील साहित्याला माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या लोकराज्यमार्फत जनतेपर्यंत पोहचविण्याचे कार्य केले आहे. यामधील दर्जेदार व माहितीपूर्ण लेख वाचणीय असल्याचे त्यांनी सांगितले. अर्थसंकल्पावरील आपली मुलाखत अर्थसंकल्पाचे धेय्य आणि उद्दिष्ट मांडणारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक लोकप्रतिनिधी मार्फत प्रकाशन करण्याच्या मोहिमेचे देखील त्यांनी कौतुक केले. बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या व महिला बचत गटांच्या कार्यक्रमामध्ये रविवारी या अंकाचे त्यांनी प्रकाशन केले.
            एप्रिलच्या लोकराज्य अंकामध्ये बाबासाहेबांवरील विविध मान्यवरांनी लिहीलेले लेख असून यामध्ये सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, डॉ.जयसिंगराव पवार, डॉ.शैलेद्र लेंडे, अविनाश चौगुले, डॉ.जी.एस. कांबळे, डॉ.संभाजी खराट, मिलींद मानकर, प्रा.म.सु.पगारे, दत्ता गायकवाड, डॉ.अक्रम पठाण, प्रा.नागसेन ताकसांडे, डॉ.बबन जोगदंड, डॉ.विजय खरे, विष्णु काकडे, यशवंत भंडारे आदींचे विविध विषयांवरील लेख आहेत. हा अंक सर्वत्र उपलब्ध असून जिल्हा माहिती कार्यालयातही विक्रीसाठी उपलब्ध आहे. राज्याचे वित्त व नियोजन मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी काल या अंकाचे चंद्रपूर येथे प्रकाशन केले. या अंकामध्ये बाबासाहेबांच्या विविध लेखासोबतच अर्थसंकल्पावर ना.मुनगंटीवार यांची विशेष मुलाखत आहे. चंद्रपूर दौ-यावर असणारे राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा हे आदिवासी आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी चंद्रपूरला आले होते. कार्यक्रमापूर्वी त्यांनी या अंकाचे कौतुक केले. आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना एव्हरेस्ट मोहीमेसाठी पाठवून राज्य शासन सामाजिक समता सप्ताहमध्ये मोलाचे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वांना संधी, सर्वांना न्याय मिळावा यासाठी बाबासाहेबांनी आयुष्य वेचले. हा कार्यक्रम सामाजिक न्यायाप्रती बांधिलकी जोपासण्याचा असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी देखील लोकराज्याच्या नव्या अंकाचे स्वागत केले आहे. डॉ.बाबासाहेबांचे चरित्र्य हे कायम प्रेरणादायी असून राज्य शासनाने लोकराज्याच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या व्यक्तिमहत्वाच्या विविध पैलूंना उजागर केले आहे. नव्या पिढीसाठी हे साहित्य प्रेरणादायी असून यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाचे त्यांनी कौतुक केले.
00

No comments:

Post a Comment